‘आदित्य’ने घेतला पृथ्वीचा निरोप

इस्रोने बदलली यानाची कक्षा

    दिनांक :19-Sep-2023
Total Views |
बंगळुरू, 
Aditya L-1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने पाठविलेल्या आदित्य एल-1 यानाने मंगळवारी पृथ्वीचा निरोप घेतला आणि सूर्याच्या कक्षेत प्रवेश केला. या संदर्भात यानाची कक्षा बदलण्याची आणि पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर काढण्याची प्रक्रिया इस्रोने यशस्वीपणे पूर्ण केली. ट्रान्स लॅग्रेजियन पॉईंट-1 मध्ये आदित्यला पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आजपासून 110 दिवस (Aditya L-1) आदित्य यान याच पॉईंटच्या सभोवताल फिरून आपले कार्य करणार आहे. हे ठिकाण पृथ्वी आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतील समतोल बिंदू आहे.
 
Aditya L-1
 
कक्षेत बदल करण्यात आल्यानंतर आता आदित्य यान पृथ्वी आणि सूर्य या दोघांच्याही मधोमध पोहोचले आहे. प्रक्रियेचा हा टप्पा अतिशय महत्त्वाचा होता आणि तो आम्ही यशस्वीपणे पार पाडला आहे. आता 110 दिवस यान या परिसरात घिरट्या घेणार आहे आणि त्यानंतर Aditya L-1 एल-1 पॉईंटच्या निर्धारित ठिकाणी तो प्रस्थापित करण्यात येईल, असे इस्रोने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम असून, तिचे प्रक्षेपण 2 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही मोहीम हाती घेतली आहे.