- जातीय दंगली आणि दूरदृष्टीचा अभाव
लॉर्ड माउंटबॅटन यांचे माध्यम सल्लागार राहिलेल्या अॅलन कॅम्पबेल जोहान्सन यांनी ‘मिशन विथ माउंटबॅटन’ नावाचे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी 1 जून 1947 रोजी आपल्या आईला एक पत्र लिहिल्याचा उल्लेख केला आहे. ‘येथे (तत्कालीन अखंड हिंदुस्थान) आम्ही महत्त्वाच्या घटनांच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि माउंटबॅटनच्या सत्ता हस्तांतरणाच्या ऐतिहासिक घोषणेच्या प्रचार व्यवस्थेला अंतिम रूप देण्याच्या कामात सतत मग्न आहोत.
वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे आणि जर निकाल India Partition फाळणीच्या बाजूने आला- तो निश्चित आहे- तर मोठ्या प्रमाणात जातीय दंगली होऊ शकतात’, असे अॅलन जोहान्सन यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. त्यांनी पुढे लिहिले, ‘संताप अंतरिम आणि परस्पर आहे. ब्रिटिश आज हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्ये जेवढे लोकप्रिय आहेत तेवढे पूर्वी कधीच नव्हते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.’ यानंतर जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख करीत त्यांनी लिहिले की, नेहरू म्हणतात की, मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तान देऊन ते त्यांच्यापासून आपली सुटका करून घेतील. ते म्हणायचे, मस्तक कापून घेऊन आम्ही डोकेदुखीपासून कायमची सुटका करून घेऊ. त्यांचा हा दृष्टिकोन दूरदृष्टीचा वाटत होता. कारण एकामागून एक मागण्या मान्य केल्याने जिना यांची भूक अधिकाधिक वाढतच होती. या पत्रातून चार बाबी समोर येतात-
1. स्वातंत्र्य आणि सत्तेचे हस्तांतरण यात काय फरक होता, इंग्रज याला सत्ता हस्तांतरण का म्हणत होते?
2. फाळणीच्या आधीपासून प्रत्येकाला याची कल्पना होती की, मोठ्या प्रमाणात जातीय दंगली होऊ शकतात. मात्र, तरीही त्या रोखण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत?
3. ज्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी सर्वस्व अर्पण केले, बलिदान दिले आणि तुरुंगात गेले, त्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे नेते 1947 मध्ये इंग्रजांचे मित्र बनले?
4. जवाहरलाल नेहरूंसाठी फाळणी हा एक खेळ होता का? त्यांनी फक्त जिनांपासून सुटका करवून घेण्यासाठी अर्थात जिनांची कटकट कायमची मिटविण्यासाठी देशाची फाळणी केली? जातीय दंगलीच्या माध्यमातून माणसातील पशुवृत्ती जागी होऊन सर्वत्र भयानक हिंसाचार सुरू होता. मृतदेहांचा सर्वत्र खच पडला होता.
‘विभाजन-गरिबी और शानशौकत’ या पुस्तकात त्याच काळातील एक प्रसंग नमूद केला आहे. खरे तर त्या काळात व्हाईसरॉय भवनात म्हणजे आजच्या राष्ट्रपती भवनात बैठकांचे सत्र सातत्याने सुरू होते; ज्यामध्ये काँग्रेससह मुस्लिम लीगचे सर्व बडे नेते सामील होत होते. कॅम्पबेल-जोहान्सनच्या म्हणण्यानुसार, हे सर्व नेते अमेरिकन बनावटीच्या कारमधून बसून येत असत.
5. स्वातंत्र्याच्या नावाखाली महागड्या गाड्यांचा शौक कितपत न्याय्य आहे? वास्तविक हा काळ भारताच्या इतिहासातील सर्वात दारिद्र्याचा काळ होता. आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे की, जवाहरलाल नेहरू सहसा रोल्स रॉयल्समधूनच प्रवास करीत असत. ही कार एलिझाबेथने माउंटबॅटन यांना भेट म्हणून दिली होती आणि माउंटबॅटन यांनी नेहरूंना.
