राष्ट्ररक्षा
भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला, तरी मराठवाड्यातील जनता मात्र पुढील 13 महिने 2 दिवस पारतंत्र्यात होती. 15 ऑगस्ट 1947 नंतरही स्वतंत्र भारताच्या नकाशावर दक्षिण भारतात निजामाचे हैदराबाद राज्य एखाद्या बेटासारखे होते. निजामाचे गुंड मुस्लिमेतरांवर घोर अन्याय करीत होते. अखेर 9 सप्टेंबर 1948 रोजी मंत्रिमंडळाने सैन्याच्या Operation Polo ऑपरेशन पोलोला परवानगी दिली. 18 सप्टेंबर 1948 ला भारतीय सैन्याने निजामाचा पराभव केला. हैदराबाद संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरण. या विलीनीकरणाला आता 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. म्हणून हे विलीनीकरण नेमके कसे झाले, हे सगळ्या भारतीयांना समजणे गरजेचे आहे.
ऑपरेशन पोलो नेमके काय होते?
13 सप्टेंबर 1948 या दिवशी भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो अभियान सुरू केले. सरदार पटेल यांनी भारतीय सैन्य हैदराबादला पाठवले. भारतीय लष्कराच्या या कारवाईला Operation Polo ‘ऑपरेशन पोलो’ असे नाव देण्यात आले होते. कारण त्यावेळी हैदराबादमध्ये जगातील सर्वाधिक 17 पोलो मैदाने होती. हैदराबादमध्ये भारतीय लष्कराची कारवाई पाच दिवस चालली. त्यात 1373 रझाकार मारले गेले. हैदराबाद राज्याचे 807 जवान मारले गेले. भारतीय सैन्याने 66 जवान गमावले तर 96 जवान जखमी झाले.
ऑपरेशन पोलो हल्ल्याची योजना
Operation Polo : पूर्वेकडील विजयवाडा आणि पश्चिमेकडील सोलापूर या दोन दिशेने हल्ला करायचे ठरले. भारतीय सैन्याने छोट्या तुकड्यांनी सीमेवर हैदराबादी सैन्याला तैनात व्हायला भाग पाडले. एकूणच कमांड लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंहजी यांच्या हाती देण्यात आली. सोलापूरच्या हल्ल्याचे नेतृत्व मेजर जनरल चौधरी यांनी केले होते. त्याचे चार टास्क फोर्स बनवले होते-
वेगवान इन्फंट्री - घोडदळ आणि हलकी तोफखाना यांचे मिश्रण असलेले स्ट्राईक फोर्स.
स्मॅश फोर्स - ज्यामध्ये प्रामुख्याने आर्मर्ड युनिट्स आणि तोफखाना होता.
किल फोर्स - इन्फंट्री, आणि अभियांत्रिकी युनिट्सचे बनलेले होते.
वीर फोर्स - ज्यामध्ये इन्फंट्री, अँटी-टँक आणि इंजिनीअरिंग युनिट्सचा समावेश होता.
विजयवाडा येथून झालेल्या हल्ल्याचे नेतृत्व मेजर जनरल अजित रुद्र यांच्याकडे होते. त्यात 2/5 गुरखा रायफल्स, 17 व्या (पूना) हॉर्सची एक तुकडी, 19 व्या फील्ड बॅटरीची एक तुकडी, अभियांत्रिकी आणि सहायक युनिट्सचा समावेश होता. याव्यतिरिक्त चार इन्फंट्री बटालियन होत्या. पुणे तळावरून हवाई मदतीसाठी हॉकर टेम्पेस्ट विमानांची दोन पथके तयार करण्यात आली होती. काश्मीरनंतर हैदराबाद भारतीय सैन्यासाठी अतिरिक्त आघाडी असेल, या कारणास्तव जनरल सर रॉय बुचर यांनी आक्षेप घेतला होता. मात्र जनरल करिअप्पा लष्कर प्रमुख बनल्यानंतर हल्ल्याची तारीख 13 सप्टेंबर निश्चित करण्यात आली. हैदराबादमध्ये झालेली कारवाई ही पोलिस अॅक्शन होती की लष्करी कारवाई, यावर चर्चा आणि वाद आहे. भारत सरकारचे म्हणणे होते की, हैदराबाद हे भारताचे एक संस्थान असल्यामुळे इथे पोलिस पाठवून आम्ही कारवाई करू. म्हणून याला पोलिस अॅक्शन असे म्हटले गेले. परंतु, प्रत्यक्षात यामध्ये फक्त भारतीय सैन्याने लष्करी कारवाई केली होती.
हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई
हैदराबाद राज्याच्या विलीनीकरणासाठी जनतेने जे सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले, हेच आंदोलन भारतीय इतिहासात ‘हैदराबादचा स्वतंत्र संग्राम’ या नावाने ओळखले जाते. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणार्या निजामी लष्कर व रझाकारी टोळ्यांविरुद्ध भारतीय सैन्याने ऑपरेशन कबड्डी चालवले गेले होते. भारतीय सैन्यामध्ये पायदळ, तोफखाना आणि आर्मर्ड युनिट्ससह अंदाजे 40,000 जवानांचा समावेश होता.
कोडाड येथे चकमक
निजामाची दादागिरी एवढी वाढली होती की, त्यांच्या रझाकार तुकड्यांनी भारताच्या आत येऊन भारताच्या पोलिस चौकीवर हल्ला केला. 6 सप्टेंबर रोजी चिल्लाकल्लू गावाजवळील भारतीय पोलिस चौकीवर रझाकार युनिट्सकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. Operation Polo भारतीय लष्कराच्या कमांडने अभय सिंग यांच्या नेतृत्वाखाली पूना हॉर्सची एक तुकडी आणि 2/5 गुरखा रायफल्सची एक कंपनी पाठवली. त्यांच्यावरही रझाकारांनी गोळीबार केला. त्यानंतर पूना हॉर्सच्या रणगाड्यांनी रझाकारांचा हैदराबाद प्रदेशातील कोडाडपर्यंत पाठलाग केला. येथे त्यांना हैदराबाद लान्सर्सच्या चिलखती गाड्यांनी विरोध केला. कारवाईत पूना हॉर्सने एक चिलखती गाडी उद्ध्वस्त केली आणि कोडाड येथील राज्य चौकीला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.
भारतीय आणि निजामी सैन्याचे नेतृत्व, शस्त्रे आणि संख्याबळ
भारतीय लष्कराचे कमांडर खालीलप्रमाणे होते-
मेजर जनरल जे. एन. चौधरी : मे 1948 मध्ये जनरल चौधरी यांनी 1 आर्मर्ड डिव्हिजनची कमान हाती घेतली; ज्याने 1948 च्या हैदराबाद ऑपरेशनमध्ये प्रमुख भूमिका बजावली. त्यांनी भारतीय लष्कराच्या हैदराबाद ऑपरेशनचे जनरल ऑफिसर कमांडिंग (ॠजउ) म्हणून काम केले. लष्करी मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ऑपरेशन पोलोनंतर त्यांची हैदराबाद राज्याचे लष्करी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मेजर जनरल ए. एस. पठानिया : यांनी भारतीय सैन्याच्या 5 व्या इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले; जे ऑपरेशन पोलोमध्ये सामील असलेल्या प्रमुख विभागांपैकी एक होते.
मेजर जनरल एस. एम. श्रीनागेश : यांनी भारतीय सैन्याच्या या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या 9 व्या इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले. जनरल राजेंद्र सिंगजी भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडचे कमांडर होते; ज्याच्या अंतर्गत हैदराबाद ऑपरेशन आयोजित केले गेले होते. दुसरीकडे हैदराबाद राज्याच्या सैन्यात सुमारे 22,000 जवान होते. ते सुसज्ज आणि संघटित होते. रझाकार ही निजामाशी एकनिष्ठ असलेली एक खाजगी मिलिशिया होती.
