दखल
- डॉ. संजय कळमकर
Pralhad Keshav Atre आचार्य अत्रे हे एक शिक्षक होते. चांगले भाषांतरकार होते. त्यांचे लिखाण सोपे, सहज होते. त्यासंबंधीचा एक किस्सा विजय तेंडुलकर यांनी लिहून ठेवला आहे. १९६२ च्या निवडणूक निकालाच्या दिवशी अत्रे ‘मराठा'च्या कार्यालयात आले. त्यांच्या केबिनमध्ये तेंडुलकर गेले, तेव्हा अत्रे एकच वाक्य सारखे बोलत होते, ‘खलास! सगळे खलास! मराठा कशाला? काय उरले आहे? सगळे घरी जा. व्हॉट्स देअर? व्हॉट्स देअर टू फाईट फॉर? काही नाही... नथिंग थिंग'. तेवढ्यात ते दादरमधून जिंकल्याचा संदेश घेऊन कुणी तरी तिथे आला; पण अत्रे यांना आनंद झाला नाहीच. Pralhad Keshav Atre पुण्यात पराभूत झाल्याचे त्यांना जिव्हारी लागले होते. वक्तृत्वासोबतच लेखन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. शिवाय हे लेखन अचूक आणि योग्य असण्याकडे त्यांचे नीट लक्ष असे. तेंडुलकर हे सुरुवातीच्या काळात ‘मराठा'मध्ये काम करीत असत. एका इंग्रजी लेखाचे भाषांतर करण्याची जबाबदारी तेंडुलकर यांच्यावर आली. भाषांतर झाल्यानंतर अत्रेंकडे सोपविण्यात आले. Pralhad Keshav Atre काही वेळाने पहिल्या मजल्यावरील अत्रेंच्या केबिनमधून खालच्या मजल्यावरील कार्यालयात इंटरकॉम दणाणला आणि समोरून विचारले गेले, ‘तेंडुलकर आहेत का तेंडुलकर? वर पाठवा त्यांना.'
(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार !)
सूचनेबरहुकूम तेंडुलकर अत्रेंच्या केबिनमध्ये गेले. अत्रे म्हणाले, ‘हे तुमचे भाषांतर. काय हे, सगळे चुकले आहे. अगदी चूक. ही काय वाक्ये. हे शब्दप्रयोग काय, हे कुणाला कळणार?' तेंडुलकर सांगतात, एकेक लाल खूण केलेले उदाहरण घेऊन चूक पदरात घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. Pralhad Keshav Atre यापुढे अत्रेंनी तेंडुलकरांना सांगितले ते जास्त महत्त्वाचे आहे. अत्रे म्हणाले, भाषा सोपी पाहिजे. ‘इव्हन अ चाईल्ड शुड फॉलो इट.' ती कळली पाहिजे. तर उपयोग! नाही तर हे. सोपे लिहीत चला. छोटी छोटी वाक्ये. सुंदर सुंदर साधे शब्द. सुंदर शब्द मराठीत पुष्कळ आहेत, गाथेत आहेत. जुन्या काळातल्या बायका बोलतात तसे. बहिणाबाई वाचा. असे शब्द जगात दुस-या भाषेत नाहीत. तसे लिहिता आले पाहिजे. जे कळत नाही ते बोंबलायला कशासाठी लिहायचे? आचार्य अत्रे यांनी अनेक इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द दिले. Pralhad Keshav Atre महापौर, नगरसेवक हे शब्दही त्यांचेच. लिहिणे ही कायमच अत्रेंची जमेची बाजू राहिली. लेखनासंबंधातला असाच एक किस्सा मधुकर भावे यांनी लिहून ठेवलाय, विन्स्टन चर्चिल यांच्या निधनावेळीचा.
