रूपे गणेशाची...

17 Sep 2023 06:00:00
- डॉ. गो. बं. देगलूरकर
ज्येष्ठ अभ्यासक
सर्वत्र गणपतीचे आगमन होत आहे. हा सगळा काळ श्रद्धा, भक्ती, आराधना यांनी भारलेला असतो. जनमानस गणेशस्तवनात बुडून गेलेले असते. आपण जाणतो की, घरात पूजला जाणारा गणेश, हा उत्सव लोकमान्य टिळकांनी समाजाभिमुख केला आणि तेव्हापासून Ganapati गणपतीचे माहात्म्य इतरेजनांना समजू लागले. उत्सवात त्यांचा सहभाग वाढू लागला. साहजिकच यानिमित्ताने त्यांच्या मनात गणेशाबद्दल कुतूहल निर्माण झाले. उत्सवाच्या निमित्ताने गणेशाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती तयार केल्या जाऊ लागल्या. आपण गणेशाच्या मूर्तींसंदर्भात विचार करतो तेव्हा लक्षात येते की, एकेकाळी भारतात नाना प्रकाराने गणपतीच्या मूर्ती निर्माण झाल्या. ऐतिहासिकदृष्ट्या किंवा पुरातत्त्वदृष्ट्या पाहिले तर आपल्याला माहिती असणार्‍या काळापासून म्हणजेच कुषाणकाळापासून गणपतीच्या मूर्ती मिळू लागल्या आहेत. इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात गणेशाची रूपे विशेषत्वाने लक्षात येऊ लागली. मूर्ती वा प्रतिमांद्वारे ती स्पष्ट होऊ लागली. साधारणत: आठव्या-नवव्या शतकानंतर मोठा आणि महत्त्वाचा देव म्हणून, 64 कलांचा; अनेक विद्यांचा अधिपती म्हणून लोक त्याकडे पाहायला लागले. हळूहळू त्याची मोठ्या प्रमाणात पूजा होऊ लागली. अर्थात या उत्सवाचे प्रचंड स्वरूप लोकमान्य टिळकांनी निर्माण केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.
 
 
GANESH01-PANCHAMUKHI
 
Ganapati गणपतीच्या किती प्रमाणात आणि कशा कशा मूर्ती आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आज संशोधन करताना मला अशा नानाविध गणेश मूर्ती पाहायला मिळाल्या. त्यामधील वैविध्य पाहूनच हा देव सर्वव्यापी, सर्वसाक्षी असल्याची जाणीव होते. लोक गणेशपूजा ध्यानाच्या दृष्टीने करतात. गणेशाचा जुन्यात जुना काव्यमय उल्लेख तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतो. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ज्या गणपतीचे वर्णन केले आहे, तो षड्भूज म्हणजेच सहा हातांचा गणेश आहे. साधारणत: गणपतीच्या मूर्ती 2-4-6-8 ते 10-12-14 आणि 20 हातांपर्यंतही बघायला मिळतात. भक्त वाढत जातात तशा देवाकडून त्यांच्या अपेक्षाही अधिक असतात. अपेक्षापूर्तीच्या दृष्टीने भक्तच देवाचे अनेक हात अभिप्रेत धरतो. याच कारणाने गणपतीच्या 20 हातांपर्यंतच्या मूर्ती आपल्याला मिळतात. पण ज्ञानेश्वरीतील उल्लेख सहा हातांचा आहे. असे गणपती एका अर्थी दुर्मिळ असतात, असे म्हणता येईल. याचे कारण म्हणजे, विविध प्रकारच्या गणेशमूर्ती मिळत असल्या वा निर्माण केल्या गेल्या असल्या, तरी सहा हातांचे गणपती फार नाहीत. मी ग्वाल्हेरच्या झाशीच्या राणीच्या महालातील मूर्तीच्या वस्तुसंग्रहालयाला भेट दिली, तेव्हा तिथे अशा सहा हातांच्या गणेशमूर्ती बघायला मिळाल्या. अधिक लक्ष देता या मूर्तींचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या नमनाच्या ओव्यांमध्येच दिसते.
 
