दुधात भेसळ करणार्‍यांनो सावधान आता कारवाईची धडक मोहीम

    दिनांक :02-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
adulterate milk दुधाला अमृततुल्य समजले जाते. मात्र काही व्यवसायीक अधिक नफा मिळविण्याच्या लालसेमुळे दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे प्रकार समोर आले आहे. या प्रकारावर आळा बसावा, जनतेला चांगले दुध मिळावे या उद्देशाने दुधात होणार्‍या भेसळविरुध्द कारवाई करण्यासाठी जिल्हानिहाय धडक मोहीम राबविण्याचे निर्देश दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ही मोहीम गोंदिया जिल्ह्यासह विभागातील दहा जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. दुधाची तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एस. एल. नवले यांनी दिली.
 
 
Milk
 
राज्यात दुध भेसळ रोखण्याच्या अनुषंगाने 28 जून रोजी शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. त्यानुसार दुधात होणार्‍या भेसळीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी असून अपर पोलिस अधीक्षक, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक वैध मापनशास्त्र यांची सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.adulterate milk शासन निर्णयानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने गोंदिया येथे 31 ऑगस्ट रोजी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य अपर पोलिस अधीक्षक, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रणक वैध मापनशास्त्र, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना दुधात भेसळ करणार्‍यांविरुध्द कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देत आठही तालुक्यांमध्ये धडक मोहिम राबवून दुध भेसळ तपासणी मोहीम राबविण्याचे सूचित केले.

जिल्ह्यातील दूध विक्रेते, दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांनी उच्च गुणवत्ता प्रतीचे, भेसळ विरहीत दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी, असे आवाहन समितीने केले आहे.