पावसाअभावी सोयाबीनचे पीक धोक्यात

31 Aug 2023 13:01:32
तभा वृत्तसेवा
चांदूर बाजार, 
lack of rain ऐन सोयाबीनच्या फुलार अवस्थेत बाही तयार होण्याकरिता पावसाची नितांत गरज असताना संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाविना कोरडा गेल्याने चांदूर बाजार तालुक्यासह जिल्ह्यातले सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. परिणामी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी चिंतातुर झाला आहे.मृग नक्षत्रात यावर्षी वेळेवर पाऊस न पडल्याने सोयाबीनची पेरणी जून ऐवजी जुलै महिन्यात झाली. पेरणीनंतर जुलै महिन्यातल्या पुष्प नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने सोयाबीन पीकाची अवस्था मागील चार ते पाच वर्षापेक्षा चांगल्या स्थितीत आहे. एकरी 9 ते 10 पोते पिकेल अशी शेतकर्‍याची आशा आहे. परंतु, आता फुलोरा अवस्थेत असलेल्या सोयाबीनची बाही तयार होऊन शेंगा तयार होण्यासाठी सोयाबीन पिकाला दमदार पावसाची गरज आहे. ऑगस्ट महिन्यातील आश्लेषा, मेघा, फाल्गुनी संपूर्ण नक्षत्र कोरडे गेल्याने सोयाबिन पीक धोक्यात आले असून येणारे पीक हातून जाण्याच्या भीतीने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
 
Soyabin
 
कमी खर्चाच जास्त उत्पादन देणारे सोयाबीनचे पीक आहे. विशेष म्हणजे यावर्षी पाऊस लांबल्यामुळे कपाशी ऐवजी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पसंती दिल्यामुळे एकट्या चांदूर बाजार तालुक्यात 14 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. जिल्ह्यात हे क्षेत्र दोन लाख हेक्टर पेक्षाही जास्त आहे. lack of rain सोयाबीन शेवटच्या टप्यात असून आता शेंगा तयार होण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. काही हवामान तज्ञ 7 ते8 सप्टेंबरला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवत आहे. भर पावसाच्या दिवसात उन्हाळ्यासारखे ऊन तापत असल्याने सोयाबीनला फटका बसत आहे.
 
 
पिक हातून जाण्याची भिती
पावसाने ऐन सोयाबीन भरण्याच्या स्थितीत खंड दिला आहे. सध्या पावसाचे दिवस असताना सुद्धा उन्हाळ्या सारखी ऊन पडत आहे. परिणामी सोयाबीनचे पीक करपत असल्याने ते हातून जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
Powered By Sangraha 9.0