जळगाव,
ग्राहकांचे संघटन आणि सजग Student Consumer Movement विद्यार्थी ग्राहक चळवळ देशाला विश्ववंदिता करेल, असा विश्वास ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी दोन दिवसीय राज्य अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी केला. जैन हिल्सच्या गांधीतीर्थमधील कस्तुरबा सभागृहात अधिवेशन उत्साहात पार पडले.
विदर्भ प्रांताध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांनी Student Consumer Movement ग्राहक चळवळ-समस्या, निवारण, प्रशासकीय निवेदन पद्धती, कर्तव्य आणि जबाबदारी यावर सविस्तर विवेचन करून मार्गदर्शन केले. नंतर अॅड. विजेता सिंह यांनी नवीन, सुधारित ग्राहक संरक्षण कायदा-2019, राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, कोकण विभागाध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन, तर डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रेड क्रॉस ब्लड बँक यावर मार्गदर्शन केले. तत्पूर्वी राज्य संघटक सर्जेराव जाधव यांनी शेतकरी ग्राहक व सहसंघटक मेधा कुलकर्णी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र रचना व कार्यपद्धती याबद्दल मार्गदर्शन केले.
सन्मान सोहळ्यात संस्थेचे सदस्य असलेले, जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे नवनिर्वाचित अशासकीय सदस्य संजय शुक्ल (भुसावळ), उदयकुमार अग्निहोत्री (चोपडा), महेश चावला, डॉ. अविनाश सोनगीरकर, अंतिम पाटणी, अॅड. मंजुळा मुंदडा (जळगाव), सुषमा चव्हाण (पहुरपेठ, जामनेर) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विभागनिहाय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार नाशिक विभागातर्फे महेश चावला, कोकण विभागतर्फे संदेश तात्या तुळसणकर (वैभववाडी), छ. संभाजीनगर विभागतर्फे सचिन कवडे, तर विदर्भ प्रांतच्या गोंदिया जिल्हा संघटक शारदा सोनकनवरे यांना स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कुलकर्णी (मुरुम, धाराशीव) यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संचालन ए. बी. महाजन यांनी केले, तर मेधा कुळकर्णी यांनी गायिलेल्या पसायदानाने राज्य अधिवेशनाची सांगता झाली. याप्रसंगी मुख्य संपादक श्यामकांत पात्रीकर यांनी संपादित केलेल्या ग्राहक न्याय विशेषांकाचे प्रकाशन अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले.