वडिलांच्या ‘आधार’ व मोबाईलशिवाय मुलांना ‘आधार’ नाही

02 Jul 2023 15:00:11
नागपूर, 
एक दिवसाच्या बालकाचे आधार कार्ड आता प्रसूती गृहातच मिळणार असून पालकांना कुठेही धावाधाव करण्याची गरज उरलेली नाही. मात्र, असे असले तरी वडिलांचा (Aadhaar Card) आधार कार्ड क्रमांक आणि त्यास संलग्नित मोबाईल क्रमांक गरजेचा राहणार आहे. देशात आता बालकापासून प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड अत्यावश्यक झाले आहे. आधार कार्डला मोबाईल क्रमांक तसेच पॅन कार्ड व मतदान ओळखपत्र एकमेकांना जोडणे बंधनकारक आहे. शिवाय आधार कार्ड दर 10 वर्षांनी अद्यावत करणेही बंधनकारक आहे. आधार कार्ड बनवण्याचा त्रास टाळण्यासाठी सरकारने नवजात बालकांची आधार नोंदणी तत्काळ करण्याचा निर्णय घेतला. बालकाचे आधार कार्ड तयार करण्याची व्यवस्था संबंधित प्रसूती गृहात करण्यात आली आहे. पालकांना मुलाचे आधार कार्ड बनवण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. 8 ऑक्टोबर 2022 ते 20 जून 2023 पर्यंत जिल्ह्यात 5666 आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यात शहरातील 3289 तर ग्रामीण भागातील 2377 जणांचा समावेश आहे.

Aadhaar Card
वर्षभरापूर्वी सुरू झाली
ही योजना 8 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्ह्यात (Aadhaar Card)  आधार कार्ड जन्म सेवा योजनेंतर्गत सुरू करण्यात आली. या दिवशी उमरेड तालुक्यातील बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या नवजात मुलीच्या आधार कार्डाची नोंदणी करण्यात आली. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने त्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता एका दिवसाच्या मुलाचे आधार कार्ड बनवण्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

Aadhaar Card
अशी आहे प्रक्रिया
बालकाच्या आधार कार्ड (Aadhaar Card)  नोंदणीसाठी वडिलांचा आधार कार्ड क्रमांक आणि त्याला जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. यासाठी प्रसूती गृहात खास व्यवस्था करण्यात आली आहे. जन्म दाखला तेथेच तयार होतो. टपाल खात्याचा प्रशिक्षित कर्मचारी रोज तेथे जातो. आधार नोंदणी फॉर्ममध्ये जन्म दाखला, वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, आधार संलग्न मोबाईल क्रमांक इत्यादी भरतो. त्याची पडताळणी केल्यानंतर, मुलाच्या आईचा अंगठ्याचा ठसा आणि मुलाचा फोटो घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, संलग्न मोबाईल नंबरवर एक संदेश येतो. (Aadhaar Card)  मुलाच्या आईला नोंदणी पूर्ण झाल्याची स्लिप दिली जाते. काही दिवसांनी आधार कार्ड पोस्टाने पोहोचते.
- डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधीक्षक मेडिकल रुग्णालय
Powered By Sangraha 9.0