त्याग, तपस्या, कटिबद्धता ही तरुण भारतची शक्ती

31 Aug 2023 20:51:45
नागपूर, 
Nitin Gadkari : त्याग, तपस्या, कटिबद्धता ही तरुण भारतची शक्ती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. दै. तरुण भारतचा (Tarun Bharat) वर्धापन दिन तसेच ‘मधुकर भवन’च्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, 1975च्या आणिबाणीच्या आधी व नंतरचा काळ, तरुण भारतचे एकंदरीतच आयुष्य संघर्षाचेच होते. गांधी हत्येनंतर अपमान, अत्याचार तरुण भारतला सहन करावा लागला. नरकेसरी अभ्यंकर यांनी तरुण भारतची स्थापना केल्यानंतर ग. त्र्यं. माडखोलकर यांनी सामाजिक, वैचारिक अधिष्ठान दिले. बाळासाहेब देवरस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी कार्य केले.
 
Nitin Gadkari
 
विशेषतः तरुण भारतमध्ये जे संपादकीय लिहिले जाते, सर्वच लहानपणापासून वाचत आले आहेत. मा. गो. वैद्य, दि. भा. घुमरे, लक्ष्मणराव जोशी आणि आतापर्यंत अग्रलेखांंचा दर्जा तसाच आहे. अग्रलेख ही तरुण भारतची सर्वात मोठी संपत्ती आहे. परिस्थितीवर अतिशय रोखठोक, स्पष्ट, मूल्यांकन तरुण भारतमध्ये विशेष रूपाने दिसते. मो. ग. तपस्वी, रवींद्र दाणी यांचे दिल्लीचे वार्तापत्र वाचल्याशिवाय राहवत नाही. तरुण भारत महिला, पुरुष, तरुणांना आयुष्याची दिशा देणारे आहे. तरुण भारतची सर्वांत मोठी कमिटमेंट ही राष्ट्रवादी विचारांची होती. रामजन्मभूमी आंदोलन व इतरही, अनेक लोकांनी न डगमगता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन, अन्याय सहन करून लोकशाही वाचविण्याचा प्रयत्न केला.
 
 
उपहास, अन्याय, आर्थिक चणचण सहन करून अनेकांनी (Tarun Bharat) तरुण भारत नावारूपाला आणला आहे. तरुण भारतची बॅलन्स शीट नेहमीच तोट्यात राहत असे. पण, डॉ. विलास डांगरे, अनिल दांडेकर व धनंजय बापट यांनी ती ‘नो लॉस नो प्रॉफिटपर्यंत’ आणली, असे गौरवोद्गार नितीन गडकरी यांनी काढले. क्लासमधून मासमधील शेेवटच्या व्यक्तीपर्यंत विचार पोहोचवणे हे आव्हान आहे. तरुण भारत ह एक निर्भीड व निरपेक्ष वृत्तपत्र आहे. सर्वच राजकीय पक्षांना समान न्याय मिळाला पाहिजे. विचारांशी प्रतारणा होता कामा नये, असे ते (Nitin Gadkari) म्हणाले.
Powered By Sangraha 9.0