सुभाष बागेत गवताचे कुरण?

31 Aug 2023 18:21:07
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
Subhash Bagh नगर परिषदेद्वारे संचालित सुभाषचंद्र बोस बागेची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली आहे. येथे फेरफटका व मनोरंजनासाठी येणार्‍या आबालवृद्धांना गवताच्या कुरणात आल्याचा अनुभव मिळत आहे. शहरात नगर परिषदेने चार उद्यानाची निर्मिती केली आहे.

Subhash Bagh 
 
यातील सुभाष बाग हे जुनी व सर्वात मोठी बाग आहे. हे उद्यान सुमारे पाच एकर क्षेत्रात असून बागेत नैसर्गिक वातावरण निर्मितीसोबतच बालकांसाठी खेळण्याचे साहित्य, पाण्याचे कारंजे, बैठक व्यवस्था, कुटी, व्यायाम साहित्य आदीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे येथे दररोज सकाळी व सायंकाळी लहान बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ राहते. मात्र या सर्व सोयीच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने बागेत येणार्‍या नागरिकांचा हिरमोड होत असल्याची ओरड नेहमीच होते. विशेष म्हणजे, बागेचा स्वच्छतेचा प्रश्‍न नेहमीच बोलला जातो. Subhash Bagh बागेच्या स्वच्छतेसाठी मोठा निधी खर्च केला जात असला तरी बागेतील अस्वच्छतेचा सामना शहरवासीयांना करावा लागतो. पावसाळ्यात गुडग्याभर गवत वाढत असल्याने गवताच्या कुरणात आल्याचा अनुभव नागरिकांना येतो. यंदाही तीच परिस्थिती असून वाढलेल्या गवतात कीटक, सरपटणारे प्राण्यांमुळे बागेत येणार्‍या नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या सर्व प्रकाराकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
 
 
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
बागेतील असामाजिक तत्वांवर नजर ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र मागील वर्षभरापासून हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने बागेचा सुरक्षेचा प्रश्‍नही वार्‍यावर असल्याचे चित्र आहे.
Powered By Sangraha 9.0