कानोसा
- अमोल पुसदकर
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम Ganesh festival गणेश उत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळेस देशावर इंग्रजांचे राज्य होते. लोकमान्य टिळकांना तसेही इंग्रज सरकारने भारतीय असंतोषाचे जनक हे नाव दिलेले होते. हा असंतोष कोणाविरुद्ध तर इंग्रज सरकार विरुद्ध होता. भारतात राजेशाही असल्यामुळे भारतातील जनतेला नेहमीच जे काय करेल ते राजा करेल; आम्हाला त्याचे काय? अशा पद्धतीच्या वर्तनाची व मानसिकतेची सवय होती. त्यामुळे इंग्रजांचे फावले व मूठभर इंग्रज करोडो लोकांवर राज्य करू शकले. परंतु ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ अशा पद्धतीची गर्जना लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केली. सर्वसामान्य समाजामध्ये इंग्रजांचे राज्य हे परकीयांचे राज्य आहे. हे राज्य उखडून टाकले पाहिजे यासाठी मी विविध मार्गांनी प्रयत्न केले पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकमान्य टिळकांनी निर्माण केली.
महाराष्ट्रामध्ये Ganesh festival गणेशाची पूजा मोठ्या प्रमाणावर होते. इंग्रज सर्वसामान्य लोकांना कोणत्याही निमित्ताने एकत्र येण्यासाठी बंदी घालत होते. परंतु धार्मिक उत्सवाचे आयोजन हा काही गुन्हा नव्हता. त्यामुळे लोकांना लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने एकत्र करायचे ठरविले. इंग्रजांनी शस्त्र बाळगण्यावर बंदी घातली होती. पूर्वीच्या काळाचा शस्त्रधारी समाज आता नि:शस्त्र झालेला होता. त्यामुळे शस्त्र कसे चालवायचे, त्याचे पवित्रे कसे असतात, त्याचा पदविन्यास कसा असतो हे समाजाने विसरू नये यासाठी विविध आखाड्यांचे शस्त्र चालविण्याचे प्रयोग खेळ म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस गणेशोत्सवाच्या मध्ये ठेवले. यामुळे वेगवेगळ्या मंडळांमध्ये स्पर्धा लागली. तरुण जमू लागले. शस्त्रांच्या प्रात्यक्षिकांचा अभ्यास सुरू झाला व जी विद्या लोक विसरत चाललेले होते ती लोकांच्या मनामध्ये राहायला लागली. इंग्रजांनी नेमलेल्या रोलेट समितीने गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वराज्य मिळविण्याची भावना वाढीस लागल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले व त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी दुसरा प्रयोग केला तो म्हणजे समाजाची परिस्थिती, देशाची परिस्थिती, आपला इतिहास यावर आधारित विविध भाषणांचे आयोजन.
हे आयोजन Ganesh festival गणेश उत्सवाच्या निमित्ताने होऊ लागले. त्यामुळे लोकांना आपला इतिहास कळू लागला, आपले कर्तव्य कळू लागले आणि त्यातून लोकांमध्ये जागरण सुरू झाले. लोक इंग्रजी सत्तेच्या विरोधात कार्य करण्यास प्रवृत्त होऊ लागले. त्या काळामध्ये कुठलीही पूजा पद्धती म्हटली तर त्यामध्ये विविध प्रकारचे सोपस्कार राहायचे. गणेश उत्सवाचा उपयोग लोकमान्य टिळकांनी समाजामध्ये सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी केला. आता गणेश उत्सव हे सार्वजनिक झाले होते. विविध वस्त्यांमध्ये विविध मंडळांच्याद्वारे गणेशाची प्रतिष्ठापना होऊ लागली. वेगवेगळ्या समाजाच्या वस्त्यांमध्ये गणेशाची स्थापना होऊ लागली. त्यामुळे खर्या अर्थाने लोक एकत्र येऊ लागले. गणेश उत्सव साजरा करू लागले. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये संघ भावना निर्माण होऊ लागली आणि समाजामध्ये सामाजिक समरसता, सहभोजन, एकत्र विचार, एकत्र कार्य करणे या गोष्टी सहजपणे होऊ लागल्या. हे गणेश उत्सवाचे फार मोठे यश होते. लोकांच्या श्रद्धेला लोकमान्य टिळकांनी राष्ट्रभक्तीची जोड दिली. लोकांच्या श्रद्धेला लोकमान्य टिळकांनी लोकांना संघटित करण्याचे साधन बनवले. समाजातील कुरीती नष्ट करण्यासाठी गणेशोत्सवांनी फार मोठा सहभाग नोंदविला. महाराष्ट्रातच नव्हे तर लोकमान्य टिळकांच्या आवाहनाखातर देशामध्ये अनेक राज्यांनी गणेशोत्सव सुरू केले. समाज देव, देश आणि धर्म यासाठी संघटित झाला.
काही काळानंतर देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. आपले सरकार आले. हळूहळू लोक आपापल्या कामात लागले. पुन्हा एकदा समाज स्वकेंद्रित, स्वार्थकेंद्रित होऊ लागला. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक उद्दिष्ट, देशासमोरील समस्या याचे अनेकांना विस्मरण झाले. त्यामुळे पुन्हा एकदा समाजाला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. आज महाराष्ट्रात जवळपास एक लाख मंडळ गणेश उत्सव साजरा करतात. प्रत्येक मंडळामध्ये शेकडो सभासद असतात. काही कोटी लोकांचा या Ganesh festival गणेशोत्सवामध्ये सहभाग असतो. परंतु आता या लोकसहभागाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. गणपती म्हणजे केवळ डीजे-सिनेमाची गाणी वाजविण्याचे स्थान नाही. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनच्या नावाखाली छोटे कपडे घालून त्याचे प्रदर्शन करण्याचे स्थान नाही. गणपती म्हणजे चित्रपट गीताच्या भेंड्या नाही. गणपती म्हणजे जेवणावेळी नाही. गणपती म्हणजे भजन स्पर्धा, भक्तिगीते, आखाड्यातील विविध कलांचे प्रदर्शन, मुलांच्या कलागुणांचा विकास, सामाजिक विषयांवर भाषणे, प्रेरक इतिहासाचे जागरण, गुणवत्तेचा सत्कार होय. समाजासमोर अनेक समस्या आहे. लव्ह जिहाद, धर्मांतरण, भ्रष्टाचार, वाहतुकीचे नियम तोडणारा समाज, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मोबाईल आणि समाज माध्यमांचा गैरवापर, प्रदूषित होत चाललेल्या नद्या, सिमेंटची जंगले, कुटुंब व्यवस्थेतील समस्या, वाढते तापमान, प्रदूषण, राजकीय पक्षांचे जाती-जातीमध्ये कलह निर्माण करण्याचे षडयंत्र, वस्तीतील विविध समस्या, नोकरीनिमित्त वस्तीमध्ये कुठून तरी राहायला येणारे लोक आणि त्यांनी चालविलेले काळे धंदे असे अनेक विषय आहेत.
लोकांनी एकत्र येऊन आमच्या वस्तीतील समस्यांकरिता, सामाजिक व राष्ट्रीय समस्यांकरिता आम्ही काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. देव, देश आणि धर्म याकरिता समाजाने पुन्हा एकत्र व्हावे, सामाजिक क्रांती घडवून आणावी, बदल घडवून आणावा. हा Ganesh festival गणेशोत्सवाचा सामाजिक संदेश आपण ध्यानात घेतला पाहिजे.
-9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)