स्वच्छता राखा, डेंग्यूला हद्दपार करा!

    दिनांक :11-Sep-2023
Total Views |
वेध
- अनिल उमाकांत फेकरीकर
पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या माणसाची कथा जरा विचित्रच आहे. तो चंद्रावर आणि मंगळावर पोहोचला. पण पृथ्वीवरील डासांना मात देण्यात अद्याप तो अपयशी ठरत आहे. आज हाच डास त्याच्यासाठी कर्दनकाळ ठरत आहे. आता वेळ आली आहे की, Dengue disease डासांना पृथ्वीतलावरून हद्दपार करण्याची. त्याकरिता विशेष मोहीम मनापासून राबविण्याची गरज आहे. सर्वप्रथम घरोघरी प्रत्येकाने झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. यामुळे डेंग्यूचा धोका आपण 50 ते 70 टक्के कमी करू शकतो. शिवाय आपले घर, आपला परिसर, आपले गाव, आपले शहर, आपले राज्य आणि आपला देश स्वच्छ कसा राहील, यावर भर द्यायला हवा. कचरा, पाणी साचेल अशी कृती प्रत्येकाने कटाक्षाने टाळावी. कुठे पाणी साचत असल्यास ते कोरडे करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत.
 
 
dengue
 
समजा ते शक्य नसल्यास त्या पाण्यावर तेलयुक्त तरल पदार्थ टाकून आतील डासांनी टाकलेल्या अंड्यांना संपवायला हवे. पण असा प्रकार एखाद्यावेळी होतो अन् मला काय त्याचे असे म्हणत गंभीर गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. माणूस दिवसभर मेहनत करतो आणि रात्री त्याला सुखाची झोप हवी असते. ती झोप त्याला सुखाची हवी असली, तरी तो काळजी घेत नाही. उलट माझ्या घरी डास नाहीत, अशी फुशारकी मारत झोपतो. झोपेत माणूस पूर्णत: गाफील असतो. त्यावेळी इडिस इजिप्ती नावाची मादी डास येते आणि कडकडून चावा घेत Dengue disease डेंग्यूचे गिफ्ट देऊन जाते. पुढे त्याची प्रकृती बिघडते आणि संपूर्ण कुटुंबाची अर्थव्यवस्था बिघडते. हा केवळ त्या कुटुंबापुरता प्रश्न नाही. यामुळे देशाची श्रमशक्ती वाया जाते. पैशाचाही चुराडा होतो. त्याचे विकासावर दूरगामी परिणाम होत असतात. डेंग्यू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. भारतात 1963 मध्ये कोलकात्यात डेंग्यूची पहिली मोठी साथ आली होती. आता डेंग्यूने संपूर्ण देशालाच आपल्या कवेत घेतले आहे.
 
 
यात एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी नेत्राच्या हालचालीसोबत अधिक होते. चव, भूक नष्ट होते. शरीरावर गोवरासारखे पुरळ येतात. मळमळ वाढते. तर, Dengue disease डेंग्यू रक्तस्रावात्मक तापात सतत पोटदुखी होते. त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होते. नाक, तोंड, हिरड्यातून रक्त येते. रक्तासह उलट्या होतात. झोप येते. श्वास घेताना त्रास होतो. तोंड सतत कोरडे पडते ही सर्व लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांना दाखवा. ही सर्व लक्षणे आपण पाहताच अ‍ॅक्शन मोडवर येणार यात शंका नाही. पण त्याआधी सुरक्षात्मक उपायांचे काय? याचाच विचार आता करायला हवा. बहुतांश लोक आपल्या घरी विविध स्वरूपातील झाडे लावतात. त्यात उपयोगी कमी आणि शोभिवंत झाडांचा अधिकच भरणा असतो. त्या झाडांना टाळून घरोघरी तुळस किंवा सब्जा नावाची वनस्पती अधिक लावायला हवी. यामुळे डास त्या भागात भटकत नाहीत.
 
 
शिवाय फॅशनच्या नावाखाली आपले अंग उघडे ठेवण्याचा जीवघेणा प्रकार वाढला आहे. तो प्रकार टाळून संपूर्ण शरीर झाकले जाईल अशाच स्वरूपाचे कपडे परिधान करून डासांना चावा घेण्याची संधी संपवायला हवी. आपण कोरोनावर मात केली. पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबवित पोलिओलाही हद्दपार केले. त्याच धर्तीवर डेंग्यू, मलेरिया होणार नाही याकरिता विशेष मोहीम राबविण्यावर भर देण्याची वेळ आलेली आहे. आपण डासांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज घरोघरी अगरबत्ती आणि इतर औषधी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भलेही कोट्यवधी रुपयांची उलाढाल वाढली असेल, पण मुळात डासांची उत्पत्तीच होणार नाही, अशी कृती करण्याची गरज आहे. मात्र, आमच्या गावात स्वच्छता नाही, असे म्हणत प्रशासनाला दोष न देता एक सुजाण नागरिक म्हणूनही आपण पुढे यायला हवे. अनेकांना हा विषय गंभीर वाटणार नाही; मात्र जेव्हा त्यांना डेंग्यूची लागण होईल तेव्हा त्याचे महत्त्व कळेल. यामुळे ते महत्त्व कळावे, असा अनुभव येण्याची प्रतीक्षा न करता उठा, सज्ज व्हा अन् देशातून डासांना हद्दपार करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा... 
 
- 9881717859