२४ जानेवारी १९६५ ची गोष्ट. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे, असा ठराव गोवा विधानसभेने एकमताने मंजूर केला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम पणजीच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला. हा सत्कार आचार्य अत्रेंच्या हस्ते ठेवण्यात आला. सभेनंतर आचार्य अत्रे मांडवीतल्या हॉटेलात मुक्कामी आले. Pralhad Keshav Atre जेवायला बसणार इतक्यात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या निधनाची बातमी आली. त्यांनी भरल्या ताटाला नमस्कार केला आणि जेवण बाजूला ठेवले. अत्रेंनी भावेंना ‘मराठा'च्या कार्यालयात फोन करायला सांगितला आणि फोनवरून संपूर्ण अग्रलेख सांगितला. दुस-या दिवशी म्हणजे २५ जानेवारीला ‘मराठा'मध्ये आलेला ‘सर विन्स्टन चर्चिल' हाच तो अग्रलेख! Pralhad Keshav Atre मुंबईच्या लोकसभेच्या १९६७ मधल्या निवडणुकीचा किस्सा सांगितला जातो. काँग्रेसचे नेते स. का. पाटील यांच्याविरोधात जॉर्ज फर्नांडिस उभे होते. स. का. पाटलांविरोधात फर्नांडिस यांच्यापेक्षाही आचार्य अत्रेंच्या जास्त सभा झाल्या होत्या. भावे सांगतात, ‘स. का. पाटलांना उद्देशून आचार्य अत्रेंच्या भाषणाची सुरुवात अशी असायची की, ‘हा लेकाचा सदोबा, लोकसभेत जायला म्हणतोय, याला मी शोकसभेत पाठवेन. मी १३ ऑगस्टला जन्माला आलो. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मधे एक वाईट गोष्ट घडावी म्हणून १४ ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले.' या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस ३० हजार मतांनी जिंकले.
आचार्य अत्रे हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता. पूर्वसूरींचे ऋण त्यांनी घेतले होते; पण ते त्या छायेत कायम राहिले नाहीत. याचे उत्तर अत्रे यांनीच दिले आहे. Pralhad Keshav Atre ते स्वतःला ‘जीवनाचा यात्रेकरू' म्हणत असत. कोल्हटकर, गडकरी यांचा विनोद झुळझुळता होता. काही अंशाने खळखळताही होता, याउलट अत्रे यांचा विनोद साक्षात धबधबा होता. तो नुसता वाहत नव्हता तर अक्षरशः कोसळत होता. अत्रे हे फक्त अत्रेच होते. ते संपन्न जीवन जगले. त्यांनी अफाट जग पाहिले होते. अखंड वाचन केले होते. आचार्य अत्रे यांना हे ‘भावबंधन' चांगले माहीत असल्याने आपला ‘अप्रकाशित गडकरी' हा ग्रंथ त्यांनी खोपोलीतील विहारी भागात राहिलेल्या दिघे यांना मोठ्या आदराने अर्पण केला होता. खंडाळ्याकडे जाताना ते पनवेलला एसटी स्टँडवर थांबून बुक स्टॉल बघत असत आणि एक एक म्हणता गाडीभर पुस्तके खरेदी करत असत. ही खरेदी इतकी मोठी असे की, आचार्य अत्रे यांना गाडीत बसल्यावर आपला देह संकुचित करून घ्यावा लागे. त्यांनी केले तसे अफाट वाचन अन्य कुणीही केले नसेल. ते एकाच विषयावर नसे. Pralhad Keshav Atre असंख्य विषय त्यांच्या मनात येत आणि ‘पुस्तके पार' केली जात. अत्रे यांनी वाचलेले सारे स्मरणात ठेवले आणि त्याच्या आधारे अंतरंगी वसत असलेला विनोद फुलवला. विनोद हीदेखील त्यांची जीवननिष्ठा होती. ती त्यांनी साहित्यातून सतत वाहती ठेवली होती. राखीवता त्यांना अमान्य होती. देत राहणे, सांगत राहणे, लोकप्रबोधन करणे हा त्यांच्या प्रकृतीचा ‘छंद' होता.
