सनातन धर्मावरील हल्ल्याचे राजकारण

    दिनांक :11-Sep-2023
Total Views |
कानोसा
- अमोल पुसदकर
तामिळनाडू सरकारमधील मंत्री Udayanidhi Stalin उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर आपल्या भाषणात हल्ला केला. त्यात त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांशी केली. त्यापुढे ते म्हणाले की, सनातन धर्माचा केवळ विरोध करून चालणार नाही तर त्याला समूळ नष्ट केले पाहिजे. तामिळनाडूच्या राजकारणाचा हा जुनाच भाग आहे. आम्ही द्रविड आहोत. आम्ही सनातन धर्म मानणार्‍या हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आर्य बाहेरून आले होते. ते द्रविड लोकांचे शत्रू होते इत्यादी प्रकारचा दुष्प्रचार हे लोक करीत असतात. काही इंग्रज विद्वानांनीसुद्धा आर्य बाहेरून आले होते. द्रविड व आर्य हे वेगळे आहेत अशा पद्धतीची बुद्धिभेद करणारी भूमिका मांडलेली आहे. इंग्रजांच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही याच्या आधारावर काही राजकीय पक्षांनी आपले राजकारण केलेले आहे. परंतु, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आर्य बाहेरून आलेले नव्हते ते येथीलच होते व द्रविडसुद्धा येथीलच होते, अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे.
 
 
Udayanidhi Stalin
 
आता हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे की, भारतात राहणार्‍या सर्व जाती-पंथांच्या लोकांची गुणसूत्रे ही सारखीच आहेत. त्यामुळे कोणीही विदेशी नाही, हे सिद्ध होते. आर्य या संस्कृत शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा आहे तर द्रविड हा शब्द जातिवाचक नसून एका विशिष्ट परिसरामध्ये राहणारे लोक अशा अर्थाचा तो शब्द आहे. उदाहरणार्थ बंगालमध्ये राहणारे बंगाली, बिहारमध्ये राहणारे बिहारी अशा पद्धतीचा हा शब्द आहे. ज्या लोकांनी द्रविड आणि आर्य यांच्यामधील संघर्ष मांडलेला आहे त्यांनी आर्यांनी कोणाच्या नेतृत्वात द्रविडांवर हल्ला केला व विजय मिळविला, हे कधीही सांगितले नाही. नेमक्या कोणत्या काळामध्ये हा संघर्ष झाला हेसुद्धा मांडलेले नाही. आपल्याकडे रामायण-महाभारतासारखे प्राचीन ग्रंथ आहेत. त्यानंतर साहित्यामध्ये अनेकानेक कवी, नाटककार होऊन गेले. त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीवर आधारित कथा, नाटक इत्यादी लिहिले आहे. परंतु, कोणत्याही ग्रंथांमध्ये आर्य आणि द्रविड यांच्या संघर्षाचा, युद्धाचा इतिहास नाही. भारतावर जितके विदेशी आक्रमक आले त्यामध्ये शक, हूण, यवन, सिकंदर इत्यादी सर्वच आक्रमकांचा व इस्लामी आक्रमकांचा उल्लेख आहे. परंतु, आर्यांनी कोणत्या लोकांवर स्वारी केली व कोणाच्या नेतृत्वात केली, कोणत्या कालखंडात केली याचा कुठेही उल्लेख नाही. यावरून आपल्या असे लक्षात येते की, भारतातील समाजामध्ये फूट पाडण्यासाठी इंग्रजांनी केलेला हा बुद्धिभेद होता व याच भूमिकेला पुढे नेत समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांनी स्वातंत्र्यानंतर चालविला होता. त्याचाच परिणाम म्हणजे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीचा वाद आढळून येतो.
 
 
 
