तुका आकाशाएवढा
- प्रा. मधुकर वडोदे
जीवन सर्वच जगत असतात. सर्वांच्याच वाट्याला सुख-दु:ख येत असतात. परंतु कसं जगावं हे प्रत्येकानं आपल्या सोईनुसार ठरविलेलं असतं. जगताना मार्गाची निवड ही अत्यंत महत्त्वाची असते. Saint Tukaram Maharaj अखंडपणे सावध राहून जगणार्यांची संख्या त्यामानाने खूप कमी असते. जीवन अधिकाधिक यशस्वी होण्याकरिता आयुष्यभर चांगली संगत मिळाल्यास आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांच्या गुणदोषांचा परिणाम होत असतो. उपलब्ध परिस्थिती आणि आपले परिश्रम यांच्या सहयोगातून व्यक्तिमत्त्व घडत असत. त्याकरिता आपल्यावर चांगले संस्कार होणे जरूरीचे असते आणि हे कार्य मोठ्या कौशल्यतेने आई-वडील करित असतात. मुलाचं आचरण, चरित्र शुद्ध ठेवून त्याला सन्मार्गाकडे वळविण्याच्या द़ृष्टीने असे मार्गदर्शन होणे अत्यंत महत्त्वाचे ठरत असते.
म्हणूनच हा प्रवास आपल्या चांगल्या संस्कृतीकडे वळणारा विशेष जागा घेत असतो. ध्येयाकडे वाटचाल करीत जीवन अर्थपूर्ण होत असते. आपलं स्वत:च हित कशामध्ये दडलेलं आहे, ते जाणून त्यानुसार चालून जीवनात यशस्वी होताना दिसतो. मन हे अत्यंत चंचल असतं. त्याला सीमा नसतात. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं ठरतं. जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाला तोच पुढे आयुष्यात जाणीवपूर्वक जागरूक राहून यशस्वी होताना दिसतो. अशी जागरूकतेने वागणारी ज्यांची मुलं असतात ती मुलं आपल्या आई-वडिलांचं नाव काढताना दिसतात. वर्तमान काळात आपल्या उन्नतीकरिता अनेक कसोट्यांना पार करून उज्ज्वल भविष्याकरिता त्या प्रकारचे प्रयोजन करता आले पाहिजे. त्याशिवाय आपलं दु:ख दूर होऊ शकत नाही. त्याकरिता डोळस वृत्ती असावी लागते. हाच विचार संत तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून नोंदविला आहे. ते
म्हणतात की,
आपुलिया हिता जो असे जागता।
धन्य माता पिता तयाचिया॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक।
तयाचा हरीख वाटे देवा॥
गीता भागवत करिता श्रवण।
आणीक चिंतन विठोबाचे॥
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा।
तरी माझ्या दैवा पार नाही॥
अ. क्र. 4
Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज सांगतात की, चांगली अपेक्षा कुणाकडून करावी? तर, त्याचेही काही मापदंड ठरलेले आहेत. आम्रवृक्षापासून मधुर फळांची अपेक्षा केली जाते. परंतु आपण म्हणाल की, बाभळीच्या झाडापासून केली तर काय हरकत आहे? आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की, बाभळीचे झाड तुम्हाला आयुष्यभर काटेच देईल तर आयुष्यभर आम्रवृक्ष मधुर फळेच. जसं बीज लावलं तसं त्याला फळ येत असतं. आयुष्यात आपण कार्य करीत असताना सन्मार्गाने जर चालत असू, नैतिक काम करीत असू तर त्याचे संस्कार आपल्या मुलांवर होत असतात. कारण ते आपणास लहानपणापासून पाहात असतात, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. आपणच जर व्यसनाधीन असाल तर पुढे चालून त्याचा परिणाम मुलांवर नक्कीच दिसून येतो. आपण जाणीवपूर्वक दुष्ट वृत्तीच्या लोकांचा जवळून अभ्यास केला तर त्यांचा मुलगाही तोच मार्ग आनंदाने स्वीकारताना दिसतो. बाप जर चोरी करत असेल तर मुलगाही त्याच वळणावर जाताना दिसतो. तोही पुढे चोर बनतो. म्हणून आपल्या मुलांवर लहानपणीच चांगले संस्कार करणे महत्त्वाचे आहे. त्यांना चांगल्या प्रकारे घडविल्यास त्या आई-वडिलांचं सर्वच नाव काढताना दिसतात. म्हणून मुलं सन्मार्गाला लावण्याकरिता आई-वडिलांचा खूप मोठा वाटा असतो.
