चिखली एमआयडीसीचे क्षेत्रफळ वाढवण्यासाठी सर्वेक्षण करा

29 Jul 2023 19:32:13
चिखली,
Chikhli MIDC चिखली एमआयडीसीमधील सध्या उपलब्ध असलेली जागा उद्योगांना कमी पडत असल्याने चिखली एमआयडीसीचे क्षेत्रफळ वाढवण्यासाठी जागेचे सर्वेक्षण करुन तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आ. श्वेता महाले यांच्या यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत दिले.
 
 
Chikhli MIDC
 
दि. 27 जुलै रोजी मुंबई येथे विधान भवनातील दालनात Chikhli MIDC चिखली एमआयडीसी मधील विवीध विषयांवर चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी बैठक संपन्न झाली . या बैठकीत चिखली एमआयडीसी मधील विवीध विषयांवर चर्चा झाली. अमरावती आर. ओ. कार्यालय अकोला येथे करणार असल्याचे आश्वासन देखील सामंत यांनी या बैठकीत दिले. आ. श्वेता महाले यांनी या बैठकीत या मुद्द्यावर अधिकार्‍यासमवेत चर्चा केली. बुलढाणा जिल्हयातील औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यासाठी प्रादेशिक कार्यालय अमरावती आहे. अमरावती ते बुलढाणा हे अंतर जवळपास 225 किलोमीटर असून त्यामुळे एमआयडीसी संदर्भात कामांसाठी मोठ्या प्रमाणात वेळ जातो. अकोला शहर बुलढाण्यापासून जवळ असल्याने प्रादेशिक कार्यालय अकोला येथे करण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. त्यावर महामंडळात ठराव घेतलेला असून लवकरच अकोला येथे करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री सामंत यांनी दिले आहे. चिखली एमआयडीसीला पाणीपुरवठा करणार्‍या पेनटाकळी धरणावरून असणारा पाणीपुरवठा, जलवाहिनी आणि प्लांट हा अतिशय जुना झालेला आहे. जलवाहिनी ठिकठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे शुध्द मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यासाठी या पाणीपुरवठा योजना अद्ययावत करून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरेशन प्लांटची सुद्धा दुरुस्ती करण्यात यावी बर्‍याच दिवसांपासून मागणी होती. त्याअनुषंगाने आ महाले यांनी चिखली एमआयडीसी येथे सद्यस्थितीत असणारे उद्योग आणि भविष्यात होणारी वाढ लक्षात घेता नवीन जलवाहिनी आणि नवीन जलशुध्दीकरण केंद्र बसवण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. ना उदय सामंत यांनी नवीन जलवाहिनी आणि जल शुध्दीकरण केंद्रासाठी सर्वेक्षण करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना दिले.
 
खंडाळा ता. चिखली ते जांभोरा येथे जाणारा एमआयडीसी चिखलीने संपादित केलेला रस्ता पुर्वी प्रमाणे 30 फुट रुंद करुन त्याचे मजबुतीकरण करून देण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले असून चिखली एमआयडीसी भूसंपादन करतांना भूपिडीत खातेदारांना पीएपी अंतर्गत भूखंड मिळण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी सूचना देखील ना. उदय सामंत यांनी दिली. या वेळी मंत्री दादा भुसे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी डी मलिकनेर, तांबोरे, मुख्य अभियंता राजेश झंझाड, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी पारधी, कार्यकारी अभियंता आदी उच्च स्तरीय अधिकारी, अमित जैन, विनायक सरनाईक, प्रकाश ठेंग, अमित बेगानी (जैन), सुनील मोडक .मुकुंद दंडे , प्रकाश पवार, अभिजीत पाटील , रणजित तुरे , पुरुषोत्तम ठेंग आदींची उपस्थीती होती.
Powered By Sangraha 9.0