तुका आकाशाएवढा
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संत उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण अनुभूतीला प्रथम स्थान देण्यात येते. ही अनुभूती आपणास उपदेशाच्या माध्यमातून दिली जात असते. अनुभूतीच्या जोरावरच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. एखाद्या कामाचा अनुभव नसेल तर असे काम शेवटपर्यंत आपल्या हातून होईल किंवा नाही, याची खात्री नसते. म्हणून अशा वेळी संताचं मार्गदर्शन हे आयुष्यात खूप कामी येत असतं. परंतु, संत उपदेश करताना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार उपदेश करताना दिसतात. जर का एकच उपदेश सर्वांना केल्यास त्याचा फारसा फायदा होणार नाही. कारण प्रत्येकाची आकलन क्षमता कमी-जास्त प्रमाणात दिसून येते. जसे एखादा शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना एखादे उदाहरण समजावून सांगताना वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो त्याप्रमाणे. याचा अर्थ असाही नव्हे, की तो भेदभाव करतो. आपल्या क्षमतेची त्याला जाणीव असते. भरारी घेण्याकरिता जसे पंखांची क्षमता लक्षात घेऊन भरारी घ्यावी त्यानुसार आपल्याला पचनी पडेल अशा स्वरूपाचा उपदेश संत करताना दिसतात. अशा अर्थाचा हा अभंग Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांचा आहे. ते म्हणतात की,
अधिकार तैसा दावियेला मार्ग।
चालतां हें मग कळों येते॥
जाळूं नये नाव पावलेनि पार।
मागील आधार बहुतांचा॥
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी।
नाहीं करी जगीं उपकार॥
अ. क्र. 254
संतांच्या अंगी परोपकारी वृत्ती असते. त्यामुळे ते दुसर्याच्या दु:खावर मायेची फुंकर घालत असतात. दुसर्याचे दु:ख ते आपलेच दु:ख समजतात. आयुष्यात मार्गक्रमण करीत असताना अनेक अडचणी येत असतात. त्या अडचणी सर्वांच्या सारख्या नसतात. म्हणजेच प्रत्येकावर वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. वेगवेगळ्या स्वरूपाच्या असल्यामुळे त्यावरील उपायसुद्धा वेगवेगळे उपाय सांगावे लागतात. प्रत्येकाला मिळालेला अधिकार हा वेगवेगळा असतो. त्याला त्याच्या पात्रतेनुसार अधिकार प्राप्त झालेला असतो. उद्दिष्ट जरी एक असले, तरी कोणी कोणत्या मार्गाने जावे त्याला त्यानुसार उपदेश करणे महत्त्वाचे ठरते. जसे शिक्षणाच्या अनेक वाटा आहेत. वेगवेगळ्या शाखा आहेत. त्या त्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला ती निवड करण्याचा अधिकार आहे. मग त्यामधील कला शाखा, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा असताना तो विद्यार्थी कोणत्या शाखेला प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करू शकेल, हे त्याच्या आकलन क्षमतेनुसार ठरवून त्याला मार्गदर्शन करणे शिक्षकाला सोयीस्कर जाते. जसे व्यापार विषयीचे ज्ञान सर्वच शाखांच्या द़ृष्टीने महत्त्वाचे ठरणार नाही. त्याकरिता तो विद्यार्थी वाणिज्य शाखेचा असल्यास त्याला उत्कृष्ट व्यापार करण्याच्या द़ृष्टीने मार्गदर्शन केल्यास त्याला त्याच्या जीवनात यशस्वी होण्याच्या द़ृष्टीने अत्यंत फायद्याचे ठरेल व आयुष्यात त्याची भरभराट होण्यास वाणिज्य विषयाचे शिक्षण कामी येईल. त्याचप्रमाणे विज्ञान शाखेच्या द़ृष्टीने त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकाराचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. म्हणून त्या त्या अधिकारानुसार तसा उपदेश करणे हा जास्त महत्त्वाचा ठरतो. त्याच्या अधिकारानुसार, पात्रतेनुसार उपदेश केल्यास तो त्या मार्गाने गेल्यास त्याचा त्याला निश्चित उपयोग होताना दिसतो. जसे एखाद्याला डॉक्टर व्हायचे असेल तर त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन शरीरशास्त्राचा अभ्यास करता येईल.
