‘अर्थपूर्ण’ गणेशोत्सवाची विविधतेतून एकता

    दिनांक :17-Sep-2023
Total Views |
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिलेला Ganeshotsav गणेशोत्सव आपल्या देशातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राचे भूषण असलेल्या या उत्सवाला जागतिक दर्जा लाभला आहे. गणेशोत्सव म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात त्या गणरायाच्या सुरेख मूर्ती, भव्य सजावट, आकर्षक रोषणाई आणि भारलेली तरुणाई. त्याच वेळी कपाळावर आठ्या उमटवतात रस्ते अडवणारे मांडव, वाहनांची गर्दी, फूटपाथवर अतिक्रमण करणारे स्टॉल आणि भान नसलेले तरुण. असे असले तरी कुठल्याही उत्सवाशी निगडित प्रथा-परंपरांना नावे ठेवण्याआधी साजरीकरणाशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यास होणे गरजेचे असते. गणेशोत्सवालाही अनेक कंगोरे आहेत. त्यांचे बारकाईने निरीक्षण केले असता काही बाबी समोर येतात. गणेशोत्सवाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहेच; पण या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये फक्त बड्या व्यापार्‍यांचा नाही तर रस्त्यावर पूजा साहित्य विकायला बसणार्‍या छोट्या व्यापार्‍यांचाही हातभार आहे. गणरायाची पूजा करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उत्सवाच्या आधी काही दिवस गल्लीबोळातही मिळत असते. फक्त उत्सवादरम्यान या पूजा साहित्याची विक्री करून अनेक कुटुंबांना वर्षभराची उपजीविका मिळते. आकर्षक सजावटीसाठी आपण मखर आणि इतर साहित्य खरेदी करतो, वेळप्रसंगी किमतींमध्ये घासाघिसही करतो; पण या विक्रेत्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित या गणेशोत्सवातील कमाईवर मांडले जात असते, याची माहिती आपल्याला नसते. महाराष्ट्राच्या बाहेरून आयात केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू आपल्यासाठी उपलब्ध करून देणारे हे विक्रेते या काळात उत्तम कमाईची स्वप्ने बघत असतात.
 
 
Ganesh-Png-Images-1
 
छोट्या विक्रेत्यांचा माग घेताना लक्षात येते की, Ganeshotsav गणेशोत्सव फक्त हिंदूंचा आणि उच्चवर्गीयांचा सण कधीच नव्हता. अर्थार्जनासाठी जात आणि धर्म यापलीकडे जाऊन अनेक व्यापारी गणेशोत्सवाशी निगडित व्यवसायांमध्ये मग्न असतात. पिढ्यान्पिढ्या गणपतीचे सोन्याचे दागिने आणि गौरीचे मुखवटे पॉलिश करून देणारे एखादे उस्मानभाई असोत, जागोजागी पूजेच्या साहित्याची विक्री करणारे मुस्लिम आणि पारशी बांधव असोत, विविध जातीच्या विक्रेत्यांची दुकाने असोत, अर्थार्जनासाठी हे गरजू व्यावसायिक गणरायाच्या आगमनाची वाट बघत असतात. गौरी-गणपतीचे दागिने चमकवण्याचा व्यवसाय असणार्‍या उस्मानभाईंची सध्या चौथी पिढी कार्यरत आहे. पुण्यातील महात्मा फुले मंडईतील हिंदू आणि मुस्लिम बांधवांतर्फे गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी मंडई गणपतीला तोरण अर्पण केले जाते. गणेशोत्सवाकडे केवळ अर्थार्जनाचा मार्ग म्हणून न बघता गणरायाच्या आगमनाची लगबग या बांधवांमध्ये दिसून येते, हीसुद्धा एक दखलपात्र बाब. जात आणि धर्माचे अवडंबर न माजवता या सर्व व्यावसायिकांच्या अनेक पिढ्या या काळात सुखाने एकत्र नांदतात. ही झाली गणेशोत्सवाची एक बाजू.
 
 
Ganeshotsav गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ सांगतात, आपल्या देशामध्ये रोजगार मिळवून देणारे अनेक उत्सव आहेत आणि ते जल्लोषात साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सवाचे स्थान महत्त्वाचे आहे. देशामध्ये मोठ्या पातळीवर साजर्‍या केल्या जाणार्‍या गणेशोत्सवामध्ये प्रचंड आर्थिक उलाढाल होते. देशातल्या व्यापारावर आणि एकुणच उद्योग क्षेत्रावर नजर ठेवून असणार्‍या ‘असोचेम’ या दिल्लीस्थित संस्थेच्या सर्वेक्षण अहवालानुसार, गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये झालेली उलाढाल 60 हजार कोटी रुपये इतकी होती. अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना हा या उत्सवाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. अर्थकारण, जातधर्म यापलीकडे जाऊन जनमानसाला उपकृत करणारा हा उत्सव विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपाची उपयुक्तता निश्चितच कालातीत आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक उदाहरण बघू. गणरायाच्या आरती आणि पूजेसाठी लागणार्‍या वस्तूंचे कारखाने संपूर्ण देशभरात पसरले आहेत. गणेशाच्या आरतीसाठी लागणारे तबक प्रामुख्याने राजस्थानमध्ये तयार होते. हळद-कुंकू उत्तरप्रदेशमध्ये तयार होते. पूजेसाठी लागणारे नारळ आणि तांदूळ दक्षिणेकडील राज्यांमधून आयात करावे लागतात. देवाला वाहिल्या जाणार्‍या फुलांची मशागत करणार्‍या शेतकर्‍यापासून हार ओवणार्‍या कारागिरापर्यंत विक्रेत्यांची एक मोठी साखळीच कार्यरत असते. आरास करण्यासाठी लागणारी कृत्रिम फुले मुख्यत्वे पंजाबमध्ये तयार होतात. गणेशाच्या मूर्तीसाठी लागणारी शाडूची माती गुजरातमधील कच्छ या भागातून येते. मूर्ती तयार करणारे कारागीर मुख्यत्वे पेण, कोल्हापूर या शहारांमधील असतात. मूर्तीसाठी लागणारे रंग मुंबईमधील कारखान्यात तयार होतात. भारतभर पसरलेले हे व्यावसायिकांचे जाळे हा खरोखरच अभ्यासाचा विषय आहे.
 