Operation Polo : निजामाच्या सैन्यात अरब, रोहिल्ला, उत्तर भारतीय मुस्लिम आणि पठाण यांचा समावेश होता. सैन्यात तीन आर्मर्ड रेजिमेंट (120-150 रणगाडे), एक घोडदळ रेजिमेंट, 11 इन्फंट्री बटालियन (एका बटालियन बरोबर 750 ते 850 सैनिक आणि अधिकारी) आणि तोफखाना यांचा समावेश होता. त्यांना अनेक घोडेस्वार, चार पायदळ बटालियन आणि एक गॅरिसन बटालियन यांची मदत होती. या सैन्याची कमान मेजर जनरल एल. एड्रोस या अरबकडे होती. हैदराबादी सैन्यात 55 टक्के मुस्लिम होते. याव्यतिरिक्त कासिम रझवी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 2,00,000 अनियमित रझाकार मिलिशिया होते. यापैकी एक चतुर्थांश आधुनिक बंदुकांनी सुसज्ज होते, तर उर्वरित मुख्यतः मझल लोडर बंदुकांनी आणि तलवारींनी सशस्त्र होते.
Operation Polo ऑपरेशन पोलो 13 सप्टेंबर 1947 ते 18 सप्टेंबर 1947 या दरम्यान करण्यात आले. यात भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले व शेकडो जखमी झाले. निजामी शासनसत्तेचा प्रतिकार 109 तासांत संपुष्टात आला. 1948 च्या ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यात ऑपरेशन पोलोची तयारी सुरू झाली. या मोहिमेत फर्स्ट ग्वालियर लान्सर्स, मैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, फोर्थ ग्वालियर इन्फंट्री, राजाराम रायफल्स, फर्स्ट मैसूर इन्फंट्री यातील दले कमी महत्त्वाच्या कामाकरिता तैनात केली होती. लष्कराला हवाई दलाचे सहाय्य होते.
ऑपरेशन पोलोची टाईमलाईन आणि प्रगती
13 सप्टेंबर 1948 : Operation Polo ऑपरेशन पोलोची सुरुवात. भारतीय सैन्याने आपले लष्करी आक्रमण सुरू केले. रझाकारांच्या नेतृत्वाखालील हैदराबाद राज्याच्या सैन्याच्या प्रतिकाराचा सामना करीत भारतीय सैन्याने वेगाने हालचाल केली. प्रमुख शहरे आणि मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतली.
सिकंदराबादची लढाई : 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने निजामाच्या सैन्याचा प्रमुख लष्करी तळ असलेल्या सिकंदराबाद शहराकडे कूच केली आणि ही लढाई झाली.
बोलारमची लढाई : 14 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने बोलारम एअरफील्डवर हल्ला केला; ज्याचा वापर हैदराबाद राज्य सैन्याने केला होता. एअरफील्ड भारतीय सैन्याने ताब्यात घेतले.
बासरची लढाई : भारतीय सैन्याने हैदराबाद राज्याच्या सैन्याचा गड असलेल्या बसर शहराकडे कूच केले. लढाईनंतर बसरला भारतीय सैन्याने ताब्यात घेतले.
मेडकची लढाई : ही लढाई 17 सप्टेंबर 1948 रोजी मेडक शहराजवळ झाली. भारतीय सैन्याला हैदराबाद राज्याच्या सैन्याकडून कठोर प्रतिकाराचा सामना करावा लागला, परंतु अखेरीस ते विजयी झाले. त्याच्या दुसर्या भागामध्ये ऑपरेशन पहिलीच्या वेगवेगळ्या लष्करी बाबीवर लष्करी डावपेचाचे आपण विश्लेषण करू.
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- 9096701253
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)