नावातच सगळे आहे

    दिनांक :10-Sep-2023
Total Views |
देशाचे नाव 'India' or 'Bharat' ‘इंडिया’ की ‘भारत’ यापैकी काय हवे यावरून सुरू झालेली चर्चा आणि चिघळत असणार्‍या वादाच्या पृष्ठभूमीवर काही बाबींचा ऊहापोह होणे गरजेचे आहे. मुळात या देशाचे नाव ‘आर्यावर्त’ असे होते. पुढच्या काळात सीमांचा संकोच, परकीयांचे हल्ले होत गेले तसतशी नावेदेखील बदलत गेली. प्राचीन काळातील एका कथेनुसार ‘भरत’ राजाच्या नावावरून या देशाचे नाव ‘भारत’ झाल्याचे मानले जाते वा असे म्हणतात. एक तर्क असाही दिला जातो की, ‘भा’ म्हणजे तेज... हे तेज ज्ञानाचे, ज्ञानयुक्त...! याचे पूजन करण्यामध्ये कार्यरत राहणारे लोक म्हणजे भारतीय आणि ते राहतात त्या भूमीला ‘भारत’ ही संज्ञा प्राप्त झाली. थोडक्यात म्हणजे, तेजाचे पूजन करणारा देश अशी ओळख अधोरेखित करणारे विपुल प्राचीन वाङ्मय पाहता पटणारी ही बाब आहे. इंडस व्हॅलीमध्ये असल्यामुळे पुढच्या काळात त्याला ‘इंडिया’ हे नाव प्राप्त झाल्याचे बोलले जाते. तरीही हे परकीयांनी दिलेले नाव असल्याचे सत्य शिल्लक राहतेच. स्वराज्य मिळाल्यानंतर सर्वच गोष्ट तातडीने बदलता येत नाहीत, हे सत्य आपण कधीतरी मान्य करायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही संविधानामध्ये ‘इंडिया दॅट इज भारत’ असाच उल्लेख करून दोन्ही नावांमध्ये एक प्रकारचा समन्वय साधला आहे. एखाद्या देशाची दोन-दोन नावे असणे हे जगामध्ये क्वचितच घडले आहे. उदा. डॉइश लँड/जर्मनी, निपॉन/जपान तसेच इंडिया/भारत... यात एकच भाग असा की, भारतीयच स्वत:ला ‘इंडियन’ समजू लागले आहेत. खेरीज राजकारणी लोकही बोलताना इंडिया आणि भारत असे दोन वर्ग इथे राहत असल्याचे बोलू लागले आहेत. यामागे राजकारण असणार हे नक्की, पण सामान्य माणूस यामुळे गोंधळून जातो, हेदेखील खरेच आहे.
 
 
bharat-mata
 
देशाचे नाव बदलायचे असेल तर 'India' or 'Bharat' ‘इंडिया’ हे नाव येत असणार्‍या सर्वच आस्थापनांची नावे हळूहळू का होईना, बदलावी लागतील. स्वत: पंतप्रधानांनी ‘इंडिया’ या नावाचा समावेश असणार्‍या अनेक योजना सुरू केल्या असून त्याचे वारंवार उच्चारणही केले आहे. अशा वेळी नामबदल वाटतो तितका सोपा नसतो हेदेखील लक्षात घ्यायला हवे. परंतु आजवर स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे उलटून गेल्यानंतरही या खंडप्राय देशाचे एकच नाव असावे, असा विचार कोणाच्याही मनात का येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणाला होता म्हणे! पण आपल्या देशात अर्थवाही नावे ठेवण्याची पद्धत आहे. स्थानांची, मुलांची, इतकेच नव्हे तर, आपण सोडतो ती अंतराळ याने वा बनवली जाणारी शस्त्रे आदींची नावेही अर्थवाहीच असतात, हे लक्षात घ्यायला हवे. असे असताना ‘इंडिया’ या नावातून नेमका कोणता गौरवास्पद अर्थ प्रतीत होतो, हे कोणी सांगावे? भारत या शब्दाचा अर्थ मात्र वर सांगितल्यानुसार गौरवास्पदच आहे. त्यामुळे या दोन्हीमध्ये कलह उत्पन्न करण्याचा होणारा प्रयत्न राष्ट्राच्या प्रकृतीला मानवणारा ठरेल, असे वाटत नाही.
 
 
'India' or 'Bharat' : दुसरे म्हणजे विरोधकांचा एक मोठा वर्ग पंतप्रधानांनी एखादी गोष्ट मांडली असता ती समजून न घेता एकाएकी विरोध करण्यास प्रवृत्त होणारा आहे. विरोधासाठी विरोध ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे वाटत नाही काय? कोणतीही गोष्ट एकदम रुजणे वा रुजवणे नक्कीच कठीण असते, पण अशक्य नसते. त्यामुळे अशा प्रकारचा वाद निर्माण करून त्यातून सर्वसामान्यांच्या मनात शंका-कुशंका निर्माण करण्यापेक्षा विरोधकांनीही पुढे येऊन आपल्या सूचना मांडल्या असत्या तर जास्त उचित ठरले असते. देशाचे नाव बदलल्यामुळे आपली विदेशात असणारी ओळख बदलणे कोणाला कठीण वाटत असले, तरी ते अशक्य मुळीच नाही. त्यामुळे काही काळ तरी या दोन्ही नावांचा उल्लेख समांतर होत जाणार हेदेखील नक्की. मात्र, हे सगळे असले तरी यात सगळ्यात मोठा भाग असा की, देशाचे नाव बदलण्याचा घाट अधिकृतपणे विद्यमान सरकारने घातल्याचे कुठेही जाहीर झालेले नाही. ते होत नाही, तोपर्यंत या सगळ्या हवेतल्या बाता वा खयाली पुलाव आहेत, असेच म्हटले जाणार. म्हणूनच लगेच याला विरोध करणे वा खंबीर पाठिंबा देणे या दोन्ही गोष्टींपेक्षा थांबा... वाचा... विचार करा... आणि मग पुढे जा... हे टप्पे सर्वांनीच लक्षात ठेवायला हवेत.
 
