तुका आकाशाएवढा
कस्तुरी द्रव्य ज्या हरणाच्या नाभीमध्ये असते अशा हरणाला ‘कस्तुरी मृग’ असे म्हणतात. कस्तुरी या द्रव्याचे वैशिष्ट्य जाणून घेतल्यास ते अत्यंत सुगंधी असते. Saint Tukaram Maharaj हा सुगंध प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. अर्थात ज्या हरणाच्या नाभीमध्ये हे सुगंधी द्रव्य आहे त्या हरणालासुद्धा या सुगंधाने वेड लावलेले असते म्हणून ते या सुगंधाच्याच शोधात रानावनात फिरत असताना दिसते. विशेष म्हणजे हे हरण ज्याही ठिकाणी बसेल ती मातीसुद्धा सुगंधित होते. अशा या सुगंधाच्या शोधात ते रात्रंदिवस फिरत राहते. वास्तविक पाहता कस्तुरी ही तिच्याच नाभीमध्ये असताना ते इतरत्र सारखा या सुगंधाचा शोध घेत फिरत राहते. याचे कारण लक्षात घेतल्यास, आपल्याच जवळ ती बाब असल्याची त्याला जाणीवच नसते. ते रात्रंदिवस माळरानात सारखं शोधत फिरताना दिसते. त्याचप्रमाणे मानवाच्या अंगी अनेक चांगल्या गोष्टी असतात. अनेक प्रकारच्या क्षमता असतात.
त्या क्षमतांची त्यांना जाणीवच नसते. त्यामुळे ते इतरांच्या मागे सतत लागूनही काम अपूर्ण राहते व अपयशाला सामोरे जावे लागते. परंतु जे लोक आपल्या क्षमतेची जाणीव ठेवून असतात ते नेहमी यशस्वी होताना दिसतात. ध्येयाकडे वाटाचाल करीत मग अर्थपुर्ण जीवन जगताना दिसतात. कारण आपलं स्वत:चं हित कशामध्ये दडलेलं आहे, याची जाणीव ठेवून जागृत राहून यशाचे शिखर गाठताना दिसतात. म्हणून या क्षमतेचे मोल स्वत:च जे ओळखतात त्यांच्यासारखे भाग्यवान कुणीच नाही. कारण अशा या क्षमतांचा उपयोग ते आपल्या जीवनात बरोबर करून घेताना दिसतात. क्षमतेची जाणीव नाही किंवा क्षमता असतानाही तिचा वापर जे करत नाहीत अशा लोकांची ओझे वाहणार्या प्राण्यांसारखीच स्थिती होते. आयुष्यात ते कधीच यश प्राप्त करू शकत नाही. म्हणून आपल्यातील कौशल्याचा विकास करून आयुष्यात खूप काही मिळवता येतं. आपल्यातील गुणांचा विकास करून त्या क्षमतेने त्याचा वापर करावा अन्यथा ओझे वाहणार्या गाढवात व आपल्यात काही फरक राहणार नाही. संपूर्ण आयुष्य ओझे वाहण्यातच जाईल. म्हणूनच भाग्यवंत किंवा हुशार त्यांना म्हटले गेले की, ज्यांना आपल्या गुणाची, कौशल्याची जाणीव आहे. ते आपल्या गुणाचा व कौशल्याचा आपल्याकरिता तसेच इतरांकरितासुद्धा उपयोग करताना दिसतात.
मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास।
असे ज्याचा त्यास नसे ठावा॥
भाग्यवंत घेती वेचूनिया मोलें।
भारवाही मेले वाहता ओझे॥
चंद्रामृतें तृप्तिपारणे चकोरा।
भ्रमरासी चारा सुगंधाचा॥
अधिकारी येथे घेती हातवटी।
परीक्षवंता दृष्टी रत्न जैसे॥
तुका म्हणे काय अंधळिया हाती।
दिले जैसे मोती वाया जाय॥
अ. क्र. 3369
Saint Tukaram Maharaj : स्वत:मध्ये असलेल्या गुणांची व आत्मसात केलेल्या कौशल्याची जाणीव असावी. याची जर जाणीव नसेल तर त्याचं दुदैवच म्हणावं लागेल. आयुष्यात आपलं कल्याण कुठं होईल? या प्रश्नाचं उत्तर ज्याला माहीत आहे किंवा त्या संदर्भातील संपूर्ण जाणीव आहे, तो बरोबर आपलं कल्याण करून घेत असतो. ती वेळ साधत असतो. जसे चकोराला माहीत असते की, चंद्राच्या प्रकाशामधून अमृत निघतं. म्हणून चकोरबरोबर चंद्रप्रकाश पडण्याची आतुरतेने वाट पाहात असतो. चंद्र निघण्याच्या वेळेवर हजर असतो. मग चंद्रप्रकाश पडत असताना त्यामधून पडणार्या अमृताचा स्वाद तो मनमुरादपणे घेत असतो व अमृत पिण्याची असलेली त्याची तीव्र इच्छा किंवा ती लागलेली आपली भूक भागवीत असतो. अशा या चंद्रप्रकाशातून पडणार्या अमृताचा लाभ घेऊन तो आपलं जीवनातलं उद्दिष्ट पूर्ण करीत कल्याण साधत असतो. त्याचप्रमाणे भ्रमर म्हणजे भुंगा याला फुलातील मकरंद तसेच परागकण चाखायचे असतात. अशा या त्याच्या सुगंधी खाद्याच्या तो शोधात असतो तेव्हा तो फुलं उमलण्याची प्रतीक्षा करतो. त्याला हे माहीत असतं की, आपला असा हा सुगंधी चारा फुलं उमलल्याशिवाय मिळणारच नाही, याची जाणीव तो ठेवून असतो. म्हणून फुलं उमलताबरोबर त्या फुलावर बसून मग सुगंधी चारा तो मिळवित असतो व आपल्याला जे पाहिजे ते मिळवून जीवनात सुखी व समाधानी होत असतो.
