राहुल नवीन ईडीचे नवे प्रभारी संचालक

    दिनांक :16-Sep-2023
Total Views |
- संजय मिश्रा यांचा कार्यकाळ संपला

नवी दिल्ली, 
भारतीय महसूल सेवेचे अधिकारी Rahul Navin राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) नवीन प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ईडी प्रमुख म्हणून संजय मिश्रा यांचा कार्यकाळ शुक‘वारी संपला. राहुल नवीन यांची पुढील आदेशापर्यंत ईडीचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते सध्या ईडीतच विशेष संचालक आहेत. 26 जुलैला आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने संजय मिश्रा यांना ईडी संचालक म्हणून 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्याचवेळी कोणत्याही स्थितीत त्यांना यापुढे मुदतवाढ देऊ नये, असेही म्हटले होते.
 
 
Rahul Navin
 
Rahul Navin : 19 नोव्हेंबर 2018 मध्ये दोन वर्षांसाठी संजय मिश्रा यांची ईडीचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. या पदावर त्यांनी जवळपास पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. सरकारने त्यांना या पदावर तीनदा मुदतवाढ दिली होती. त्यांच्या मुदतवाढीला अनेक राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या याचिकांतून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने त्यांची शेवटची मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली होती. मात्र, सरकारच्या विनंतीवरुन विशेष बाब म्हणून त्यांना या पदावर 15 सप्टेंबरपर्यंत राहण्याची अनुमती दिली होती. 18 नोव्हेंबरपर्यंत त्यांचा संचालक म्हणून कार्यकाळ होता. ईडी संचालक म्हणून सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे. संजय मिश्रा यांची नियुक्ती सरकार ईडी आणि सीबीआय यावर देखरेख ठेवणार्‍या एका समितीचे प्रमुख म्हणून करणार असल्याची चर्चा आहे.