शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ।अशुभ मंगळ मंगळाचें॥

13 Aug 2023 04:00:03
तुका आकाशाएवढा
समाजात असे अनेक लोक आहेत की, ते काहीच श्रम करायला तयार नसतात. ऐतखाऊ वृत्ती त्यांच्यामध्ये ठासून भरलेली असते. परंतु प्रत्येक वेळी असे मिळेलच हे काही सांगता येत नाही. मग उदरनिर्वाह तरी कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. मग एखाद्या कल्पित गोष्टीच्या आधारावर मनात भीती घालवून देण्याचे काम करताना दिसतात. अंधश्रद्धा समाजात भरपूर पसरलेली असल्याने तोच आधार घेऊन भीती दाखवून दुसर्‍यांना फसविण्यातच हे लोक स्वत:ला धन्य मानत असतात. चुकीच्या गोष्टी सांगून आपलं हित साधण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला सर्व काही समजतं असं भासविण्याचा प्रयत्न करीत असतात. समाजाकरिता अत्यंत घातक वृत्तीचे असल्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याकरिता संत तुकाराम महाराजांनी कुणाचीही लुबाडणूक होऊ नये, असे त्यांना वाटत होते.
 
 
tukara m
 
अज्ञानाचेही प्रमाण भरपूर असल्यामुळे चुकीचे सांगून फसविण्यात हे लोक माहीर होते. त्यामुळे अशा लोकांचा बंदोबस्त करण्याच्या हेतूने खरे काय आहे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. सत्य काय आहे व असत्य काय आहे, हे त्यांनी दाखवून दिले. निसर्गापेक्षा कुणीही मोठं नाही. निसर्गानं ठरवलं तर ते कुणीही थांबवू शकत नाही. त्याच्या अफाट शक्तीपुढं कोणाचाही टिकाव लागत नाही. म्हणून अशा ढोंगी लोकांच्या नादी न लागता शुभ-अशुभ न करत बसता सर्व काही शुभच आहे. केवळ आपल्या मानसिकतेचा तो परिणाम आहे. मनातला नकारात्मक भाव काढून टाकण्याचा सल्ला महाराजांनी दिलेला आहे. अशा या आशयाचा हा अभंग असून त्याच्या माध्यमातून जनजागृती करताना Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज म्हणतात की,
 
शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ।
अशुभ मंगळ मंगळाचें॥
हातींचिया दीपें दुरावली निशी।
न देखिजे कैसी आहे ते ही॥
सुख दु:खाहूनि नाहीं विपरीत।
देतील आघात हितफळें॥
तुका म्हणे आतां आम्हासीं हें भलें।
अवघेचि झाले जीवजंत॥
अ. क्र. 1930
 
