सेमीकंडक्टर क्षेत्र बहरणार; व्याजदर वधारणार

    दिनांक :24-Sep-2023
Total Views |
अर्थचक्र
- महेश देशपांडे
सरता आठवडा सकारात्मक बातम्यांचा ठरला. उद्योग, व्याजदर, शेअर बाजार आदींच्या बाबतीत अशा घडामोडी पाहायला मिळाल्या. गेले अनेक दिवस भारतात सेमीकंडक्टरच्या बाबतीत बातम्या ऐकायला येत असून या अतिमहत्त्वाच्या क्षेत्रात उत्पादनासाठी उत्तम प्रकल्प उभे राहणे गरजेचे आहे. ते आता घडत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीवर व्याज वाढणार असल्याचा दिलासा मिळाला. दुसरीकडे शेअर बाजाराचा झंझावातही अनुभवाला आला. याच सुमारास चीनमधील वाहन उद्योग संकटात असल्याची लक्षवेधी बातमी मिळाली. Semiconductor सेमीकंडक्टरच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवण्याच्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी भारतासाठी मोठ्या योजना तयार केल्या आहेत. आगामी काळात उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहेत. यामुळे भारताला केवळ स्वावलंबी होण्यास मदत होणार नाही, तर चीनची जागाही घेता येणार आहे. जगातील उत्पादनाचे क्षेत्र बनवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल.
 
 
semiconductor sdf
 
भारतातील उत्पादन क्षेत्रातील दोन चांगल्या बातम्यांनी आठवड्याची सुरुवात झाली. पहिली चांगली बातमी अमेरिकन Semiconductor सेमीकंडक्टर कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी लिमिटेडकडून आली तर दुसरी चांगली बातमी तैवानच्या फॉक्सकॉन या कॉॅन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग फर्मकडून आली आहे. मायक्रॉन येत्या काळात भारतात अनेक सेमीकंडक्टर असेंब्ली आणि पॅकेजिंग प्लांट उभारणार आहे. फॉक्सकॉनने भारतातील आपली गुंतवणूक आणि कर्मचार्‍यांची संख्या दुप्पट करण्याची तयारी केली आहे. फॉक्सकॉनचे भारताचे प्रतिनिधी वेई ली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लिंक्ड इन पोस्टमध्ये ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीची येत्या एका वर्षात भारतात गुंतवणूक दुप्पट करण्याची योजना आहे. कंपनी पुढील 12 महिन्यांमध्ये आपली कर्मचारी संख्या दुप्पट करणार आहे. फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग फर्म आणि अ‍ॅपलची सर्वात मोठी पुरवठादार आहे. आतापर्यंत चीन हे फॉक्सकॉनसाठी उत्पादन केंद्र होते; परंतु आता तैवानची ही कंपनी भारतावर लक्ष केंद्रित करीत आहे. कंपनी आधीच तामिळनाडूमध्ये आयफोनचे उत्पादन करीत आहे. त्यात सुमारे 40 हजार लोक काम करीत आहेत. फॉक्सकॉन कर्नाटकमध्ये प्लांट उभारणार आहे.
 
 
फॉक्सकॉनची मूळ कंपनी असलेल्या होन हाई टेक्नॉलॉजी ग्रुपचे अध्यक्ष आणि सीईओ यंग लिऊ यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, चीनने जी परिसंस्था तयार करण्यासाठी 30 वर्षे घेतली, ती भारत काही वर्षांमध्ये गाठेल. भारत हे उत्पादन क्षेत्राचे भविष्य असल्याचेही त्यांनी सांगितले होते. फॉक्सकॉन भारतात चिप उत्पादन युनिट स्थापन करणार आहे. यापूर्वी कंपनीने यासाठी वेदांतसोबत भागीदारी केली होती आणि गुजरातमधील प्लांटसाठी जागा निश्चित केली होती; परंतु नंतर दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्रपणे पुढे जाण्याची घोषणा केली. यावर्षी जुलैमध्ये सेमिकॉन इंडिया, 2023 कार्यक्रमादरम्यान मायक्रॉनने भारतातील नियोजित गुंतवणुकीची माहिती दिली होती. कंपनीने भारतात Semiconductor सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांट उभारण्यासाठी 800 दशलक्ष डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली होती. कंपनीचा हा प्लांट साणंद येथे उभारला जाणार आहे.
 
