चिप निर्मितीचा जोश; मोबाईलचा सोस

    दिनांक :17-Sep-2023
Total Views |
अर्थचक्र
- महेश देशपांडे
भारतातील आणि जगातल्या अनेक देशांमधील उद्योगविश्व नजर ठेवून असलेल्या Semiconductor सेमीकंडक्टर निर्मितीच्या क्षेत्रात वेगवान हालचाली आहेत. यामुळे नजीकच्या भविष्यात सेमीकंडक्टर्सची चणचण कमी होईल, असा अंदाज आहे. दुसरीकडे ग्राहकांना, विशेषत: ज्येष्ठांना आरोग्य विम्याद्वारे 100 टक्के कॅशलेस आरोग्य सुविधा देण्ण्याचे प्रयत्न वेग घेत असल्याचे वृत्त आहे. याच सुमारास इंधनाचे दर भडकणार असल्याची बातमीही आली असून मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकवाढीत भारत अव्वल ठरत असल्याचे दिसून आले आहे.
 
 
artthchakra
 
भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमीकंडक्टरसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव हळूहळू होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात झालेले तीन कंपन्यांचे करार पाहता यापुढे देश सेमीकंडक्टर हब बनेलच; परंतु सेमीकंडक्टर निर्मिती कंपन्यांमध्ये शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे. टाटा समूह ‘एनव्हीडिया’ या अमेरिकन चिप कंपनीबरोबर भागीदारीची घोषणा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात उतरू शकते. देशात प्रचंड वेगाने वाढणारी मागणी लक्षात घेता रिलायन्स सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन सुरू करू शकते. यामुळे कंपनी आपल्या पुरवठा साखळीच्या गरजा पूर्ण करू शकेल. रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक विदेशी Semiconductor सेमीकंडक्टर उत्पादन कंपन्यांशी चर्चा करीत आहे, जे रिलायन्सचे तंत्रज्ञान भागीदार बनू शकतात. अहवालानुसार, कंपनीचा सेमीकंडक्टर चिप्स उत्पादन क्षेत्रात प्रवेश करण्याचा मानस आहे; परंतु अद्याप कोणतीही टाईमलाईन निश्चित केलेली नाही. या क्षेत्रात रिलायन्सच्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे बाकी आहे. रिलायन्स कोणत्या विदेशी चिप उत्पादक कंपन्यांशी बोलणी करीत आहे हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. रिपोर्टनुसार, रिलायन्सने सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात प्रवेश केल्याची बातमी यापूर्वी कधीही आली नव्हती. शिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मोदी सरकारला भारतात सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना द्यायची आहे; मात्र सरकारचा हा हेतू फळाला आलेला नाही. सध्या भारतात एकही सेमीकंडक्टर उत्पादन कारखाना नाही. चिपच्या तुटवड्याला तोंड देण्यासाठी रिलायन्सला या व्यवसायात उतरायचे आहे; जेणेकरून तुटवड्यामुळे त्याचा इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय प्रभावित होऊ नये.
 
 
2021 मध्ये, Semiconductor सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे ‘गूगल’च्या सहकार्याने कमी किमतीचा स्मार्टफोन लाँच करण्याची कंपनीची योजना लांबणीवर पडली होती. येत्या काही दिवसांमध्ये याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ‘एनव्हीडिया’ यांनी ‘एआय’संदर्भात भागीदारी जाहीर केली होती. दोन्ही कंपन्या मिळून रिलायन्स इंडस्ट्रीजचे टेलिकॉम युनिट, रिलायन्स जिओच्या लाखो ग्राहकांसाठी एआय भाषा मॉडेल आणि जनरेटिव्ह अ‍ॅप्स विकसित करणार आहे. या भागीदारी अंतर्गत ‘एनव्हीडिया’ कॉम्प्युटिंग पॉवर प्रदान करेल तर रिलायन्स जिओ ‘एआय’ क्लाऊड पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन आणि देखभाल करेल आणि ग्राहकांशी संबंधित गोष्टींकडे लक्ष देईल, असे नियोजन आहे. अमेरिकन कंपनी ‘एनव्हीडिया’ संगणकीय प्रणालीच्या निर्मितीत अग्रेसर आहे. ‘एनव्हीडिया’ची सुरुवात गेमिंग आणि मल्टिमीडिया उद्योगासाठी थ्री डी ग्राफिक्स बनवण्यासाठी करण्यात आली. आज कंपनीची कॉम्प्युटिंग सिस्टिममध्ये जवळपास मक्तेदारी आहे. तैवानचा फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप एसटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सोबत एकत्र येत भारतात सेमीकंडक्टर उत्पादन करण्याच्या विचारात आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात 40 नॅनोमीटर चिप प्लांट उभारण्यासाठी एकत्र अर्ज करण्याची योजना आखली आहे. दोन्ही कंपन्या मिळून सेमीकंडक्टर चिप बनवतील. त्या कार, कॅमेरा, प्रिंटर आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये वापरल्या जातील.
 
 
Semiconductor : दरम्यान, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (ईर्डा) वैद्यकीय खर्चाच्या दाव्यांसाठी 100 टक्के कॅशलेस भरपाई दिली जावी यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत लवकरच पावले उचलली जाऊ शकतात; जेणेकरून उपचारानंतर 100 टक्के खर्चाचा दावा करता येईल. त्याचबरोबर वृद्धांसाठी परवडणार्‍या दरात विमा उपलब्ध व्हावा, यासाठीही काम केले जात आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा खूपच महाग आहे. दुसरीकडे विमा कंपन्या 10 टक्के किंवा त्याहून अधिक रक्कम कापून भरपाई करतात तर रुग्णालये विमा कंपन्यांकडून सुविधा घेतली असूनही अशा रुग्णांना दाखल करण्यास इच्छुक नसतात. ग्लोबल फिनटेक फेस्ट, 2023 मध्ये बोलताना ‘ईर्डा’चे अध्यक्ष देबाशिष पांडा म्हणाले, ‘लाईफ इन्शुरन्स कौन्सिल’ आणि ‘जनरल इन्शुरन्स कौन्सिल’ या संस्था हॉस्पिटल्समध्ये सामायिक पॅनेलमेंट सक्षम करण्यात महत्त्वाची आणि सक्रिय भूमिका बजावत आहेत. यामुळे पॉलिसीधारकांसाठी आरोग्य विमा दावा प्रक्रिया सुलभ होईल. यासाठी अधिकाधिक रुग्णालये जोडण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा सेवा सुधारण्यासाठी आणि राष्ट्रीय आरोग्य एक्सचेंजमध्ये अधिक रुग्णालये जोडण्यासाठी ‘ईर्डा’ राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत काम करीत आहे.
 
 
Semiconductor : येत्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. कच्च्या तेलाची किंमत प्रतिपिंप 107 डॉलरपर्यंत जाऊ शकते. रशिया आणि सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय कायम ठेवल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकू शकतात. ओपेक देशांनी 2024 मध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रतिपिंप 107 डॉलरच्या पातळीवर जाऊ शकते. गेल्या 5 तारखेला सौदी अरेबियाने डिसेंबरपर्यंत कच्च्या तेलाच्या उत्पादनात 10 लाख पिंपांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाने सांगितले की, आणखी कपात आवश्यक आहे की नाही, याचाही आढावा घेतला जाईल. रशियानेही डिसेंबरपर्यंत कच्च्या तेलाची निर्यात तीन लाख पिंप इतकी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांच्या या निर्णयानंतर कच्च्या तेलाने प्रतिपिंप 91 डॉलरचा स्तर गाठला आहे.
 
 
Semiconductor : कच्च्या तेलाच्या किमती वाढून प्रतिपिंप 107 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा ‘गोल्डमन सॅक्स’ या वित्तीय संस्थेचा अंदाज खरा ठरल्यास भारताच्या अडचणी वाढू शकतात. भारतात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाई वाढण्याचा धोका आहे. सरकारी तेल कंपन्यांवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा दबाव वाढणार आहे. त्यांच्या नफ्यात घट होईल. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनाही मोठा धक्का बसणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर होईल. यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. तेव्हा किमती प्रतिपिंप 139 डॉलरवर पोहोचल्या होत्या; मात्र त्यानंतर दरात घसरण झाली. जून 2008 मध्ये जगावर आर्थिक संकट येण्याआधी कच्च्या तेलाची किंमत प्रतिपिंप 147 डॉलरवर पोहोचली होती.
 
 
Semiconductor : भारत हा जगातील सर्वाधिक मोबाईल ग्राहक जोडणारा देश बनला आहे. या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये (जुलै-सप्टेंबर) भारतात 70 लाखांहून अधिक मोबाईल ग्राहक वाढले आहेत. या यादीत 50 लाख ग्राहकांसह चीन दुसर्‍या आणि 30 लाख ग्राहकांसह अमेरिका तिसर्‍या क्रमांकावर आहे. ‘एरिक्सन’च्या अहवालानुसार भारतात स्वस्त दरात इंटरनेट सेवा आणि टेलिकॉमची बाजारपेठ तसेच परिपूर्ण स्पर्धा असल्यामुळे ग्राहक वाढले आहेत. त्याच वेळी, या तिमाहीमध्ये जगभरातील फाईव्ह-जी मोबाईल वापरकर्त्यांची संख्यादेखील 130 कोटींच्या पुढे गेली आहे. अहवालानुसार, यावर्षी जूनमध्ये जागतिक स्तरावर एकूण चार कोटी नवीन ग्राहक जोडले गेले. यासह एकूण ग्राहकांची संख्या 830 कोटी झाली आहे. भारतात 112.5 कोटी मोबाईल ग्राहक आहेत. भारतात त्यांची संख्या 70 लाखांनी वाढली. या काळात चीनमधील मोबाईल ग्राहकांची संख्या 50 लाखांनी वाढली. जून तिमाहीमध्ये फाईव्ह-जी वापरकर्त्यांची संख्या 17.5 कोटींनी वाढून 130 कोटी झाली आहे. अहवालात सांगण्यात आले आहे की, 260 कम्युनिकेशन सेवा प्रदात्यांनी देशात फाईव्ह-जी सेवा सुरू केल्या आहेत. त्यापैकी सुमारे 35 सेवा प्रदात्यांनी स्टँड अलोन नेटवर्क सुरू केले आहेत.
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)