बरेच लोक फसविण्याचा हेतू मनात ठेवून चुकीचे सांगत असताना दिसतात. त्यांना हे माहीत असते की, काहीही होत नाही. परंतु समोरच्याच्या मनात अशी काही भीती घालवून द्यायची की, ते आपल्या म्हणण्याप्रमाणेच वागले पाहिजेत. अशी भीती निर्माण करून फसवणूक करतात. सर्वच दिवस शुभ आहेत. अशुभ काहीच नाही. आहे त्या गोष्टीकडे आपला द़ृष्टिकोन कसा आहे त्यावर सर्व अवलंबून असतं. जसे उजेडात आपल्याला स्पष्ट दिसते; मात्र अंधारात तेवढे स्पष्ट दिसत नाही. म्हणून रस्त्यात पडलेली दोरी ही रात्री साप म्हणून तर दिवसा दोरी म्हणून तिच्याकडे आपण पाहत असतो. हे ज्ञान व अज्ञानामुळे घडत असते. हे संत तुकाराम महाराजांना माहीत होते. म्हणून आपल्या मनातली भीती घालवून देण्याकरिता ते जनसामान्यांना सावध करीत होते. म्हणूनच महाराज म्हणतात की, सर्वच दिशा आणि काळ हा शुभ झाला असून तुम्ही त्याला उगीचच अशुभ म्हणत आहात. आपली वाटचाल जर दिवसेंदिवस प्रगतीकडे जात असताना दिसते. तर अशी शंका का आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे. तुम्ही ज्याला अशुभ समजता त्या म्हणजेच मंगल आहेत, हे लक्षात असू द्या. हे सर्व आपण आपल्या सोईनुसार ठरवत असतो. असे जर असते तर छत्रपती शिवाजी महाराजांना गडकिल्ले आपल्या ताब्यात घेताच आले नसते. त्यांनी कधी काळ, वेळ, शुभ, अशुभ, दिशा यांचा कधी विचार केला नाही. दर 15 दिवसांनी अमावास्या व पौर्णिमा ॠतुचक्राप्रमाणे येणारच; त्यामध्ये आपण बदल करूच शकत नाही. पौर्णिमा शुभ तर अमावास्या अशुभ मानण्याची आपण मानसिकता करून बसलो. परंतु असे काहीच नाही. उलट महाराजांनी अमावास्येच्याच रात्री अनेक किल्ल्यांवर चाली करून आपल्या ताब्यात घेण्यात ते यशस्वी ठरले. स्वराज्याची स्थापना त्यांना करता आली. ही बाब आपण लक्षात घ्यायलाच पाहिजे. परंतु, मानवी मन असे आहे की, एखादं काम आपल्याला जर करायचं नसेल तर आपण असेच काही कल्पित गोष्टी सांगून ते टाळत असतो. उद्दिष्ट गाठायचे असेल तर अंधश्रद्धा सोडून द्यायलाच पाहिजे. आज 21 व्या शतकातील एक गमतीदार उदाहरण पाहू. शिक्षितांचे प्रमाण 80 टक्क्यांवर असताना अनेकजण आजही शुभ-अशुभ पाळताना दिसतात. यामध्ये विशेष म्हणजे उच्चशिक्षितांचे प्रमाण भरपूर आहे. विज्ञानाने खूप प्रगती साधलेली आहे. खरं काय व खोटं काय हे समजत असूनसुद्धा अशा वृत्तीकडे आपण वळत आहोत. जसे आज अनेक लहान-मोठे दवाखान्यांच्या इमारतीला नजर लागू नये म्हणून कवळी, बिबा, हिरवी मिरची एका दोर्‍यात ओवून कुठल्या तरी कोपर्‍यात बांधलेली दिसते. काय म्हणावं या मानसिकतेला. वास्तविक पाहता ज्यांच्याकडून असे करण्याची अपेक्षा नाही, उलट त्यांनी समाजाला समजावून सांगावं; परंतु परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. एवढंच नाही तर अनेकांचे भविष्य खुलेआम सांगणार्‍यांचं तरी कुठं खरं ठरतंय. तरीसुद्धा मोठ्या चवीनं भविष्य पाहून घेणार्‍यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.
 
 
नेमकं आपण कोणत्या शतकात आहोत हेही कळत नाही. पुढे जात आहोत की मागं? हेही नीट लक्षात येत नाही. इलेक्ट्रॉनिक मीडिया आज असं भविष्य सांगण्यात मागे दिसत नाही. उलट असं भविष्य सांगून अनेकांची होणारी फसगत टाळण्यासाठी त्या-त्या माध्यमांनी अशा प्रकारचं भविष्य सांगणं बंद करावं. वाईट तर याचं वाटतं की, हे बंद करण्याचा निर्णय होत नाही; उलट मोठ्या समारंभात असं भविष्य वर्तविणार्‍याचा पुरस्कार देऊन गौरव होताना दिसून येते. काय म्हणावं या मानसिकतेला? वास्तविक पाहता आपल्या सोईनुसार, उपलब्ध असलेल्या परिस्थितीनुसार विज्ञानाचा आधार घेऊन कार्य केल्यास यश निश्चितच आपणालाच मिळणार, यात शंकाच नाही. उलट असे वागल्यास कुणालाही विचारावयाची आवश्यकता भासणार नाही. सध्याचे एक गमतीदार उदाहरण असे आहे की, जगात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्व जग गुडघ्यावर आले. अनेकांचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळसुद्धा धोक्यात आला होता. Saint Tukaram Maharaj आता शुभ-अशुभ सांगणारे या अंधारात गडप झाले. केवळ आपल्या स्वार्थाकरिता अनेकांना फसविणारे असल्याचेच लक्षात आले. त्यांनी काढलेले शुभ मुहूर्त; मग ते कोणत्याही कार्याचे असो; ते सर्वच्या सर्व निकामी ठरले. सर्व व्यवहार ठप्प झाले. या घटनेवरून तरी आपण धडा घेतला पाहिजे की, अशुभ काहीच नाही, सर्व काही शुभच आहे. अशुभ आहे असे सांगणार्‍यांना सर्व समाज स्तरांतून विरोध दर्शविला गेला पाहिजे तरच कुठे या अनिष्ट प्रथा बंद होऊन तिला मूठमाती देण्यास आपण समर्थ ठरणार आहोत. व्यवहार धर्म, नीतीने केल्यास तोटा होण्याचे कारणच नाही. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी फायदाच दिसेल. हाच खरा आयुष्यातला चमत्कार!
 
