मुंबई,
ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके (Prof. Hari Narke) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. हरी रामचंद्र नरके यांची लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी बहुआयामी ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.
प्रा. हरी नरके (Prof. Hari Narke) हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. त्यांची कन्या मराठी सिनेक्षेत्रात अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे. ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा’ ही त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.