- अभय इंगळे
दिग्रस,
धावंडा नदीच्या तीरावर असलेले दिग्रसकरांचे श्रद्धास्थान (Shree Paleshwar Mahadev) श्री पाळेश्वर महादेव प्राचीन शिवमंदिर हेमाडपंथी असून आता त्याचा गाभाराच हेमाडपंथी आहे. या गाभार्याची दुरुस्ती 125 वर्षांपूर्वी झाली असल्याचे परिसरातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. याचा वेगळेपणा म्हणजे गाभार्याचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून शिवपिंड पूर्वाभिमुख आहे. देशात पूर्वाभिमुख महादेवाची पिंड फारच दुर्मिळ आहे. सामान्यत: शिवलिंग हे दक्षिणोत्तर मुख असते पण पाळेश्वराची पिंड पूर्वाभिमुख आहे हे या ठिकाणचे वेगळेपण आहे. अशाच प्रकारची पिंड काशीच्या एका मंदिरात असल्याचे सांगतात.
एकप्रकारे दिग्रसकरांची काशी असलेल्या या Shree Paleshwar Mahadev महादेवावर भाविकांची फार श्रद्धा आहे. बुरुजासारखे प्रवेशद्वार असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून मंदिराला सभामंडप आहे. बाजूलाच सभागृह व खोल्यांची निर्मिती करण्यात आल्याने येथे लग्नसमारंभासह अनेक शुभ व धार्मिक उत्सवांना सुरवात झाली आहे. मंदिराचा विस्तार व दुरुस्ती सुरूच असून भक्तांच्या सहकार्याने व विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नाने मंदिराचा कायापालट होत असून गाभार्याचे सुशोभीकरण पूर्ण झाले आहे. तर नुकतेच महादेव व नंदीस वज्रलेप करण्यात आला असून भगवान शंकराचा चेहरा असलेला तीनमुखी चांदीचा मुखवटा, लिंगकवच व नागछत्र बसवण्यात आले आहे. भक्तांचे पालन करणारा म्हणून याला पाळेश्वर हे नाव पडल्याचे मानतात.
दरवर्षी श्रावण महिन्यात येथे श्री Shree Paleshwar Mahadev शिवलीलामृत ग्रंथाच्या सामूहिक पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. दर श्रावण सोमवारी महादेवास लघुरुद्राभिषेक करून सामूहिक महाआरती होते. मंदिरावर विद्युत रोषणाई, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला भजन, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करून महारुद्राभिषेक व महाआरती होते. दर श्रावण सोमवार व महाशिवरात्रीला महादेवाच्या दर्शनाकरिता भाविकांचा मेळा लागतो. 2005 मध्ये उत्तरप्रदेशातील शिवमहापुराणाचे गाढे अभ्यासक महंत राधेश्याम व्यास महाराज यांनी या मंदिरास भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले.
या Shree Paleshwar Mahadev मंदिरात महाशिवरात्रीच्या काळात सव्वा कोटी अखंड ‘ॐ नम: शिवाय’ हा महामंत्र जप करण्याचे सुचविले होते. तेव्हापासून विश्वकल्याणासाठी महाशिवरात्रीच्या काळात जपसप्ताहाचे आयोजन केल्या जाते. शिवभक्तांच्या सहकार्याने आजपावेतो जवळपास 40 कोटी जप झाला, हे विशेष. 1931 मध्ये या मंदिराचा पहिला न्यास अस्तित्वात आला असून सध्या अध्यक्ष रामदास पद्मावार, सचिव विश्वेश्वर पद्मावार, उपाध्यक्ष बालाजी अंबलकर, डॉ. भास्कर अस्वार, डॉ. अशोक नालमवार, सुधीर येरावार, रवींद्र अरगडे, श्याम पाटील, गणेश काललकर हे विश्वस्त मंदिराची देखभाल करीत आहेत.