पंडित माउंटबॅटन की जय!
आता थेट 15 ऑगस्ट 1947 च्या दिवसाकडे येऊ. या दिवशी भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता. अॅलन कॅम्पबेल-जोहान्सन लिहितात की, त्या दिवशी दिल्लीच्या रस्त्यावर ‘जय हिंद’, ‘माऊंंटबॅटन की जय’ आणि ‘पंडित माउंटबॅटन की जय’च्या घोषणा दिल्या जात होत्या.
6. या दिवशी, भारत निश्चितपणे आपले स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत होता. परंतु, देशाचा एक मोठा भाग विस्थापन आणि भीषण फाळणीचा सामना करीत होता. असे असूनही या अमानुष क्रौर्याला जबाबदार असलेल्यांच्या बाजूने घोषणा देणारे लोक कोण होते? ते काँग्रेसचे लोक होते का?
भयावह फाळणी
स्वातंत्र्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 20 ऑगस्ट रोजी, अॅलन कॅम्पबेल-जोहान्सन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की, दोन लाख लोक तात्पुरत्या विस्थापित छावण्यांमध्ये अडकले होते आणि अशा परिस्थितीत राहत होते की, मोठ्या प्रमाणावर कॉलराचा उद्रेक कधीही होऊ शकतो. भारताच्या या धर्मावर आधारित फाळणीने मानवी इतिहासातील सर्वात मोठी विस्थापन परिस्थिती निर्माण केली होती. India Partition 1941 च्या जनगणनेत, अविभाजित पंजाबची लोकसंख्या 34,309,861 होती आणि बंगालची एकूण लोकसंख्या 61,460,377 होती. भारताच्या फाळणीचा सर्वाधिक फटका याच दोन प्रांतांना प्रचंड प्रमाणात बसला. त्या काळात एका रात्रीत सुमारे 10 कोटी लोकांचे सामान्य जीवन अडचणीत आले.
अॅलन कॅम्पबेल-जोहान्सन लिहितात की, 21 सप्टेंबर 1947 रोजी सकाळी गव्हर्नर जनरलच्या डकोटा विमानाने लॉर्ड माउंटबॅटन, इस्में, व्हर्नन, अॅलन कॅम्पबेल-जोहान्सन (स्वतः लेखक), नेहरू, पटेल, नियोगी, राजकुमारी अमृत कौर, जनरल लॉकहार्ट, एच. एम. पटेल आणि व्ही. शंकर यांनी पूर्व आणि पश्चिम पंजाबचा दौरा केला.
- भयंकर उलथापालथीचा पहिला अनुभव या मंडळींना भटिंडा गाठल्यावर आला. ते मोठे रेल्वे स्टेशन आहे. माणसांनी खचाखच भरलेल्या दोन गाड्या स्टेशनवर उभ्या होत्या. काही निर्वासित डब्यांच्या छतावर होते, काही खिडक्या आणि पायर्यांवर (फूटबोर्ड) लटकले होते आणि काही तर थेट इंजिनवर चढले होते.
- फिरोजपूरला पोहोचल्यावर पुन्हा विस्थापितांनी खचाखच भरलेल्या अशाच गाड्या या मंडळींना दिसल्या.
- रावीला पोहोचल्यावर, लोक-समुदायाच्या या भयंकर उन्मादाचे अक्राळविक्राळ दृश्य आमच्या निदर्शनास आले. आम्ही जे पाहत होतो ते मानवी इतिहासातील सर्वात मोठे निष्कासन (निर्गमन) होते.
- निर्वासितांच्या पहिल्या ताफ्याची झलक या चमूने फिरोजपूर येथे पाहिली. त्याचा पाठलाग करीत हे लोक विमानाने रावी नदीच्या पलीकडे खूप दूरपर्यंत गेले. विस्थापितांच्या या प्रवाहाबरोबर ते सुमारे 50 मैलपर्यंत पुढे गेले; पण त्याचा अंत सापडला नाही.
