इम्फाळ,
Manipur Police : कारवाईच्या वेळी पोलिस वापरतात तसा गणवेश घालून शस्त्रास्त्रे बाळगणार्या पाच जणांना मणिपूर पोलिसांनी अटक केली, अशी माहिती एका अधिकार्याने दिली. पोलिसांच्या गणवेशाचा वापर करून काही सशस्त्र समाजविघातक धमक्या देत खंडणीची वसुली करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पृष्ठभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी केलेल्या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.
या अटकेचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने निदर्शने केली तसेच पूर्व इम्फाळमधील पोरोमपट पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षा दलाला अश्रुधुराचे गोळे डागावे लागले. (Manipur Police) या संघर्षात आरएएफच्या एका कर्मचार्यासह पाच जण किरकोळ जखमी झाले, असे अधिकार्याने सांगितले. राज्यात शांतता प्रस्तापित करून सर्व व्यवहार सामान्यपणे व्हावेत, यासाठी मणिपूर पोलिस अशा प्रकारची छापेमारी किंवा कारवाई करण्यास कटीबद्ध आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.