देखा षड्दर्शने म्हणिपती। तेचि भुजांची आकृती॥
म्हणऊनि विसंवादे धरिती। आयुधे हाती॥
तरी तर्क तोचि परशु। नीतिभेदु अंकुशु॥
वेदांतु तो महारसु। मोदकाचा॥
एके हाति दंतु। जो स्वभावता खंडितु॥
तो बौद्धमत संकेतु। वार्तिकांचा॥
मग सहजे सत्कारवादु। तो पद्मकरु वरदु॥
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु। अभयहस्तु॥
 
असे म्हणत ज्ञानेश्वर इथे एक रूपक साधतात.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे गणपतीच्या अशा मूर्ती दुर्मिळ असतातच; पण त्यातही नृत्य षड्भूज गणेश अत्यंत दुर्मिळ आहे. Ganapati गणेशाच्या नृत्यमूर्ती आढळतात. आपण त्याला नृत्यगणेश म्हणतो. पण सहा हातांचा गणेश नृत्य करीत असल्याची मूर्ती सापडणे अत्यंत दुर्मिळ आहे. महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या दृष्टीने बघायचे तर अशी एकमेव मूर्ती नांदेड जिल्ह्यात देगलूरजवळ एका गावात आढळते. तो नृत्य गणेश असून सहा हातांचा आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्याच्या हातात आपल्याला सर्व आयुधे दिसतात. अशाच गणपतीची एक मूर्ती सिम्बॉयोसिस संस्थेच्या मुलींच्या मेडिकल कॉलेजमागील गणपती देवळात प्रतिस्थापित करण्यात आली आहे.
 
 
Ganapati : गणपतीच्या इतर मूर्तींसंदर्भात विचार करतो तेव्हा एकमुखी गणपती तर दिसतोच; पण त्याची अनेक मुखे असणार्‍या मूर्तीदेखील बघायला मिळतात. शिल्पकार वा संशोधकांनी त्यांची रचना केलेली आढळते. अशीच एक गणेशमूर्ती नेपाळजवळील पाटण येथे आपल्याला मिळते. ती सहा मुखांच्या गणेशाची असल्यामुळे दुर्मिळात दुर्मिळ समजली जाते. गणपतीच्या पाच मुखांच्या मूर्ती अधिक प्रमाणात आढळत असल्या, तरी त्यातही दोन प्रकार आहेत. एकाला महागणपती म्हणतात. त्याला 5 मुख, 10 हात असतात. त्याच्याजवळ वाहन म्हणून फक्त उंदीर असतो. पण त्यातील एक प्रकार असणारा हेरंब 5 मुखाचा, 10 हाताचा असला, तरी त्याबरोबर वाहन म्हणून सिंह असतो. म्हणजेच त्याच्यापाशी उंदराबरोबरच सिंहदेखील बघायला मिळतो. थोडक्यात, हेरंब आणि महागणपतीमधला हा फरक लक्षात राहतो. उंदराशिवाय गणपतीचे दुसरे एक वाहन म्हणजे मोर. मयुरेश्वर नावाच्या गणपतीचे वाहन मोर आहे. गणेशाच्या अशाही मूर्ती आपल्याला बघायला मिळतात.
 