 
Ganeshotsav गणेशोत्सवातील नकारात्मक बाबींचे अस्तित्व न नाकारता, सकारात्मक घटनांची नोंद घेणे तितकेच आवश्यक आहे असे वाटते. तक्रार करून आपल्याला लाभलेल्या या सांस्कृतिक वारशाचा अपमानच होतो. संपूर्ण जगभरात एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहून पार पडणारा हा एकमेव उत्सव आहे. इथे जात-धर्मापलीकडे जाऊन तयार होणारी एकात्मता बघितली पाहिजे, अर्थकारण बघितले पाहिजे. अक्षरशः 24 तास छोट्या-मोठ्या वस्तू विकत रस्त्यावर फिरणारे फेरीवाले, गजरे, फुले, हार विकणारे वयस्कर नागरिक, एका बस्कराच्या जागेत दिवसभर बसून दागिने विकणार्‍या स्त्रिया, बापासोबत छोट्याशा हातगाडीकडे ग्राहकांना आकृष्ट करणारा मुलगा, या व्यक्तींकडे बघितले पाहिजे. बाबांच्या खांद्यावर बसून गणपती बघणार्‍या मुलाच्या डोळ्यातील उत्सुकता बघून मन प्रसन्न होते. रात्रंदिवस सेवेत रुजू असलेल्या पोलिसांच्या संयमाकडे बघून थक्क व्हायला होते. जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या हिंदुधर्मीय व्यक्ती आपापल्या परीने गणेशोत्सव साजरा करतात. जर्मनीमधील ढोलपथके, अमेरिकेतील गणेशोत्सव मंडळे आता काही नवी नाहीत. लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना होते तितक्याच भक्तिभावाने अमेरिकेतील साई संस्थानाच्या गणरायाची आराधना होते. गणेशोत्सवाला प्राप्त झालेले जागतिक स्वरूप अनेक आघाड्यांवर महत्त्वाचे ठरत आहे.
 
 
Ganeshotsav गणेशोत्सवात मिरवणुकीच्या दणदणाटात डीजेचा कर्कश्श आवाज आपल्याला खूप त्रास देतो, पण अहोरात्र मेहनत घेऊन भव्य देखावे उभारणारी मंडळेसुद्धा आहेतच की...! अनेक गणपती मंडळे वर्षभर सामाजिक उपक्रमांचे नियोजन करीत असतात. अनाथालयाला मदत करण्यासाठी कार्यक्रमांचे नियोजन, समाजातील वंचित घटकांना मार्गदर्शन करणारे कार्यक्रम, रक्तदान शिबिरे अशा अनेकविध उपक्रमांचे नियोजन करणारी अनेक मंडळे सापडतील. डॉल्बीच्या भिंती उभारणार्‍या मंडळांकडे बघायचे का समाजप्रबोधनासाठी कार्यरत असणार्‍या शेकडो मंडळांकडे बघायचे, हे आपण ठरवायला हवे. कारण समाजात एखादा बदल घडवून आणायचा असेल तर आपल्यापासूनच सुरुवात करावी लागते असे म्हणतात. हा बदल केला तर काही काळानंतर कदाचित या सणाचे औचित्य नव्याने सांगत बसावे लागणार नाही. कुप्रथांची पुन:पुन्हा चर्चा करावी लागणार नाही. अर्थात समाजजागृतीचा वसाही सोडता येणार नाही. जागेवर बसून किंवा तत्त्वचिंतकाच्या भूमिकेतून आपण अपेक्षित बदल घडवू शकणार नाही. चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन, तरुणाईमधील विधायकतेला आकृष्ट करणारे कार्यक्रम आणि संस्थात्मक पातळीवर उभे करता येणारे रचनात्मक काम या बळावर पुढील काळातला गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण करता येईल. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या साचेबद्ध विचारपद्धतीचे मळभ दूर करण्याचा प्रयत्न करू या. तरच, आपल्याला टिळकांना अपेक्षित गणेशोत्सव परत अनुभवण्याची संधी मिळेल.
 
 
- राधिका परांजपे