Saint Tukaram Maharaj : मुलांवर संस्कार हे आपल्या घरातूनच करावे लागतात. ज्यांच्यावर असे संस्कार झालेले आहेत त्यांना मग आपलं हित कशात आहे, हे चांगलंच कळत असते. व्यावहारिक तसेच इतर कार्यात सतर्क राहून आपला फायदा करून घेण्याच्या द़ृष्टीने सावध राहत असतात. अर्थातच अशी गुणी, संस्कारी मुलं, मुली ज्यांच्या पोटी जन्माला येतात ते त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार करतात. या मुलांचा कुणालाही हेवा वाटणे साहजिकच आहे. अशा संस्कारीत मुलांच्या सहयोगामुळे जनसामान्यांच्या जीवनात चांगले परिवर्तन घडवून येत असल्याने व आई-वडिलांचा ज्यांच्यामुळे समाजात सन्मान होतो त्यांचा हरीख देवालासुद्धा वाटत असतो. जीवनात आलेल्या अपयशाने एवढं खचून न जाता आपलं हित कशात आहे, ते शोधणं महत्त्वाचं ठरतं व आपल्या बरोबरच आई-वडिलांचंही नाव मोठं करण्यात यश प्राप्त होत असतं. असेच कार्य आपल्या हातून घडायला पाहिजे; ज्यामुळे आई-वडिलांचा सन्मान होईल की, ज्यामुळे त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटेल. म्हणूनच आयुष्यात अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी खरं तर आत्मपरीक्षण करून आपण कुठं कमी पडलो, हे शोधणे गरजेचे आहे. कारण पुढं जायचे असेल तर झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून ते संपादन करण्यासाठी योग्य नियोजन महत्त्वाचे ठरते, हे विसरून चालणार नाही. अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी अशावेळी टोकाची भूमिका घेऊ नये. अनेक विद्यार्थी टोकाची भूमिका घेताना दिसतात तेव्हा अशा विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात कुठेतरी काही आई-वडील प्रबोधन करण्यास कमी पडल्याची खंत मनाला वाटून जाते. परंतु अपयशाने एवढं खचून न जाता यशापर्यंत जाण्याचा मार्ग शोधावा. हाच मुख्य हेतू आहे.
बरेच लोक परीक्षेतील अपयशानं खचून न जाता प्रत्यक्ष जीवनाच्या परीक्षेत मात्र पूर्णपणे यशस्वी झालेले निदर्शनास येतात. कारण त्यांनी केलेली चूक त्याच्या लक्षात आली. पुन्हा ती चूक त्यांनी होऊ दिली नाही. म्हणूनच ते आयुष्यात आई-वडिलांचे नाव अजरामर करण्यात यशस्वी झाले. ज्यांनी आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे केले अशा नावांची यादी पाहिल्यास त्यात प्रामुख्याने नजरेस पडतात राज कपूर, व्ही. शांताराम, अमिताभ बच्चन, डॉ. श्रीराम लागू, नेल्सन मंडेला, न्यूटन, बाबासाहेब पुरंदरे, देव आनंद, दादा कोंडके, अनिल अवचट, स्मिता पाटील, मधु मंगेश कर्णिक, मारुती चितमपल्ली, आरती प्रभू, इंद्रजित भालेराव. या मोठ्या झालेल्या माणसांनी आपल्याबरोबरच आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं केलं. कारण त्यांनी त्यावेळी दिलेल्या त्या त्या परीक्षेत अनुत्तीर्ण ते जरूर झाले, परंतु त्यांनी त्या परिस्थितीवर मात करीत आपला मार्ग शोधून, पाहिजे त्या ठिकाणी भरपूर यश संपादन केलं, ते आपणास त्यांच्या लोकप्रियतेवरून लक्षात आलेच असेल. म्हणूनच अपयशानं खचून न जाता आपलं हित आपणच कशामध्ये आहे, हे जाणून पुढचा मार्ग शोधणे