सोनियाचें ताट क्षीरीनें भरीलें।भक्षावया दिलें श्वाना लागीं॥

    दिनांक :23-Jul-2023
Total Views |
तुका आकाशाएवढा
- प्रा. मधुकर वडोदे
Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी ईश्वर भक्तीचा अत्यंत साधा, सोपा मार्ग सांगितला. समाजातील लोकांना अचूक मार्गदर्शन करून दांभिकपणावर निर्भीडपणे मत व्यक्त केले तसेच त्यांनी आपल्या अभंगातून जनसेवेचे, समाजसेवेचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. जनसामान्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांना कोणत्या पद्धतीने समजून सांगावे की, त्यांना त्यांचे हित कशात आहे, हे कळू शकेल. तसेच आपण करीत असलेले जे काही कार्य आहे ते योग्य-अयोग्यतेबाबतचे परीक्षण करू शकतील. या अंगाने समजावून सांगण्याचा यथावकाश प्रयत्न केलेला असल्यामुळेच संत ज्ञानदेवांनी रचलेल्या पायावरच्या मंदिराचा कळस ते होऊ शकले.
 
 
tukaram-maharaj
 
लोकांमध्ये स्वत:च्या अस्तित्वाचीच नव्हे तर अस्मितेची जाणीव निर्माण करून देण्यामागे Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांचा फार मोठा सहभाग आहे. खरंं तर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून विश्व साहित्यावर आपला अमिट असा ठसा उमटविला. समाजात चालत असलेल्या काही चुकीच्या प्रथांसोबतच अनेक गोष्टी अशा काही नजरेस पडल्या की, ज्यामुळे तो प्रगती न साधता अधोगतीकडे जाताना दिसला. तेव्हा अनेक प्रकारच्या विरोधांशी सामना करीत समतावादी, बंधुत्ववादी विचारांचा निर्भीडपणे पुरस्कार केला. अशा या भूलोकीचे देव ठरलेल्या संत तुकोबांनी बहुजन समाजाला संसारात राहूनही परमार्थाचे पैलतीर कसे गाठावे याची शिकवण दिली. जगताना आपण काय करावे? काय करू नये? योग्यता जाणून त्या सोबत कोणता व कसा व्यवहार करावा? अपेक्षा कुणाकडून करावी? याबाबत समजून सांगताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना समजेल असे सांगण्याचा प्रयत्न करतात. महाराज म्हणतात की,
 
सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें।
भक्षावया दिलें श्वाना लागीं॥
मुक्ताफळहार खरासि घातला।
कस्तुरी सुकराला चोजविली॥
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान।
तयाची ते खुण काय जाणे॥
तुका म्हणे ज्याचें तोचि एक जाणे।
भक्तीचें महिमान साधु जाणे॥
अ. क्र. 135
 
बर्‍याच वेळा आपण कार्य करताना ते विधायक व्हावे असे आपल्याला मनोमन वाटते, परंतु आपण ते करतेवेळी चुकीचे माध्यम निवडल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवल्याखेरीज राहात नाही. एवढेच नाही, तर केलेल्या कार्यामधून काहीही निष्पन्न निघत नाही. केवळ वेळ, पैसा विनाकारण व्यर्थ जातो. असे का होते हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. अशाच वेळी संत उपदेश अत्यंत उपयोगी ठरत असतो. त्याकरिता Saint Tukaram Maharaj संत संगतीचे महत्त्व लक्षात येते. हीच बाब संत तुकारामांनी समजून सांगितली आहे. ते म्हणतात की, कुठलीही गोष्ट करताना समोरच्याची योग्यता जाणूनच पुढे जायला पाहिजे. तो त्या योग्यतेचा असणे जरूरीचे आहे. जर तो त्या योग्यतेचा नसेल तर काहीही उपयोग होणार नाही. सर्व व्यर्थ ठरेल. जसे सोन्याच्या ताटामध्ये स्वादिष्ट अशी खीर चाखणारा असेल तर त्याची किंमत त्याला कळेल. परंतु, तेच जर तीच खीर कुत्र्याला वाढून ती जर खायला दिली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण त्याची ती योग्यताच नाही. अत्यंत मौल्यवान असलेल्या सोन्याच्या ताटाची त्याच्या पुढे काहीच किंमत नाही तसेच स्वादिष्ट अशी खीर कितीही आत्मीयतेने उत्कृष्ट दुधाची अत्यंत मेहनतीने केलेली असली, तरी त्याचेही त्याला काहीच मोल वाटणार नाही. कारण तो त्या लायकीचाच नाही. म्हणून ज्यांची लायकी नाही अशा नालायक व्यक्तीवर तुम्ही कितीही वेळ खर्च करा, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा, त्यावर उपकार करा, शेवटी त्यामधून काहीही चांगले निष्पन्न होणार नाही. त्याची ती पात्रताच नाही, हे लक्षात ठेवावे. हीच बाब आणखी सविस्तरपणे समजण्याकरिता महाराज दुसरं आपल्याला समजेल असे जवळचे एक उदाहरण देऊन आणखी आपला मुद्दा स्पष्ट करतात. ते म्हणतात की, अत्यंत मौल्यवान असे मोती आहेत. असा अमूल्य मोत्यांचा हार जर घातला तर घालणार्‍याच्या सौंदर्यात भर पडेल. त्यावरून त्याची श्रीमंती लक्षात येईल. त्या मोत्यांची जाण असेल तोच त्याची किंमत करेल. परंतु त्याकरिता त्याची लायकी सिद्ध करणे गरजेचे आहे.
 
