तभा वृत्तसेवा
अमरावती,
शहरातले सुप्रसिद्ध डॉ. राजेंद्र अग्रवाल Dr. Rajendra Agarwal (55) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवार, 8 जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. डॉ. अग्रवाल यांनी सुसाईड नोटमध्ये आईच्या आजारपणाचा उल्लेख करून, या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नका, आपण स्वत: हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे.
डॉ. अग्रवाल Dr. Rajendra Agarwal यांचे दस्तूरनगर येथील न्यू भारतीय कॉलनीत घर आहे तर तेथूनच काही अंतरावर त्यांचा दवाखाना आहे. त्यांची पत्नी राजश्री अग्रवाल या सुध्दा डॉक्टर असून, त्या प्रॅक्टिस करतात. शनिवारी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे दवाखान्यात गेली. दुपारी 1 वाजता त्या घरी परतल्यावर त्यांना डॉ. राजेंद्र यांचा मृतदेह घरातील बेडरूममध्ये दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अग्रवाल दाम्पत्य गेल्या 20 वर्षांपासून अमरावती शहरात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचा एक मुलगा उच्च शिक्षणासाठी पुण्यात राहतो. डॉ. अग्रवाल यांच्या आत्महत्येच्या घटनेने त्यांच्या पत्नीसह सर्व नातेवाईकांना धक्का बसला आहे.
त्यांच्या निवासस्थानाबाहेर लोकांची गर्दी जमली होती. त्यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली. ही बाब अद्याप स्पष्ट झाली नसून, याप्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी सांगितले की, Dr. Rajendra Agarwal डॉ. राजेंद्र यांनी सुसाईड नोटमध्ये आईच्या आजारपणाचा उल्लेख केला असून, या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नका, आपण स्वत: हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे.