सालेकसाचे ग्रामिण रुग्णालयच आजारी

21 Jul 2023 15:55:40
तभा वृत्तसेवा
सालेकसा, 
Salekasa तालुक्याचा व्याप मोठा आहे. त्यातही जंगलव्याप्त भाग असल्याने दळणवळणाचे साधन नाही. सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालय हेच गोरगरिबांच्या उपचाराचे साधन आहे. मात्र, अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे रुग्णसेवा ढेपाळली. अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी ही पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना उपचार घेता येत नाही. या सर्व कारणांमुळे हे रुग्णालयच आजारी पडले आहे.
 
 
Salekasa
 
Salekasa सालेकसा तालुका जंगलव्याप्त आहे. आदिवासीबहूल आणि राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या पूर्व टोकावरील हा तालुका आहे. शासनाने नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या. मात्र, यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे तालुका अद्यापही मागासलेलाच आहे. सालेकसा तालुका मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी आणि एक अधीक्षकाचे पद मंजूर आहे. मात्र ही सर्वच पदे रिक्त आहेत. कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांची दोन पदे भरलेली आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि अधीक्षकांचे रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा केले. मात्र अद्यापही पटे भरली नाही. 2004 पासून मागणी असताना 2022 मध्ये क्ष-किरण यंत्र मिळाले. मात्र डिजीटल मशीन अद्यापही मिळाल्या नाही. रुग्णालयात मातृत्व बाळ संरक्षण कक्ष तयार केले. मात्र तेथे डॉक्टर नसल्यामुळे ती वास्तू निकामी ठरली आहे. वर्ग चारची पदे देखील रिक्त आहेत. त्यामुळे एकूणच रुग्णसेवा ढेपाळली आहे. नियामक मंडळाच्या कार्यकारिणी सभेत मुद्दा उपस्थित करून देखील त्याचा लाभ झाला नाही. वैद्यकीय अधीक्षक पदाचा प्रभार जिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांकडे आहे मात्र ते नियमित येत नाही. फक्त स्वाक्षरीसाठी येत असल्याचा आरोप देखील होत आहे. येथे रुग्णावर योग्य उपचार होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. या सर्व समस्या सुटाव्या यासाठी तालुका काँग्रेस कमिटीने आ. सहेसराम कोरेटे यांना निवेदन दिले आहे. रुग्णालयाचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्याची मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0