 
असा अमूल्य किमतींचा हार परिधान केल्यामुळे त्याच्याकडे चारचौघांची नजर जाईल. परंतु, जर का हाच मोत्याचा हार गाढवाच्या गळ्यात घातला तर त्या मोत्यांची आहे ती किंमत जाईलच; त्यासोबतच त्या गाढवाला त्या मोत्याच्या हाराचे काहीही वाटणार नाही. कारण त्याची ती लायकीच नाही. अशा नालायकाला अमूल्य असा मोत्याचा हार दिल्यामुळे त्या मौल्यवान वस्तूची किंमत वाढण्याऐवजी आणखी घटेल. म्हणजेच चांगल्या मौल्यवान वस्तूची कदर करण्यासाठी लायक व्यक्ती महत्त्वाच्या ठरतात, हे आपल्या लक्षात येईल. म्हणूनच चांगली गोष्ट किंवा ज्ञान हे ज्याला समजेल किंवा समजून घेण्याची लायकी असेल त्यालाच अधिक समजविल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. याही पुढे जात महाराज म्हणतात की, कस्तुरीचा सुगंध जिकडे पसरला तिकडील वातावरण आल्हाददायक होते. थोडा जरी सुगंध आला तर लोक कस्तुरीचा शोध घेऊन ती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. त्या सुगंधाची महती किती आहे, याची जाणीव त्यांना असते. अशा या सुगंधित असणार्‍या कस्तुरीचा जर का सुगंध डुकराला दिला तर त्याला त्याचे काहीही वाटणार नाही. कारण त्याची लायकी केवळ गटारातील येणार्‍या दुर्गंधी घेण्याइतकीच सीमित असल्याने त्याला कस्तुरीचा सुगंध काय कळणार? त्याकडून ती अपेक्षाही करू नये. जे आयुष्यभर घाणीतच आपलं जीवन व्यतीत करतात, त्याच्या बाहेर यायला तयारच नसतात त्यांच्याकडून कितीही अपेक्षा केली तर ती निष्फळ ठरते. चांगलं घ्यायलासुद्धा लायकी लागते. म्हणूनच लायकी नसेल तर त्याला कितीही चांगलं दिलं तरी तो त्याचं मोल जाणू शकत नाही. तो त्याबाबत अज्ञानी असतो.
 
 
म्हणूनच Saint Tukaram Maharaj महाराज म्हणतात, कोणाला ज्ञान सांगावं? समाजस्वास्थ्य चांगलं राहण्याकरिता कुणाची निवड करावी? सन्मार्गावर आणण्यासाठी उपदेश कुणाला करावा? अपेक्षित बदल केव्हा होईल? तर ज्याला ज्ञान कळते आणि तो सांगितलेलं समजावून घेण्याचा मनापासून प्रयत्न करतो त्यालाच ज्ञानाच्या चार गोष्टी सांगितल्या पाहिजे. तेव्हाच तो सत्कर्म मनापासून आवडीने करण्याचा उत्साह कायम ठेवील. कारण त्याची योग्य काय ते ठरवण्याची मानसिकता असते. अशा स्वरूपाची आवड असेल तोच संतांची किंमत करू शकतो. नालायक लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकण्याच्या मानसिकतेत नसतात. कारण समजण्याची त्यांची क्षमताच नसते. अशांवर विनाकारण आपला वेळ, त्यावर होणारा खर्च व्यर्थ जातो. जसे पालथ्या घड्यावर कितीही पाणी टाकलं तर ते भरणारच नाही. त्याला त्या विषयाचे ज्ञान अवगत नसल्याने तो लक्षही देणार नाही. लक्ष देण्याचा प्रयत्नही करणार नाही. जसे एखाद्या डुकराची सुगंधित साबणाने आंघोळ घातल्यास तो आंघोळ घालेपर्यंत थांबेलही, परंतु लगेच तो काही वेळाने परत गटारात म्हणजेच दुर्गंधीत जाऊन मुक्काम करेल. त्याची हीच लायकी आहे. हे आपण ओळखायला पाहिजे. ईश्वर भक्तीत काय ताकद आहे, हे जर समजून घ्यायचे असेल तर ती समजण्याकरिता आधी आपणास तेवढी क्षमता निर्माण करावी लागेल. संतांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. त्यांच्याशी संगती करावी लागेल. तेव्हा कुठे भक्तीचा महिमा आपणास कळू शकेल.
 
- 9422200007