- लायलपूर-लाहोर रस्त्यावर मुसलमान विस्थापितांचा ताफा संथगतीने जाताना दिसला. ताफ्याच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत उड्डाण करण्यासाठी या मंडळींना 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. तर लेखकाच्या मते, त्याच्या विमानाचा वेग ताशी 180 मैल इतका होता. अशा प्रकारे हा ताफा अर्थात काफिला किमान 45 मैल लांब असावा. (45 मैल आजच्यानुसार अंदाजे 72 किलोमीटर आहेत.) हे विस्थापनाचे अधिकृत सर्वेक्षण होते. त्यामुळे ते महत्त्वाचे आहे असे नसून त्या काळाची परिस्थिती किती भीषण असेल, याचा अंदाज घेता येतो. सर्वप्रथम, हे लक्षात घ्यावे लागेल की, ही भेट 21 सप्टेंबर रोजी झाली, म्हणजे फाळणीनंतर 38 दिवसांनी. यावरून फाळणीच्या जखमा काही दिवस नव्हे तर महिनोन्महिने भळभळत होत्या, याचा अंदाज करता येतो.
7. या भीषण फाळणीच्या इतक्या दिवसांनंतर हवाई सर्वेक्षण का करण्यात आले? फाळणीपूर्वी आणि त्यानंतर ब्रिटिशांसोबत रात्रीचे जेवण, दुपारचे भोजन आणि सकाळच्या न्याहारीत कोण कोण सहभागी होते?
India Partition फाळणीची शोकांतिका थांबवता आली असती का? याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स येथे झालेली चर्चा पाहावी लागेल. खरे तर त्या दिवशी ब्रिटिश पंतप्रधान क्लेंमट अॅटली यांनी जून 1948 पूर्वी हिंदुस्थान सरकारकडे सत्ता सोपविली जाईल, असे सांगितले. या कार्यासाठी त्यांनी माउंटबॅटन यांची निवड केली. त्यांनी त्याच दिवशी सभागृहात सांगितले की, वॅव्हेल (तत्कालीन गव्हर्नर) राजीनामा देतील आणि त्यांच्या स्थानी माउंटबॅटन येतील. या संदर्भात आणखी एक पुस्तक उपलब्ध आहे. त्याचे नाव आहे ‘द लास्ट डेज ऑफ द ब्रिटिश राज.’ या पुस्तकाचे लेखक आहेत लियोनार्ड मोसली. ते ब्रिटिश पत्रकार आणि इतिहासकार होते. त्यांनी सुमारे 31 पुस्तके लिहिली होती. ते लिहितात, “Mountbatten believed in driving things through, by short cuts if there were any. He approached the problem of Indian independence by June 1948 rather in the manner of a time-and-motion-study expert who has been called into a factory to knock off the wasteful minutes and get out the product before the target date.”