त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्याला काय मिळवावयाचे आहे याची जाणीव ठेवून योग्य वेळ साधली गेली पाहिजे. अशी वेळ साधणारे हे तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. ते आपलं कार्य पूर्ण करण्याच्या द़ृष्टीनं अत्यंत जाणकार असतात. आपल्या हिताविषयी जागृत राहून ती गोष्ट मिळविण्याकरिता पाहिजे ती किंमत मोजून ती प्राप्त करतात. याचं कारण एकच ते म्हणजे ती बाब मिळविण्याकरिता आपल्या गुणांचा व कौशल्याचा वापर करतात. त्यांची एक हातोटी असते. त्यानुसार ते वागतात व आपल्याला जे पाहिजे ते मिळवित असतात. आपले जीवन सुखी व समृद्ध बनवितात. अशा जाणकारांची द़ृष्टी पारखी असते; ते बरोबर खर्या रत्नाची पारख करून मिळवित असतात. चमकणारे हे रत्नच असते असे नाही तर ती गारगोटीसुद्धा असू शकते किंवा एखाद्या चमकणार्या दगडावर पैलू पाडून तो हिर्यासारखा दिसू शकतो. म्हणून तो काही हिरा ठरत नाही. तो ओळखण्याकरिता पारखच लागते. जसे सोन्यासोबत असलेला हिणकस भाग शुद्ध सोनं ठरू शकत नाही. या ठिकाणी सोनार बरोबर सोनं तापवून त्यामधला हिणकस भाग ओळखून तो बाजूला करतो व शुद्ध सोने पारखतो तसेच खर्या हिर्याची ओळख पटवित असताना जाणकार त्यावर घनाचे घाव घालून त्याची ओळख पटवित असतात. परंतु याच गोष्टी जर आंधळ्याच्या हाती पडल्या तर तो त्याचं मूल्यमापन करू शकत नाही. तो त्याचं मोलही जाणू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये जाणून घेण्याची क्षमता नसते. केवळ द़ृष्टी असून चालणार नाही तर पारखण्याची क्षमता असावी लागते. द़ृष्टिहीन लोकांजवळ मोत्याची काहीच किंमत नसते. तो दगडाची व मोत्याची एकच किंमत करतो.
Saint Tukaram Maharaj : या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास महाराज उपदेश करतात की, केवळ डोळस असून चालणार नाही तर तो पारखी असायला पाहिजे. माणसांच्या अंगी असलेल्या गुणांची व क्षमतांची त्याला पारख करता आली पाहिजे. सत्य काय आहे हे त्याला ओळखता यायला पाहिजे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहीर्जी नाईकांनी किल्ला ताब्यात घेण्याकरिता ‘तुमळीभर देना भाई तुमळीभर देना...’ या काव्याच्या माध्यमातून गुप्तपणे सारी मोहीम सैनिकांना शत्रूसमोर समजून सांगितली होती. त्यानुसार सैनिकांनी लढून किल्ला काबीज केला होता. हे केवळ सैनिक म्हणून लढले असते तर किल्ला काबीज करता आला नसता, परंतु तो कसा लढावा यासंदर्भातील केलेल्या मार्गदर्शनातून सर्वांनी काव्यातील शब्दाचा नेमका अर्थ काढून त्यातील मनोरंजनाचा भाग वगळून त्याप्रमाणे लढले पाहिजे म्हणून ते अधिकारानं मिळवू शकले. त्याचप्रमाणे संतांनी जनसामान्यांना केलेला उपदेश हा त्याच्या सुखी व समृद्ध जीवन उद्धाराकरिता कस्तुरी द्रव्याच्या सुगंधाप्रमाणे सुवासिक असून अमृताप्रमाणे त्याचे जीवन अक्षय होण्याकरिता हिरे, रत्नाप्रमाणे मौलिक ठरावं. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा. जीवनात आपल्यातील गुणांना व कौशल्यांना पारखून घ्यावे. हाच भावार्थ या अभंगामध्ये दडलेला आहे. परंतु ज्यांना हे समजले तेच आपलं हित साधू शकतात. अन्यथा आयुष्यभर कष्ट सहन करावे लागतील.
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007