प्रासंगिक
- राजू पितळे
सद्गुरुविण जन्म निर्फळ।
सद्गुरुविण दुःख सकळ।
सद्गुरुविण तळमळ। जाणार नाही दासबोध॥ या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला पाठवण्यात ईश्वराचा काय हेतू असेल? समर्थ म्हणतात, ‘धन्य धन्य हा नरदेहो। येथील अपूर्वता। पाहो जो जो कीजे परमार्थ लाहो। तो तो पावे सिद्धीते॥ तुकाराम महाराज म्हणतात, ‘किती जन्मा यावे, किती व्हावे फजित’ मूळच्या आपल्या आत्मरूपाला विसरल्यामुळे या जिवाची जी भटकंती सुरू आहे, ती मी केवळ आत्मरूप आहे. म्हणजेच ब्रह्मरूप आहे. सुखरूप आहे. आनंदरूप आहे, या ज्ञानानेच थांबणार आहे. फक्त मनुष्य जन्मातच या जिवाला मूळच्या आत्मरूपाला प्राप्त होण्याची सोय आहे. मग हे ज्ञान आपल्याला आपोआप प्राप्त होईल का? कदापि नाही. त्याकरिता त्याला सद्गुरूंची शरणागती स्वीकारावी लागते. त्यांचे शिष्यत्व पत्करावे लागते. समर्थ म्हणतात, ‘ज्ञानविरहित जें जें केलें ते तें जन्मासी मूळ जालें म्हणोनी सद्गुरूची पाऊलें सदृढ धरावीं येथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण या नावं ज्ञान.’ ज्ञान म्हणजेच मोक्ष, मुक्ती, जन्ममरणाच्या फेर्यातून सुटका. सद्गुरूंचे महत्त्व सांगताना समर्थ म्हणतात. असो जयासी मोक्ष व्हावा तेंणे सद्गुरू करावा सद्गुरुविण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे मग असा जो सद्गुरू आहे, तो कसा असावा? तर समर्थ म्हणतात, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती याहीवरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचारें निर्मळ स्वधर्म विषई।’ आपल्या सगळ्यांच्या महद्भाग्याने आपल्याला प. पू. सद्गुरू Prahlad Maharajश्री प्रल्हाद महाराज (रामदासी) साखरखेर्डा हे सद्गुरू म्हणून लाभले आहेत. त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या चरित्रातील काही प्रसंगांचा विचार करू. श्री प्रल्हाद महाराज यांचे सद्गुरू, प. पू. श्री रामानंद महाराज हे जालना येथे असत. त्यांच्याकडे साखरखेर्डा येथील एक व्यक्ती आली. त्याचा नित्य श्रीराम दर्शनाचा नियम असे. त्यास श्री रामानंद महाराज म्हणाले की, आपल्या गावांमध्ये Prahlad Maharaj श्री प्रल्हाद महाराज राहतात. एखाददिवशी तुमचे रामदर्शनाला जाणे शक्य झाले नाही, तर श्री प्रल्हाद महाराजांचे दर्शन घेतले तरी तुझ्या रामदर्शनाच्या नियमांत खंड पडणार नाही. ही फार मोठी पावती त्यांना सद्गुरूंकडून मिळाली.
