महाभारताची साक्ष देणारा उजव्या सोंडेचा गणपती

18 Sep 2023 20:04:08
- संतोष शेंडे
 
टाकरखेडा संभू, 
Mahabharata Ganpati : भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र वायगाव येथे महाभारतातील इतिहासाची साक्ष देणारी उजव्या सोंडेची अद्भूत गणेशमूर्ती पाहावयास मिळते. पांडव अज्ञातवासात असताना ते चिखलदरा येथे आले होते. परतीच्या वेळी याच मूर्तीचे दर्शन घेऊन पांडवांनी अज्ञातवास संपविला, अशी आख्यायिका आहे. अशी पार्श्वभूमी लाभलेली गणेशमूर्ती सहाशे वर्षांपूर्वी खोदकामात सापडली. ती महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या मनात बसली आहे.
 
Mahabharata Ganpati
 
महाराष्ट्रात दोनच ठिकाणी (Mahabharata Ganpati) सिद्धीविनायकाची ही मूर्ती पहावयास मिळते. मुंबईनंतर भातकुली तालुक्यात वायगाव येथे ही मूर्ती आहे. अमरावती ते परतवाडा मार्गावरील या सिद्धिविनायकाचा इतिहास महाभारतातील विराट पर्वात आहे. पांडवांनी याच मूर्तीचे दर्शन घेऊन अज्ञातवासाचा कालावधी संपविला होता. मध्ययुगीन काळात ही मूर्ती मूर्तीभंजक आक्रमकांच्या भयाने भूमिगत ठेवण्यात आली होती. गावाच्या सभोवताल असलेले अचलपूर, दारापूर, खोलापूर ही ठाणी असलेली गावे मुघलांच्या ताब्यात होती. त्यानंतर सहाशे वर्षाचा काळ लोटला, त्यामुळे मूर्तीचा अचूक ठावठिकाणा लागला नव्हता. लोकांना साक्षात्कार व्हायचा; पण मूर्ती सापडत नव्हती. अचानक खोदकामात ही मूर्ती वायगाव येथे इंगोले यांच्या घरात सापडली. तो काळ सोळाव्या शतकातला होता. तेव्हापासून मूर्ती वाडारुपी मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली.
 
 
कालांतराने (Mahabharata Ganpati) गणेश भक्तांची गर्दी वाढू लागल्याने इंगोले कुटुंबाने भक्तांच्या सुविधांसाठी ट्रस्टची स्थापना केली. त्यानंतर येथे मंदिर बांधण्यात आले. त्यासाठी याच कुटुंबातील लोकांनी शेती दिली. याचे व्यवस्थापन लालजी पाटील, सीतारामजी पाटील, तुळशीराम पाटील, शिवराम पाटील, तुकाराम पाटील, श्रीराम पाटील व दयाराम पाटील यांच्याकडे आहे. ट्रस्टची धुरा अध्यक्ष म्हणून विलास तुकाराम इंगोले यांच्याकडे आहे. वर्षातून दोनदा येथे उत्सव साजरे होतात. भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते पौर्णिमेपर्यंत गणेश उत्सवात दररोज दहा दिवस भक्तांचा अन्नदान, ज्ञानदान, भजन, कीर्तन, काकडा, हरिपाठ होतो. पौर्णिमेला टाळ-मृदंग व नामघोषात पार्थिव मूर्तीचे विसर्जन होते. गणेश जयंती उत्सवात महाराष्ट्रातील हजारो भक्त येथे दाखल होतात. मध्य प्रदेशासह परराज्यातील भाविकही येथे भेट देतात.
 
 
मूर्तीचे वैशिष्ट्य
सिद्धिविनायक मूर्ती उजव्या सोंडेची आहे. उजव्या बाजूला सिद्धी व डाव्या बाजूला रिद्धी आहेत. एकदंत, पायावर पद्म, शंख चिन्हांकित आहे. हातातील माळ व मोदक ऐहिक जीवनातील समृद्धीचा संकेत देतात. उत्तरायण व दक्षिणायण होताना सूर्योदयाची पहिली किरणे मूर्तीवर पडतात.
Powered By Sangraha 9.0