अत्रे हे उत्तम शिक्षक होते. त्यांच्यातला हा शिक्षक, ते ज्या ज्या क्षेत्रात गेले, त्या त्या क्षेत्रात त्यांच्याबरोबर होता. तो त्यांनी जागता ठेवला आणि त्याच्याच माध्यमातून विविध क्षेत्रे काबीज केली. विनोद आणि विनोदकार हे दोन विषय अत्रे यांच्या त्या प्रचंड देहात कायमचे ठाण मांडून बसलेले होते. म्हणूनच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांच्या विनोदावर तीन-तीन दिवस ते बोललेले आहेत आणि या दोन विषयांवर त्यांनी लिहिलेही आहे. Pralhad Keshav Atre अत्रे म्हणतात की, विनोदी माणूस हा फुलपाखरासारखा असतो. तो एका फुलावरून दुस-या फुलावर जातो. कधी रस चाखतो, कधी चाखत नाही. हसणे म्हणजे विनोद नव्हे. विनोदाचा आस्वाद घेता आला पाहिजे. विनोद म्हणजे चावटपणा नव्हे; विनोद म्हणजे गंमत नव्हे. दुःखाने भरलेल्या या विश्वात मानवाला मिळालेल्या विनोदाच्या महान देणगीमुळे तो जगत असतो. हास्य ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे आणि त्यावरच विनोदाची इमारत उभारली गेली आहे. विनोद हा माणसाचे दोष दाखवतो. माणसाच्या दोषांसकट असलेला चांगूलपणा मान्य करतो. सुख आणि दुःख यांच्यातील सुवर्णमध्य साधतो. विनोद हा सामाजिक रस असल्यामुळेच तो समाजात अधिक खुलतो आणि फुलतोही. हेच ‘इंगित' अत्रे यांनी नेमके ओळखले होते. म्हणूनच विनोदी काव्य (विडंबन), चित्रपट, नाटक आणि व्याख्यान यातून त्यांच्यातल्या यात्रेकरूने मनसोक्त फिरून घेतले आहे. Pralhad Keshav Atre लोक त्यावरच आसक्त झाले होते. साहजिकच त्यांचा विनोद प्रिय झाला. ‘जाम हशिवनारा मानूस' ही अत्रे यांची तयार झालेली प्रतिमा होती.
त्यांनी विसंगतीकडे, कुरूपतेकडे, मूर्खपणाकडे आणि छांदिष्टपणाकडे लक्ष वेधले. त्याच त्यांच्या वेधण्यातून त्यांचे साहित्य जन्माला आले आणि व्याख्यानातही त्याचेच नेहमी ठळक असे रूप आणि सौंदर्य प्रत्ययाला आले. मुख्य म्हणजे अत्रे रसिक होते. त्याच भावनेने ते जगाकडे डोळसपणे पाहत गेले. अत्रेंच्या निधनाच्या दुस-या दिवशी म्हणजे १४ जून १९६९ रोजी गोविंद तळवळकर यांनी अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, महाराष्ट्राच्या दगड-धोंड्यांवर, नद्या-डोंगरांवर अतोनात प्रेम करणा-या आचार्य अत्रे यांच्या निधनाने पहाडाचा कडा कोसळला, असेच म्हणावे लागेल. Pralhad Keshav Atre त्यांनी विनोद ही एक शक्ती मानून भल्याभल्यांची भंबेरी उडवून दिली होती; तर त्याच माध्यमातून त्यांनी अनेकांना हास्यास्पदही बनवले होते. ते इतके की त्यांना तोंड काढायलाही जागा उरली नव्हती. या काळात अत्र्यांच्या हाती ‘मराठा' आणि ‘नवयुग' ही दोन पत्रे होती. राजकीय जीवनात त्यांच्या विनोदाला खरेखुरे गदेचे रूप आले आणि विनोदात केवढी मोठी शक्ती असते, याचा मराठी माणसालाही चांगला प्रत्यय आला. अत्रे हे एकाच वेळी पत्रकार होते, नाटककार होते, वक्ते होते, समीक्षक होते, दिग्दर्शक होते, विनोदकार होते. Pralhad Keshav Atre ते काय नव्हते? सर्व काही होते! त्यांच्या एकाच व्यक्तिमत्त्वात ही सारी रूपे एकवटून राहिली होती. विशेष हे की, या सर्वांचेच एकमेकांशी घनिष्ठ नातेही होते.