एका भक्ताने श्री महाराजांना विचारले की, ‘महाराज आपल्याला राम दर्शन झाले आहे का?’ त्यावर श्री महाराज म्हणाले, मी जेव्हा सगुणात माझ्या सद्गुरूंचे दर्शन घेत असे व मानसपूजेत दर्शन होते तेव्हा मला रामदर्शनच झाल्यासारखे वाटते. एकदा श्री महाराज आपल्या काही शिष्यांसोबत रेल्वेने प्रवास करीत होते. श्री महाराजांच्या वरच्या बर्थवर असलेल्या व्यक्तीने चहा मागविला. तो घेत असताना कसला तरी धक्का लागून तो चहा खाली श्री महाराजांच्या अंगावर सांडला. महाराज स्वत: चहा, कॉफी इत्यादी घेत नसत. तो गरम चहा महाराजांच्या अंगावर सांडल्यामुळे बरोबरीची शिष्य मंडळी त्या माणसाला रागावू लागली. तेव्हा श्री महाराज शांतपणे म्हणाले, हरकत नाही. त्याने मुद्दाम चहा सांडला नाही. त्या निमित्ताने चहाची चव कळावी, अशी श्रीरामाची इच्छा असेल. बरोबरीच्या शिष्यांना महाराज म्हणाले, त्या बिचार्याचा चहा राहून गेला. त्याच्याकरिता दुसरा चहा मागवून त्याला द्या. श्री महाराजांंची सहनशीलता किती? तर, एखाद्या घरी श्री महाराजांचा मुक्काम असला म्हणजे, त्या ठिकाणी भक्त मंडळी Prahlad Maharaj श्री महाराजांना स्नान घालत. सगळे जण एक तांब्याभर पाणी महाराजांवर घालत. त्यामध्ये घाईघाईत कोणी थंड तर कोणी कढत पाणी त्यांच्यावर घालत. एवढे गरम पाणी अंगावर पडले तरी महाराज त्या व्यक्तीला काहीच म्हणत नसत. फक्त मुखातून ‘महाराज श्रीरामा’ एवढेच उद्गार निघत.
श्री महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी साध्या व सोप्या भाषेत कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘शब्द जसे कल्लोळ अमृताचे’ सहज बोलणे हितोपदेश. श्री महाराजांच्या नुसत्या बोलण्याने संतप्त मनाचा दाह शांत होत असे. श्री महाराजांचा सदाचरणावर मोठा भर होता. श्री महाराज म्हणायचे ‘सदाचरण’ हा परमार्थाचा पाया आहे. आई-वडिलांची आज्ञा पाळा, कोणतीही गोष्ट त्यांना विचारून करा. नित्यनेम, साधना, जप, स्वधर्माचरण यामध्ये कुठल्याही परिस्थितीत खंड पडता कामा नये. मौंज झालेल्या मुलाने संध्या केली नाही, तर श्री महाराज म्हणत, वडिलांचा मौंजेचा खर्च वाया गेला. अनुग्रह मंत्राच्या कमीत कमी तेरा माळा जपा. परस्त्रीमाते समान, एकादशीचा उपवास, रामनवमी, जन्माष्टमी, हनुमान जयंती इत्यादी उपवास करण्यास श्री महाराज अनुग्रहाच्या वेळेस सांगत.
श्री महाराजांनी हे स्वतः आधी केले मग सांगितले. श्री महाराज खर्या अर्थाने दासबोध जगले. श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, ‘बोलण्यासारखे चालणे स्वयं करून बोलणे तयांची वचने प्रमाण। मानितो जनी’ त्यामुळे त्यांच्या सांगण्याचा प्रभाव समोरच्यावर पटकन पडत असे. लोकांच्या मनातील भीती महाराज सहज घालवित. महाराज म्हणत ‘कली भित्रा आहे, नामाच्या आधाराने जो राहील, त्याला काहीही करू शकणार नाही?’ अखंड नामानुसंधानावर महाराजांचा फार भर होता. हातात माळ (स्मरणी) नसली म्हणजे तो वेळ वाया गेला. Prahlad Maharaj श्री महाराज म्हणत, एकदा क्षण आपल्या हातून गेला की कोट्यवधी रुपये देऊनसुद्धा तो परत येत नाही. श्री महाराजांसोबत प्रवास करताना महाराज गप्पा मारू देत नसत. प्रत्येकाच्या हातात माळ आहे का? तसेच मुक्कामी गेल्यावर प्रवासात किती जप झाला? हे विचारीत. जपसंख्येनुसार जप व त्याची नोंद करावी तसेच तो जप सद्गुरूंना निवेदन (अर्पण) करावा, असा महाराजांचा आग्रह असे. साधारण वयाच्या 17 व्या वर्षांपासून ते वयाच्या 87 व्या वर्षांपर्यंत सलग सात दशकं श्री महाराजांनी श्रीराम नामाच्या प्रचार-प्रसाराकरिता आपला प्रत्येक क्षण खर्च केला व लक्षावधी जिवांना उद्धारण्यासाठी नामाला लावले.
- 9422101252