खरं तर, माउंटबॅटन सतत घाई करणारे व्यक्ती होते आणि आपला वेळ वाया जाऊ नये, याची त्यांना जास्त काळजी होती. या कारणास्तव, भारताच्या फाळणीला आणि त्याच्या शोकांतिकेला माउंटबॅटन सर्वात जास्त जबाबदार होते. मोसेलीने आपल्या पुस्तकात एक किस्सा सांगितला आहे. माउंटबॅटनच्या नावाची घोषणा झाल्यावर सरदार पटेलांनी आपल्या माणसांकडून अहवाल मागवला. तेव्हा त्यांना कळले की, माउंटबॅटन हे क्रांतीकडे ओढा असलेले उदारमतवादी कुलीन होते, असे नोंदवले गेले. सरदार पटेलांची प्रतिक्रिया होती - जवाहरलालजींना एक खेळणे मिळून जाईल, तोपर्यंत आम्ही क्रांतीची व्यवस्था करू. इंग्रजांनी भारत सोडण्याची तारीख 1 जून 1948 हीच का ठरवली? त्यासाठी भारतीय नेत्यांना आणि जनतेला विचारण्यात आले होते का? तर, त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. मोसली लिहितात की, ही तारीख ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनी नाही तर माउंटबॅटन यांनी ठरवली होती, तीही त्यांच्या वैयक्तिक योजनेनुसार. तेव्हा प्रश्न असा आहे की, ती वैयक्तिक योजना काय होती? याचे उत्तर आपल्याला अॅलन कॅम्पबेल-जोहान्सन यांच्या ‘मिशन विथ माउंटबॅटन’मध्ये मिळते. या पुस्तकानुसार, अॅटली यांनी डिसेंबर 1946 मध्ये माउंटबॅटन यांना भेटीसाठी बोलावले होते आणि त्यांना वेव्हेल यांच्याजागी पुढील व्हाईसरॉय म्हणून येण्यासाठी आमंत्रित केले. तेव्हा माउंटबॅटन यांना ब्रिटिश नौदलात सामील व्हायचे होते. त्यांना प्रथम क्रूझर स्क्वॉड्रनची कमान म्हणून रियर अॅडमिरल बनायचे होते. त्यामुळेच सुरुवातीला माउंटबॅटन व्हाईसरॉय होण्यास तयार नव्हते.
India Partition माउंटबॅटनच्या या वैयक्तिक इच्छेच्या मार्गात अॅटली आले. मोसली लिहितात की, अॅटली यांनी माउंटबॅटनची समजूत काढली आणि पुढील दोन वर्षांत भारताकडे सत्ता सोपवली जाईल व भारताला स्वातंत्र्य सोपविल्यानंतर ते नौदलात सामील होऊ शकतात, असे त्यांना सांगितले. यावर माउंटबॅटन उत्तरले की, दोन वर्षे नौदलापासून दूर राहणे खूप जास्त होईल. पंतप्रधान अॅटली यांनी विचारले की, नौदलात त्यांची स्थिती, प्रगती क्रम आणि संधी सुरक्षित असल्यास ते किती काळ सेवा करू शकतात. माउंटबॅटन यांनी या संदर्भात वेळ मागितला आणि आपल्या मित्रांसह राजाला भेटले. दुसर्या दिवशी माउंटबॅटन पुन्हा पंतप्रधान अॅटली यांना भेटले आणि सांगितले की, ते आपण हे काम 12 महिन्यांत पूर्ण करू. त्यानुसार मार्च 1947 मध्ये माउंटबॅटन भारतात आले आणि त्यांनी पुढील पाच महिन्यांत भारतातील सत्तेचे हस्तांतरणाचे काम पूर्ण केले. मोसली लिहितात की, माउंटबॅटनसोबत आलेल्या इस्मे यांना माउंटबॅटनला असलेल्या घाईची पूर्ण माहिती होती. इस्मेने विन्स्टन चर्चिल यांना आपल्या भारत दौर्याविषयी सांगितले होते. चर्चिलने त्यांना सांगितले की, तू जाऊन मूर्खपणा करशील. तुला काहीही मिळणार नाही.
माउंटबॅटन रँक आणि पदवीसाठी भारतात जाणार आहेत. हे लोक भारताला स्वातंत्र्य देत नव्हते तर भारतातून स्वत:ची सुटका करून घेत होते. ज्याची किंमत फाळणी आणि जातीय दंगलींसह मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या नरसंहाराच्या रूपात चुकवावी लागली.
8. वेव्हेलऐवजी माउंटबॅटनसारख्या उतावळ्या व्यक्तीला का पाठविण्यात आले? त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि ते कदाचित या कामासाठी योग्य व्यक्तीही नव्हती. त्यामुळे त्या इंग्रजांचे कारस्थान आणि गुपिते उघड करावीच लागतील.
संकलन : अभिजित वर्तक
9422923201