जम्मू,
एकाच देशात दोन घटना असणारे (Article 370) कलम 370 निष्प्रभ केल्यानंतर लडाखमध्ये अविश्वसनीय बदल झाले आहेत. भविष्यात हा सर्वांत विकसित केंद्रशासित प्रदेश असेल, असा विश्वास नायब राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी व्यक्त केला. ते वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते. फेब्रुवारीमध्ये लडाखचे नायब राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारलेले मिश्रा म्हणाले की, त्यांच्या प्राधान्यांमध्ये आगामी पिढ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये आणि लडाखला भ्रष्टाचारमुक्त करण्याबरोबरच स्थानिकांसाठी पुरेशा नोकर्या निर्माण करणे या बाबींचा समावेश आहे. सुमारे 2.75 लाख लोकसंख्या असलेल्या लडाखमध्ये गेल्या वर्षी 5.31 लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली.
मी लडाखमध्ये सात महिन्यांपासून आहे आणि लोकांच्या दृष्टिकोनात, (Article 370) विकासाच्या बाबतीत लोकांना लाभ होण्यात आणि राहणीमानाच्या सोयींमध्येही मोठा बदल झाला आहे. स्थानिक लोकांची कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, रेशीम शेती आणि पशुपालन क्षेत्रांत पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यात प्रगती होत आहे, असे ते म्हणाले. मिश्रा म्हणाले की, पूल, बोगदे, हेलिपॅड आणि विमानतळ यासार‘या पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत असताना लडाखमधील लोक स्टार्टअप उभारण्यासाठीही पुढे येत आहेत.
ऑगस्ट 2019 मध्ये घटनेचे (Article 370) कलम 370 निष्प्रभ केल्यानंतरच हे शक्य झाले आहे. यामुळे लडाख हे जम्मू-काश्मीरमधून वेगळे केले गेले आणि त्याच वर्षी 31 ऑक्टोबर रोजी केंद्रशासित प्रदेश बनले. त्याआधी केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याच्या मागणीसाठी लोकांंनी आंदोलने केली होती. कारण लोक दुर्लक्षित होते. त्यावेळी निधी उपलब्ध नव्हता आणि विकासाला कमी प्राधान्य दिले जात होते, असेही मिश्रा म्हणाले.