गरजेचे आहे. जिद्द, मेहनत, अथक परिश्रम करण्याची त्यांनी तयारी ठेवल्यामुळे नापास का झालो? ही बाब शोधून मग पुढे मिळेल ते काम करण्याची त्यांनी तयारी ठेवली. इंद्रजित भालेरावांनी लिहायला लागल्यावर गुरं राखण्याचा अनुभव जवळ असल्यानं याच अनुभवावर ‘गाई घरा आल्या’ हे पुस्तक लिहिलं. त्याला शासनाचं 10 हजाराचं पारितोषिक मिळालं. जळगाव विद्यापीठानं हे पुस्तक अभ्यासाला लावलं. कर्नाटकच्या मॅट्रिकच्या अभ्यासात यातला एक पाठ लागला. आज रोजी ते अनेक राज्य पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. ‘पीकपाणी’, ‘आम्ही काबाडाचे धनी’, गावाकडं चलं माझ्या दोस्ता’, ‘दूर राहिला गाव’, ‘पेरा’ इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. कवी इंद्र्रजीत भालेराव हे जसे परीक्षेतील अपयशामुळे खचून न जाता जीवनाची नवी दिशा आई-वडिलांच्या मार्गदर्शनामुळे शोधण्यास यशस्वी झाले. या यशस्वी वाटेवर चालण्याकरिता आई-वडिलांनी त्यांच्याकरिता भरपूर मेहनत घेतली. म्हणूनच त्यांच्या मुलाने आई-वडिलांचे नाव महाराष्ट्रभर केले. खरोखर त्यांचे आई-वडील धन्य आहेत. म्हणूनच आपणही आपल्या हिताचा विचार केल्यास आपण आपल्याला सिद्ध करण्यास यशस्वी नक्की होऊ व आई-वडिलांचं नाव मोठं करण्यात यशस्वी होऊ.
गीता, भागवत यांसारख्या ग्रंथात मनुष्य जीवनाचा सार भरलेला आहे की, ज्यामुळे हे ग्रंथ संपूर्ण मानवाला मार्गदर्शक ठरलेले आहेत, असे हे ग्रंथ मन लावून जे ऐकतात व आपल्या आचारासोबतच विचारांचे चांगले परिवर्तन घडवून आणतात. आपलं जीवन सत्कर्मी लावून गंगेच्या पाण्याप्रमाणं निर्मळ ठेवून जनसामान्यांचे दु:ख दुर करतात. गीतेचीही शिकवण जातिधर्मापलीकडची आहे. गीतेत ज्ञान आहे, भक्ती आहे, कर्म आहे, योग आहे, समाजकारण आहे. याचाच अर्थ जे गीतेत नाही ते जगतात नाही. गीता मानवी जीवनाचा चांगला मार्गदर्शक आहे. दैनंदिन जीवनात निर्माण होणार्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गीतेत आहे. Saint Tukaram Maharaj हे सांगण्याचा हेतू एकच असा की, ऐकणार्याचे हित कशात आहे, त्याच्या हितासाठी काय सांगितले पाहिजे, ती फक्त सांगत नसून अनुभूती देते. गीता त्याग शिकवते, भोग नाही तसेच निष्कामकर्माचे धडे देते. गीतेचे खरे तात्पर्य असे की, सर्व धर्माचा म्हणजे धर्माला कारणीभूत जे अज्ञान आहे त्याचा त्याग करून ज्ञानाचा स्वीकार अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे भागवताच्या माध्यमातून आत्मज्ञानाचे रहस्य सोपे करून सांगितले आहे. त्यामुळे भौतिकतेला आत्मिकतेची जोड असल्यास ते जगणे पुरुषार्थ संपन्न होते, हे समजून घेत असताना विठ्ठल भक्तीमुळे जीवनात आत्मोन्नतीची प्रेरणा निश्चितच उभी राहील. असे जे काही सज्जन लोक असतील त्यांची सेवा माझ्या हातून घडावी यापेक्षा दुसरं मला काहीही नको, अशी पांडुरंगाजवळ ते प्रार्थना करतात. अर्थातच अशी गुणी, संस्कारी मुलं, मुली ज्यांच्या पोटी जन्माला येतात ते त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार करतात. मग या मुलांचा देवालाही हेवा वाटणे साहजिकच आहे.
- 9422200007