Saint Tukaram Maharaj : या संदर्भात त्याच्या शिक्षकाने त्याला विज्ञान शाखेच्या संदर्भातील केलेलं मार्गदर्शन उपयोगाचं होईल. तेव्हा तो प्रत्यक्ष त्या शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शरीरशास्त्राचा अभ्यास करून यशस्वी होईल; आधी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ झाल्याचे लक्षात येईल व तो चांगल्या पद्धतीने रुग्ण सेवा करू शकेल. स्वत:बरोबर समाजाला त्याचा फायदा होईल. दीनदुबळ्यांची सेवा करण्यास सक्षम ठरेल. आपल्या तसेच इतरांच्या हिताचा उपदेश करतात तेव्हा संत जनसामान्यांना आकलन होईल त्याच पद्धतीचा उपयोग करताना दिसतात व समाज उन्नती साधण्याच्या हेतूने ते त्याची योग्यता पाहून तसेच समजून घेण्याची कुवत लक्षात घेऊन त्याप्रमाणे उपदेश करताना दिसतात. मग तो दाखविलेल्या सन्मार्गावरून चालताना प्रत्यक्षपणे अनुभवत असतो. त्याचे दु:ख कमी करून त्यामध्ये विश्वास निर्माण करून आत्मिक बळ वाढविण्याचं महान कार्य संतांच्या हातून घडत असतं. त्याला केलेल्या उपदेशाचं महत्त्व त्याला कळतं. त्यानुसार तो संतांचे सद्विचार आचरणात आणतो. कारण संतांनी सांगितलेल्या सत्याच्या मार्गावरूनच चालण्यामुळे त्याचा उद्धार होऊन चांगलं जीवन जगण्यास यशस्वी होतो; एवढी शक्ती संत उपदेशात असते.
मनुष्य स्वभाव खूप विचित्र आहे. आपल्यावर केलेले उपकार तो बर्याच वेळी विसरून जातो. अहंकार निर्माण होतो. आपण आपल्याच स्वबळावर मिळविल्याची भावना लगेच मनामध्ये जागृत होते. वास्तविकता वेगळीच असते. ही बाब समजूनही तो आपल्या सोयीनुसार विसरताना दिसतो, परंतु असे होऊ नये. आज आपण ज्या सन्मार्गावर चालत आहोत हे केवळ संतांच्या पुण्याईवरच. म्हणजेच त्यांच्या उपदेशावर जीवनात यशस्वी झालो ते केवळ संत मार्गदर्शनामुळेच. ही भावना आपल्या मनात रुजविणे गरजेचे आहे. कृतघ्न होऊ नका; कृतज्ञ व्हा. म्हणून संत उपदेशाचा परिस स्पर्श लोखंडरूपी जीवनाला झाल्यामुळेच जीवनाचं सोनं झाले, हे माणसाने कधीही विसरू नये. आपण जीवनाचा ऐलतीर पार करून पैलतीरावर संतरूपी नावेत बसूनच आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचलो आहे, ही जाणीव आपल्याला होणं महत्त्वाची आहे. म्हणून आता पुढे या संतरूपी नावेचे आपणास काही काम पडणार नाही म्हणून ती नष्ट करण्याचं पाप आपल्या हातून घडू देऊ नका. कारण ही संतरूपी नावच संसार सागरात अनेकांना तारण्याचं काम आयुष्यभर करीत असते. ‘गरज सरो वैद्य मरो’ ही भावना मनातही येऊ देऊ नका. कारण आपल्या जीवनाचा सुखकर प्रवास याच मार्गाने झाला आहे. तसाच तो दुसर्याचाही होऊ द्या. त्यांनाही लाभ घेऊ द्या. याचा अर्थ असाही करू नका की, या मार्गाचे काम आता पडणारच नाही. आपण एक गोष्ट लक्षात ठेवावयास पाहिजे; ती म्हणजे या नावेने प्रवास करणारे अनेक आपल्या पाठीमागे या प्रवासाच्या प्रतीक्षेत उभे आहेत. त्यांनाही हा प्रवास करायचा आहे. उगीचच आपल्यामुळे त्यांचा मार्ग बंद होणार नाही, याची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे. या संतांचा आदर आपण केला पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. कारण पैलतीरापर्यंत जाण्याचा आधार संतांच्या माध्यमातून, मार्गदर्शनातून होते. त्याचप्रमाणे मागे उभे असलेल्यांचाही तोच आधार असतो, हे लक्षात ठेवा. त्या आधारेच आपण सर्व आपलं जीवन सुखा-समाधानाचं करण्यात यशस्वी होऊ शकतो.
Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज म्हणतात की, संत हे वैद्याप्रमाणेच समाजाच्या कामी येतात. परोपकारी वृत्ती त्यांच्यामध्ये असते. केवळ संतत्वाचा मुखडा ते धारण करीत नाहीत. दुर्लक्षित, दु:खी, कष्टी माणसांना ते आपल्या जवळ करतात. त्यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटतात. त्यांचा नीट सांभाळ करतात. स्वत: अनुभव घेऊन मग जनसामान्यांना ते उपदेश करतात. ‘आधी केले मग सांगितले’ या वृत्तीने संत आपलं जीवन जगताना दिसतात. गोरगरिबांविषयी त्यांच्यामध्ये आत्मीयता असते. जसे आपले आरोग्य बिघडले की, आपल्याला वैद्याची आठवण होते. कारण आपल्याला झालेलं दु:ख हे सोसण्यापलीकडचं असतं. म्हणून आलेल्या दु:खाचं निवारण करण्याच्या हेतूने तेव्हा वैद्याची नितांत गरज भासते. झालेलं दु:ख कमी करण्याचं सत्कार्य ते करीत असतात. झालेल्या रोगानुसार औषधोपचार करून आरोग्य नीट करून जीवनात एक चांगला दिलासा देतात. त्याचप्रमाणे संतांचं कार्य आहे. समाजात असणारे अनेक दु:खी-कष्टी, निराधार, दुर्लक्षित, अज्ञानी लोकांना जीवनोपयोगाचा उपदेश व त्यांची मदत करून दु:ख दूर करण्याची धडपड सातत्याने करीत राहतात. त्यांना समानतेची वागणूक देऊन त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करतात. परोपकारी वृत्तीने सेवा करतात. वैद्य जसा आरोग्याची काळजी घेत असताना मानवतेचे रक्षण करून सुखी-निरोगी राहण्याकरिता आयुष्यभर झटत असतो, त्याचप्रमाणे संत हे समाजाच्या मनातील वाईट मार्गाचा, अज्ञानाचा, नाश करून समरसतेची सर्वस्पर्शी प्रेरणा देण्याचे, एकसंध समाज निर्मितीचे काम सातत्याने करीत असतात. संतांच्या मते कर्म म्हणजे स्वत:च्या चारित्र्याचा आदर्श जनसामान्यांसमोर ठेवून साधलेली लोकसेवा होय. ते हाही उपदेश करतात की, नीती भ्रष्ट करू नका, धर्माचं अर्धांग नीती आहे, हे विसरू नका. अशा प्रकारे समाज प्रबोधनात्मक शिकवण संत नेहमी देत असतात. म्हणून आपल्या पात्रतेनुसार आपल्याला मार्ग दाखवून चालायला सांगतात व आपलं जीवन यशस्वी करतात.
- प्रा. मधुकर वडोदे
-9422200007