 
एका अर्थी ही सर्वसामान्यांच्या गणपतीची थोडक्यात माहिती झाली. दुसरीकडे तांत्रिकांचेही काही गणपती आहेत. मला अशा काही मूर्तींकडेही गणेशभक्तांचे लक्ष वेधण्याची इच्छा आहे. सर्वप्रथम इथे लक्षात घ्यायला हवे की, तंत्राचे दोन प्रकार आहेत. एका प्रकाराला वामाचार म्हणतात आणि दुसरा आहे तो समायाचार. नाही म्हटले तरी संपूर्ण देशात मिळून वामाचाराच्या मूर्ती पाच-पन्नासाच्या संख्येत बघायला मिळतात. महाराष्ट्रातच अशा चार-सहा मूर्ती आहेत. त्यातील काही औंढा नागनाथला तर हिंगोली जिल्ह्यात आणखी एके ठिकाणी मिळतात. या सगळ्यात मी विशेष लक्ष वेधू इच्छितो ते कुंडलिनी गणेशमूर्तीकडे. कुंडलिनी गणेशाची एकमेव मूर्ती महाराष्ट्रात असून भारतात अन्यत्र कुठेही बघायला मिळत नाही. एका फ्रेंच अभ्यासकाने भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि त्यावर एक मोठे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यात त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या दोन हजार गणेशमूर्ती नमूद केल्या आहेत. पण त्यालाही कुठेही कुंडलिनी गणेशाची मूर्ती आढळली नाही. याचे एक कारण म्हणजे हा गणपती कोणत्याही देवळावर वा वस्तुसंग्रहालयात नाही. वर उल्लेखलेली देशातील एकमेव कुंडलिनी गणेशमूर्ती कल्याणला सदाशिव साठे नामक एका मोठ्या शिल्पकारांच्या वाड्यात मला पाहायला मिळाली. ही गणेशमूर्ती तीन फूट उंचीची असून आता दुर्दैवाने तिचे हात आपल्याला पाहायला मिळत नाहीत. कालौघात ते क्षतिग्रस्त झाले आहेत. एकमेव असल्यामुळे ती विशेष महत्त्व राखून आहे. कुंडलिनी गणपतीचे व्यवच्छेदक लक्षण असे की, मूर्तीला वेणी असते. मूर्तीच्या मानेपासून खाली नितंबापर्यंत पाठीवर तिपेडी वेळी रुळत असल्याचे स्पष्ट दिसते.
 
 
या मूर्तीबद्दल गणेश अथर्वशीर्षामध्ये ‘त्वं मूलाधार: स्थितोसि नित्यम॥ त्वं शक्ति त्रयात्मकः॥ त्वां योगिनो ध्यायन्ती नित्यम॥’ असे वर्णन आहे. म्हणजेच योगी नित्य ध्यान, पूजा करतात अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या पाठीवर कुंडलिनी म्हणजे वेणी आहे. ही तिपेडी वेणी नागिणीसारखी पाठीवरून रुळत खाली येते आणि खाली मूलाधार आहे. अशा पद्धतीने ही वेणी आपल्याला दिसते. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलिनीचे वर्णन आहे. ते वर्णनही या कुंडलिनी गणेशाला तंतोतंत लागू पडते. म्हणूनही या मूर्तीचे महत्त्व अधोरेखित होते. मुख्य म्हणजे ती सामान्य भाविकांना पूजेत ठेवता येते. ते तिची पूजा करू शकतात.
 
 
इथे लक्षात घ्यायला हवे की, कल्पनेतून निर्माण केलेल्या मूर्तींना शास्त्राधार नसतो. मुद्दाम हे सांगायचे कारण म्हणजे गणेश मंडळे Ganapati गणपतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती घडवतात. त्यांचा आकारही भला मोठा असतो. कुठे युद्ध सुरू असेल तर उत्सवातील गणेशाच्या हातात बंदूक दिलेलीही पाहायला मिळते. असे बरेच प्रकार बघायला मिळतात. पण लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या गणेशमूर्तींची पूजा केली जात नाही, तर त्यासमोर ठेवलेल्या छोट्या मूर्तीची पूजा केली जाते. कल्पनेतून निर्माण झालेल्या गणेशमूर्तींची पूजा शास्त्रशुद्ध म्हणता येत नाही. गणेशाची आराधना, पूजा करता अशा एक ना अनेक बाबींची दखल घ्यावी लागते. अभ्यास करता या देवतेची नानाविध वैशिष्ट्ये समोर येतात. ती तिचे महत्त्व आणि माहात्म्य दाखवून देतात.
(लेखक प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ; मंदिरस्थापत्य, मूर्ती व शिल्पवैभवाचे ख्यातकीर्त संशोधक आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती आहेत. प्राचीन भारतीय इतिहास, पुरातत्त्व, भारतीय मंदिर स्थापत्य, शिल्पकला, मूर्तिशास्त्र या विषयांवर त्यांचे सुमारे शंभरहून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत.)
Powered By Sangraha 9.0