नवी दिल्ली,
Samudrayaan mission : चांद्रयान-3 आणि सूर्य मोहीम आदित्य एल-1 या भारताच्या मोठ्या अंतराळ मोहिमेनंतर आता समुद्रयान या महासागर मोहिमेसाठी तयारी करत आहे. या मोहिमेअंतर्गत तीन जणांना महासागराच्या 6 किमी (6000 मीटर) खोलीवर पाठवले जाणार आहे, अशी माहिती पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर दिली.
समुद्रयान या सागरी मोहिमेसाठी मत्स्य 6000 ही पाणबुडी तयार केली जात आहे. चन्नन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी येथे या पाणबुडीची (सबमर्सिबल) बांधणी सुरू आहे. (Samudrayaan mission) समुद्रयान ही भारताची पहिली मानवयुक्त दीप महासागर मोहीम आहे. खोल समुद्रातील संसाधने आणि जैवविविधतेचा अभ्यास करणे आणि त्याचे मूल्यांकन करणे या मोहिमेचे उद्दिष्ट्य आहे. समुद्रयान मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत सुरू होईल; तर दुसरा टप्पा 2025 मध्ये प्रत्यक्षात येईल. 2026 पर्यंत संपूर्ण मोहीम फत्ते व्हायला हवी, अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. जी. ए. रामदास यांनी माध्यमांना दिली.
मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, चीन, रशिया, जपान आणि फ्रान्स या विकसित देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळणार आहे. मत्स्यपालन आणि जलकृषी यासोबतच समुद्रात असलेले विविध उपयुक्त वायू, पॉलिमेटेलिक, मॅग्नीज, हायड्रोथर्मल सल्फाईड आणि कोबाल्ट क्रस्ट खनिजे शोधण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे.
विस्तृत किनारपट्टी मोहिमेसाठी बलस्थान ठरेल
समुद्र हा अनेक अर्थाने खजिना असून, त्यातील अनेक गोष्टींचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे सागरी संशोधन हा भविष्यातील फार मोठा भाग असणार आहे. ऊर्जा, गोडे पाणी, जैवविविधता यांचा अभ्यास करताना (Samudrayaan mission) समुद्रातील संशोधन हे मूलगामी ठरणार आहे. यासाठी मोठी किनारपट्टी असणे हे भारताचे बलस्थान ठरणार आहे. भारताची समुद्रयान मोहीम त्याद़ृष्टीने महत्त्वाची ठरेल.
ब्ल्यू इकॉनॉमी समर्थ करण्यासाठी समुद्रयान मोहीम
जमिनीखाली जशी खनिजसंपत्ती असते, तशीच संपत्ती समुद्राखालीही असते. समुद्रात खोल जाऊन या संपत्तीद्वारे ब्ल्यू इकॉनॉमी समर्थ करण्यासाठी भारताने सागरी मोहीम आखली. (Samudrayaan mission) समुद्रयान असे या मोहिमेचे नाव असून, पुढील वर्षी ती राबवली जाणार आहे. या मोहिमेत सहा हजार मीटर खोल समुद्रात जाण्याचा मानस आहे. सहा हजार मीटर म्हणजे जवळपास सात बुर्ज खलिफा बसतील एवढे अंतर!
ब्ल्यू इकॉनॉमी देशाच्या अर्थकारणाला नवी ऊर्जा देईल
भारताला एकूण 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. (Samudrayaan mission) समुद्रकिनार्यावर असलेली नऊ राज्ये आणि लहान-मोठी 1382 बेटे आहेत. या समुद्रात खोलवर सापडणारी खनिजे, वायू अशी नैसर्गिक संसाधने मिळाली तर, ही ब्ल्यू इकॉनॉमी देशाच्या अर्थकारणाला नवी ऊर्जा देऊ शकेल.