 
या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास महाराजांनी केलेला उपदेश सत्य ठरतो की, ज्याला तुम्ही अशुभ समजता ते अशुभ नसून शुभ आहे. त्या बाबी आमच्याकरिता मंगलमय आहेत. उत्साह वाढविणार्‍या आहेत. जीवनात उन्नती करायची असेल तर आपल्यास चांगल्या परिवर्तनाची संगत करावीच लागेल. कारण आपल्यात चांगले बदल अपेक्षित असल्यास त्याकरिता आपल्यालाच मन:पूर्वक प्रयत्न करावेच लागतील. म्हणूनच आपल्या जीवन प्रवासात भरपूर उजेड म्हणजेच उत्तम प्रगती साधावयाची असेल तर त्याकरिता प्रयत्न करावेच लागतील. शुभ-अशुभ हा भेद मानणारे हे अज्ञानी लोक असतात. शुभ-अशुभ हा भेद सोडून द्यावा लागेल आणि प्रयत्नांच्या भरवशावर अपयशाला मागे सारण्यात मग कुणीच अडवू शकणार नाही. हे जे काही चांगले दिवस आपल्या वाट्यावर आलेत ते आपल्यातील सकारात्मक विचार असल्याने नकारात्मकतेवर मिळविलेला विजय आहे. असा हा ज्ञानाचा लख्ख प्रकाश धर्म, नीतीने केलेल्या कार्याचा प्रभाव आहे. कुठल्याही काल्पनिक कथेचा आधार न घेता सकारात्मक, विवेकी बुद्धीने केलेल्या विचाराचे फळ आहे. हे केवळ सकारात्मक प्रयत्नाला सातत्य, सराव, प्राप्त परिस्थितीमध्ये आलेली अनुभूती श्रेष्ठ ठरली असल्यामुळे मनातील नकारात्मक द़ृष्टिकोन नाहीसा होऊन अशुभ ते शुभ ठरलेलं दिसत आहे. Saint Tukaram Maharaj एवढं सामर्थ्य हे माणसाच्या कर्तृत्वात असल्यामुळे अशुभाचं शुभ होण्यास वेळ लागत नाही. संकट आल्याशिवाय माणसाला शहाणपण येत नाही. निंदकाचा शेजार असल्याशिवाय चांगल्या वृत्तीची ओळख होत नाही. आज ज्या गोष्टी नकारात्मक वाटतात, आपल्या हिताच्या वाटत नाही म्हणून त्याच्या लांब न राहता त्यामध्ये बदल कसा घडवून आणता येईल असा प्रयत्न केल्यास त्याचे चांगल्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणण्याकरिता स्वत:मध्ये बदल घडवून अशुभाचे शुभ होण्यास मदत होईल. जसे संत गाडगेबाबांनी जनसामान्यांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता स्वच्छतेचा मूलमंत्र देताना गावाची स्वच्छता स्वत: करून अशुभ असणारे कार्य शुभ करून दाखविले. मग प्रत्येकाने आपला परिसर, गाव, घर आपल्याच आरोग्याकरिता नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे, अशी त्यांची मानसिकता तयारी झाली व त्या दिशेने वाटचाल करून आरोग्य चांगले ठेवण्यात यश मिळाले. सुरुवातीला अशुभ वाटणारे काम शुभ असल्याचे सर्वसामान्य जनतेने मान्य केले. यावरून लक्षात येते की, स्वत:मध्ये सकारात्मक बदल केला की, बाकी गोष्टींमध्ये बदल होताना जाणवतो. असे बदल झाल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होतो. त्यामुळे सुखा-समाधानाने, उत्कटतेने, आनंदाने जगावं असे सर्वांनाच वाटल्यास त्यात नवल नाही. मनातील अशुभपणा काढून टाकल्यास मग जगातील सर्वच जीवजंतूंना चांगल्या द़ृष्टीने पाहण्याची ताकद येऊन सकारात्मक विचारामुळे सर्वांचेच भले म्हणजे चांगलेच होतेे. समाजातील अनिष्ट प्रवृत्ती काढून टाकल्या पाहिजे. तेव्हा कुठं समाज निकोप राहून उन्नती करू शकतो. असा हा अत्यंत प्रेरणादायी विचार असून भेदाभेद नष्ट करून सर्व शुभ आहे, अशुभ काहीच नाही, असा हा प्रेरक विचार देण्यात महाराज यशस्वी झाले असून तो विचार आजही कसोटीला उतरताना दिसत आहे.
-प्रा. मधुकर वडोदे 
-9422200007 
Powered By Sangraha 9.0