गोंदिया-गडचिरोलीत हत्ती अभयारण्य ?

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव

    दिनांक :24-Aug-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात (Elephant sanctuary) वन्य प्राण्यांना पोषक वातावरण आहे. गत वर्षी पश्चिम बंगालमधून आलेले हत्तींवे कळप दोन्ही जिल्ह्यांतील जंगलांमध्ये स्थिरावले आहे. याच अनुषंगाने गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील पहिले हत्ती अभयारण्य स्थापन करण्याचा प्राथमिक प्रस्ताव मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक जयराम गौडा यांनी सांगितले.
 
Elephant sanctuary
 
गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना वन वैभव लाभले आहे. (Elephant sanctuary) हत्ती अभयारण्य स्थापन करण्यासाठी या जिल्ह्यात अनुकूल स्थिती आहे. त्यासाठी कुठल्या उपाययोजना आणि सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे, प्रकल्पाचे फायदे-तोटे आदी बाबींचा अभ्यास केला जाणार आहे. प्रकल्पासाठी किती निधी लागेल, अभयारण्य स्थापन करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज गरज आहे, यासंदर्भातील प्राथमिक प्रस्ताव तयार करून तो राज्याच्या मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्तावाला मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळ व नंतर केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यातील वैभवात भर पडणार आहे. व्याघ्र प्रकल्पासह हत्ती अभयारण्याची जोड मिळणार आहे.
 
 
वषभरापुर्वी ओडिशाहून छत्तीसगडमार्गे (Elephant sanctuary) गडचिरोलीतील जंगलात 23 हत्तींचा कळप दाखल झाला. त्यानंतर कळपाने गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांतील काही भागांत धुमाकूळ घातला. गोंदिया जिल्ह्यात या हत्तींच्या कळपाने येरंडी येथील एका शेतकर्‍याचा बळीसुद्धा घेतला. काही पाड्यांची नासधूस केली. शेकडो एकरातील धानपिकाचे नुकसान केले होते. हा कळप परत ओडिशात जाईल, असा कयास होता पण वर्षभरापासून तो याच भागात स्थिरावला आहे. हत्तींची येथे वारंवार होणारी हालचाल लक्षात घेता, हत्ती राखीव विभागाला अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत होईल. त्याच दृष्टिकोनातून हत्ती अभयारण्य स्थापन करण्याचा विचार केला जात असल्याचे सांगीतले जाते.
 
हत्ती अभयारण्य (Elephant sanctuary) स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर पर्यटनास चालना मिळणार, त्यातून रोजगार निर्मिती व आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाची मंजुरीची प्रतीक्षा आहे. प्रकल्पासाठी गोंदिया, गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याचे सीमांकन केले जाणार आहे. हत्ती अभयारण्यासाठी 4 हजार किमीपेक्षा अधिक क्षेत्र प्रस्तावित केले आहे.
- जयराम गौडा, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक