गणाधीश जो ईश...

    दिनांक :18-Sep-2023
Total Views |
वेध
- अनिरुद्ध पांडे

ganadhish 
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमू पंथ आनंत या राघवाचा॥
 
समर्थ रामदास स्वामींच्या या ओळी. गणेश हा सर्व गुणांचा अधीश म्हणून तो Ganadhish गणाधीश. मुळांचा आरंभ, आरंभाचा आरंभ असून त्या आरंभाचाही आरंभ करणारा असा हा गणपती आहे. विद्येची देवता शारदादेवी ही आपल्या चारही वाचांची अधिष्ठाता आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाचा असून आपण नेहमी बोलतो ती वैखरी. प्रभू रामचंद्रांनी जो मार्ग दाखविला आहे त्या मार्गाने वाटचाल करूया, असे समर्थ थोडक्यात सांगतात. ‘आधी वंदू तुज मोरया’ हे जे आहे ते यासाठीच. संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरी लिहिताना ‘ॐ नमोजी आद्या’ हे प्रारंभीचे नमनही श्रीगणेशालाच केले आहे. संत एकनाथांनी,
 
 
कृष्णे स्तविला विनायक, दिधले साखरेचे मोदक।
सुखिया जाला गणनायक, विघ्ने देख निवारिली॥
 
या शब्दांत कृष्ण आणि Ganadhish गणेशाचे नाते सांगितले आहे. संत नामदेवांनी बाळकृष्णाचा मस्तीखोरपणा कमी व्हावा, त्याला सद्बुद्धी मिळावी म्हणून इतर गौळणींच्या सांगण्यावरून यशोदामातेने श्रीगणेशाला नवस केला, व्रत केले. परिणामी बाळकृष्ण शहाण्यासारखा वागू लागला. त्यामुळे यशोदेने गणेशासाठी मोदक केले, पण ते बाळकृष्णाने खाऊन टाकले आणि वरून मातेला आ करून विश्वरूप दाखविले. या कथेचे सार संत नामदेव सांगतात,
 
 
कृष्णनाथें तेव्हा मुख पसरिले
ब्रह्मांडे देखिली, मुखामाजी।
असंख्य गणपती, दिसती वदनी
पाहतसे नयनी, यशोदा ते॥
 
हिंदूंचे देव अगणीत असले तरी गण-नायक एकच, गजानन. गणपती, गणेश हा जनसामान्यांचा देव आहे. त्याच्या स्वरूपापासून विद्वानांना परब्रह्म दिसते, तर पोरासोरांना वाकड्या सोंडेचा लंबोदर आवडतो. शिवरायांनीसुद्धा मराठी राज्याची स्थापना केली ती श्रीगजाननाची प्रतिष्ठापना करूनच. मराठी माणसाचे तर गणपतीवर विशेषच प्रेम आहे. मराठी माणूस शिकायला सुरुवात करतो; इतकंच नव्हे तर कशाचीही सुरुवात करतो ती ‘श्रीगणेशाय नम:’ करूनच. कोणत्याही चांगल्या कामाला सुरू केले की आम्ही म्हणतो, Ganadhish ‘श्रीगणेशा’ केला. कथा-कीर्तनात गणपतीचे मंगलाचरण तर होतेच; पण तमाशाच्या फडातही प्रथम वंदन श्रीगणेशालाच होते. महाराष्ट्रात गणपती बाप्पा इतके कौतुक दुसर्‍या कोणत्याही देवाचे होत नाही. बाप्पा म्हणजे गणपतीच, इतका तो घरातला माणूस आहे, अगदी ‘अरे-तुरे’ने उल्लेख होणारा. गणेशोत्सवासारखा थाटमाट आणि ओसंडून वाहणारा उत्साह दुसर्‍या कोणत्याही सार्वजनिक उत्सवात नसतो. 1893 मध्ये, म्हणजे 130 वर्षांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ केला. पहिल्या वर्षी महाराष्ट्रात पाच सार्वजनिक गणपती मांडण्यात आले. त्यापैकी पुण्यातले दोन आणि मुंबईतील एक असे तीन उत्सव आजही अखंडपणे सुरू आहेत, हे विशेष. लोकमान्यांनी पारतंत्र्यातील भारतीयांची लोकजागृती, लोकशिक्षण याचे एक साधन, एक माध्यम व्हावे, याच मूळ उद्देशाने गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची योजना केली होती.
 
 
सर्व लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व कळावे आणि त्यातून स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळावे या उद्देशानेच लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मराठी माणसाच्या डोक्यात उतरवली होती. या राष्ट्राभिमुख दृष्टीमुळे गणेशोत्सवात धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व कधीच देण्यात आले नाही. सामाजिक उद्देशच महत्त्वाचा राहिला आहे. टिळक गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनंत चतुर्दशीला पुण्यात जी भाषणे देत, ती ऐकायला चांगलीच गर्दी होत असे. या भाषणांसाठी मुंबईहून लोक पुण्याला जात. खास म्हणजे, टिळकांच्या भाषणासाठी पुण्याला जाता यावे म्हणून कल्याणच्या उत्सवात गणेश मूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीऐवजी दोन दिवस आधी, म्हणजे द्वादशीला करायचा परिपाठ होता. 1937 साली गणेशोत्सवात घेतल्या गेलेल्या पाठांतर स्पर्धेत गणपतीस्तोत्र किंवा अथर्वशीर्ष नसून रामरक्षा, मारुतीस्तोत्र व मनाचे श्लोक होते, असेही इतिहास सांगतो. सूर्यनमस्काराच्या स्पर्धाही त्यावेळच्या सार्वजनिक Ganadhish गणेशोत्सवात घेतल्या जायच्या. 1937 मध्ये त्यात सहा मुलींनी भाग घेतल्याची नोंद आहे. त्या काळात अथर्वशीर्षासारख्या प्रार्थनांचे पाठांतर केवळ ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर अशा कोणत्याही स्पर्धा ब्राह्मणांपुरत्याच मर्यादित राहू नयेत, हाही सामाजिक समरसतेचा दृष्टिकोन सव्वाशे वर्षांपूर्वीच्याही धुरिणांचा होता, हे लक्षात घेण्यासारखे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यप्राप्ती चळवळीचाच एक भाग आहे, याचे भान त्यावेळच्या संयोजकांना कटाक्षाने होते, हेच आज आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे. 
 
- 9881717829