 
काही विरोधकांचा आरोप असा की, त्यांच्या आघाडीचे नाव 'India' or 'Bharat' ‘इंडिया’ असल्यामुळे मोदींनी ही चाल खेळली आहे. राजकारणाचा विचार करता समजा तसे असले, तरी त्यात चूक काय आहे? कारण राजकारणाला युद्ध मानले तर यात शह-काटशह होत असतातच. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पलायनवादी भूमिका न घेता विरोधकांनी योग्य तर्कानिशी पुढे येणे गरजेचे आहे. दुसरीकडे विरोधकांच्या आघाडीतही ‘इंडिया’ आणि ‘भारत’ ही दोन्ही नावे वापरात येत असल्यामुळे बेचैनी वाटण्याचे कारण नाही. अलीकडेच काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढलीच होती. त्यात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ हे दोन्ही शब्द आहेत. त्यामुळे त्यांनी अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. पण राजा, उंदीर आणि टोपी या गोष्टीतील घटनेनुसार विरोधकांचे सर्व हल्ले सुरू आहेत. तसे बघायला गेले तर या दोन्ही नावांमुळे फार मोठे सुधारणार अथवा बिघडणार नाही. तथापि, एखाद्या राष्ट्राला स्वाधीनतेनंतर त्याची अस्मिता आणि स्वाभिमान या दोन्ही गोष्टी मूळ नावामधूनच प्राप्त होत असतात. त्यामुळे क्षणभर हा सगळा निवडणुकीसाठीचा स्टंट आहे असे मानले, तरी त्यात चुकीचे काहीच नाही. प्रत्येक पक्ष निवडणुकीसाठी स्वत:चे असे काही मुद्दे मांडत असतोच. त्यात सत्ताधार्‍यांकडून एका मुद्याची भर पडली इतकेच. यावर रडाचे कढ काढण्यापेक्षा सशक्त मुद्दा घेऊन मोदी विरोधकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
 
 
कायद्यानुसार बघता, संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द समाविष्ट करून इंदिरा गांधी यांनी एक पायंडा पाडला. त्याच पायंड्यानुसार विद्यमान सरकार त्या सरनाम्यात देशाच्या नावाबद्दल बदल सहज करू शकते. आपल्या राष्ट्रगीतातही ‘भारत भाग्य विधाता’ असे म्हटले आहे. शाळेत लहानपणापासून शिकलेल्या प्रतिज्ञेतही ‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत...’ हेच आपण शिकत आलो आहोत. अशा वेळी 'India' or 'Bharat' ‘इंडिया’चा ‘भारत’ झाला तर कोणालाही त्यात वावगे का वाटावे? इतर ठिकाणची नावे बदलणे हा केवळ उपचार असून सत्ताधारी योग्यरीतीने निपटवू शकतात. यात देशाचे नाव आत्ताच का बदलले, हीच वेळ का निवडली, आधी लक्षात का आले नाही अशा मुद्यांना काहीच अर्थ उरत नसतो. म्हणजेच मी एखादी चूक जन्मभर करत आलो आणि दुसर्‍याने ती दाखवून दिली तर ती आत्ताच का दाखवतो आहे, असा प्रतिप्रश्न करण्यासारखे झाले.
 
 
खरे तर आपल्याकडे धर्माच्या नावातही असाच वाद घातला जातो. कारण एकच की, धर्माला नाव नसते. त्याला विशेषणे असतात. त्यामुळेच आर्य, सनातन, वैदिक हिंदू धर्म असे कोणी म्हणतो तेव्हा आधीची चार ही त्याची विशेषणे आहेत, हे सांगावे लागते. नावातूनच अर्थ प्रतीत होत असतो. जसे की, आर्य म्हणजे सुसंस्कृत. वैदिक म्हणजेच वेद हे आपले मूळ असल्याची मान्यता. सनातन म्हणजे नित्यनूतन. म्हणजेच कधी निर्माण झाला ते माहिती नाही आणि कधीही नष्ट होणार नाही असा... आणि हिंदू हे तुलनेने अलीकडच्या काळात आलेले नाव. म्हणजेच नावातून एखादी गोष्ट प्रतीत होत असेल तर 'India' or 'Bharat' ‘इंडिया’ हा शब्द योग्य की ‘भारत’ हा शब्द? हा सारासार विचार करून आपण ठरवायला हवे की आपण तेजाचे उपासक आहोत की केवळ एखाद्या दरीत राहणारे आहोत? देशाची मान विदेशात गौरवाने उन्नत होण्यासाठी यातील कोणते नाव योग्य आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे. त्यातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ ही आपली मूलभूत तत्त्वे आपण विदेशी लोकांसमोरही उत्तमरीत्या प्रसारू आणि प्रचारू शकतो. थोडक्यात, भारताचे सुबुद्ध नागरिक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने देशाचे प्राचीन परंपरा सांगणारे नाव योग्य की तुलनेने अलीकडच्या काळात आलेले विदेशी भाषेतील नाव योग्य, याचा आपापल्या परीने अभ्यासपूर्वक विचार करावा.
- डॉ. सच्चिदानंद शेवडे
ज्येष्ठ अभ्यासक