प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्तरेत अयोध्येला झाला. परंतु, त्यांची पूजा करणारा समाज दक्षिणेत राहतो. ज्या Udayanidhi Stalin उदयनिधी स्टॅलिन याने अशा पद्धतीचे वक्तव्य केले त्याचे आजोबा करुणानिधी होते. करुणानिधी म्हणजे कोण? रामच ना! भगवद्गीता उत्तरेमध्ये कुरुक्षेत्रावर सांगितली गेली, परंतु त्यावर भाष्य लिहिणारे जगद्गुरू शंकराचार्य दक्षिणेत जन्माला आले. ज्या काळात बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार, प्रभाव भारतात व भारताबाहेर मोठ्या प्रमाणावर झालेला होता त्या काळामध्ये सनातन धर्माला पुन्हा एकदा जागृत करण्याचे व त्याचे संरक्षण करण्याचे कार्य ज्या जगद्गुरू शंकराचार्यांनी केले; ते तर दक्षिणेतीलच होते. संस्कृत ही आर्यांची भाषा मानली तर दक्षिणेतील साहित्य हे संस्कृत भाषेमध्ये कसे निर्माण झाले? यावरून आपल्या असे लक्षात येते की, द्रविड-आर्य विवाद असेल किंवा सनातन धर्मावरील टीका असेल हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. वास्तविक पाहता या राज्यामध्ये विविध मठ-मंदिरांना सांभाळणारे जे मंत्री आहेत त्यांचे या संमेलनामध्ये, ज्यामध्ये सनातन धर्माचे निर्मूलन करण्याची भाषा केली गेली, त्यात त्यांचेही भाषण झाले. म्हणजे करोडो हिंदूंनी श्रद्धेने देवळांमध्ये टाकलेला पैसा हा सरकारी तिजोरीत जायचा आणि त्या पैशावर मजा मारणारे सरकारचे मंत्री यांनी सनातन धर्माला शिव्या द्यायच्या अशा पद्धतीचा हा प्रकार आहे. चर्च आणि मशिदीमधील लोकांच्या दानातून जमा झालेला पैसा सरकार घेत नाही. त्यांच्यासाठी कोणतेही मंत्रालय नाही व त्यांच्या निर्मूलनाची भाषा हे लोक करू शकत नाही. परंतु, जो शांतिप्रिय हिंदू समाज आहे त्याच्या धर्मावर टीका करण्याचे व त्याचे निर्मूलन करण्याची भाषा हे राजकीय लोक बोलतात, हे केवढे मोठे दुर्दैव आहे. याला कारणीभूत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू समाजाची कुठलीही ‘व्होट बँक’ नाही. म्हणजे हिंदू समाज हिंदू म्हणून मत द्यायला जात नाही. तो विविध राजकीय पक्षांमध्ये विभाजित झालेला असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या राजकीय पक्षांचे फावते व ते सनातन धर्मावर टीका करू शकतात.
 
 
 
अशी टीका ज्यावेळेस सनातन धर्मावर होते त्यावेळेस भाजपा व्यतिरिक्त इतर पक्षांमध्ये जे नेते आहेत ते कोणती भूमिका घेत आहेत? हिंदूंच्या विविध मठ-मंदिरांमध्ये जाऊन निवडणुकीच्या आधी हिंदूंची मते आकर्षित करण्याचे काम जे लोक करतात, जे लोक कुंभमेळामध्ये आम्हीही स्नान केले हे दाखवतात, ते सनातन धर्मावरील या टीकेने व्यथित का झाले नाहीत? कारण त्यांचे हिंदुत्व ढोंगी आहे. त्यांचे लक्ष इतर धर्मीयांच्या गठ्ठा मतांवर आहे. 1200 वर्षांच्या इस्लामी आक्रमणामध्ये सनातन धर्म नष्ट होऊ शकला नाही, समाप्त होऊ शकला नाही. 200 वर्षांच्या इंग्रजांच्या आक्रमणामध्ये सनातन धर्म या भूमीतून नष्ट होऊ शकला नाही. जगाच्या रंगमंचावर अनेक प्रकारांचे धर्म, पंथ, संप्रदाय आहेत. ते वेगवेगळ्या काळामध्ये निर्माण झाले आणि त्यापैकी अनेक नष्टही झाले. सनातन धर्म हा काल सुसंगत आहे. तो पालनकर्त्यावर धर्माचे पालन केले पाहिजे यासाठी जोर जबरदस्ती करीत नाही. तो स्वेच्छेने आचरावयाचा धर्म आहे. विश्वातील मानव जातीने ज्यावेळेस आपले डोळे उघडले त्यावेळेस त्यांना जो धर्म दिसला तो सनातन धर्मच होता. हा धर्म कुठे वाळवंटामध्ये टोळी युद्धातून जन्माला आलेला नाही. याचा कोणी एक प्रेषित किंवा देव नाही. शेकडो ऋषी-मुनींनी आपल्या अनुभवातून, आचरणातून समृद्ध केलेला हा धर्म आहे. हा एकखांबी तंबू नाही. अनेकानेक खांबांवर हा भक्कमपणे उभा आहे. पूर्वीच्या काळी मंदिरे परकीय व परधर्मी आक्रमकांच्या हल्ल्यांमध्ये ध्वस्त केली जायची. लोकांना धर्मांतरित केले जायचे. हा सनातन धर्मावरील हल्ला होता. आता समाजमाध्यमांवर, वृत्तपत्रांमध्ये, विविध प्रकारांच्या राजकीय व्यासपीठांवरून सनातन धर्मावर हल्ले चढविले जातात. या हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी विविध जाती, पंथ, भाषा, प्रदेश यामध्ये विभागलेला जो समाज आहे, त्याने एकत्र येणे व हे हल्ले परतवून लावणे आवश्यक आहे. जे लोक सनातन धर्माला निर्मूल करण्याची भाषा करीत आहेत ते लोक येणार्‍या काळामध्ये सत्तेमध्ये राहणार नाही, याची खबरदारी सनातन धर्मप्रेमी जनतेने घेणे आवश्यक आहे. 
 
- 9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)