 
Semiconductor : आता एक दिलासादायक बातमी. केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि लघु बचत योजना यांच्या व्याजात तिमाही आधारावर सुधारणा करते. सरकार 30 सप्टेंबर रोजी आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याज जाहीर करेल. यावेळी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याज कायम ठेवले होते; मात्र सप्टेंबर तिमाहीपूर्वी या योजनेच्या व्याजात दोनदा वाढ करण्यात आली. एप्रिल ते जून या तिमाहीत सरकारने व्याज आठ टक्कंवरून 8.2 टक्के केले होते तर गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत हे व्याज आठ टक्के करण्यात आले होते. सध्या या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 8.2 टक्के व्याज मिळत आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी लघु बचत योजनेच्या व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे; परंतु लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर दुसरा गट या योजनेच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करतो. या योजनेत मुदत ठेवीपेक्षा जास्त व्याज मिळते. यामध्ये कर बचतही आहे. ही योजना निश्चित उत्पन्नाच्या पर्यायांपैकी एक आहे. त्याच वेळी, ही योजना सध्या बँकांद्वारे ऑफर केलेल्या मुदत ठेव योजनांवरील व्याजापेक्षाही चांगली आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे आणि व्याज याला हमी आहे. याशिवाय ही योजना 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक मर्यादा देते. लघु बचतीची योजना पाच वर्षांमध्ये परिपक्व होते आणि तीन वर्षांपर्यंत वाढवता येते. या योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.
 
 
शेअर बाजार निर्देशांक आणि निफ्टी नवनवे विक्रम प्रस्थापित करीत असताना गुंतवणूकदारही हरखून गेले आहेत. गेल्या काही काळापासून स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअल फंडांमध्ये चढाओढ सुरू होती; परंतु आता लार्ज कॅप फंडदेखील या शर्यतीत उतरले आहेत. जवळपास वर्षभरापासून लार्ज कॅप फंडांनी दोन अंकी परतावा देऊन बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. लार्ज कॅप म्युच्युअल फंड प्रामुख्याने ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांची कामगिरी चांगली नव्हती; परंतु एक तृतीयांशहून अधिक लार्ज-कॅप फंडांनी गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात परतावा देऊन संबंधित बेंचमार्कला मागे टाकले आहे. परिणामी सध्याच्या बहरत्या शेअर बाजारात कुठे गुंतवणूक करावी, या प्रश्नाला आपसूक उत्तर मिळाले आहे.
 
 
चीनमधील रिअल इस्टेटनंतर आता इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगावर (ईव्ही इंडस्ट्री) धोक्याचे ढग दाटून आले आहेत. चिनी कंपन्या आफ्रिकेतील खाणीतून लिथियमसारखे दुर्मिळ धातू काढत होत्या. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर वापरले जातात; पण आता आफ्रिकन देशांनी चीनला खाण क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास मज्जाव केला आहे. आफ्रिकेतील संसाधने लुटल्याचा आरोप चिनी कंपन्यांवर होत आहे. आफ्रिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या नायजेरियाने ऑगस्टमध्ये चिनी कंपन्यांच्या अवैध खाणकामावर बंदी घातली होती. चिनी कंपन्या तिथे टायटॅनियम काढत होत्या. यापूर्वी नामिबियानेही एका चिनी कंपनीचा परवाना रद्द केला होता. ही कंपनी अवैधरीत्या लिथियम काढत होती. त्याचप्रमाणे ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’ने दक्षिण किवू येथील सहा चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. या कंपन्यांवर सोने आणि इतर खनिजे अवैधरीत्या काढल्याचा आरोप आहे. अलीकडेच या देशात एका हल्ल्यात दोन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. अलीकडच्या काळात आफ्रिकेत चिनी नागरिकांवर हल्ले होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वर्षी मार्चमध्ये मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये झालेल्या हल्ल्यात नऊ चिनी लोकांचा मृत्यू झाला. आफ्रिकेतून येणारा बहुतांश धातू चीनमध्ये जातो. 2019 मध्ये उप-सहारा देशांमधून चीनला 10 अब्ज डॉलर किमतीची खनिजे निर्यात करण्यात आली.
 
 
Semiconductor : चीन ही इलेक्ट्रिक वाहनांची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये विकल्या गेलेल्या वाहनांपैकी एक चतुर्थांश इलेक्ट्रिक वाहने होती. चीन हा केवळ खरेदीदारच नाही तर उत्पादक म्हणूनही झपाट्याने वाढत आहे. एका अहवालानुसार, जगातील इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण विक्रीपैकी निम्मा वाटा चिनी ब्रँडचा आहे. तिथे ईव्हीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत; परंतु आवश्यकतेइतकी खनिजे उपलब्ध न झाल्यास चीनच्या ईव्ही उद्योगासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम होऊ शकतो.
 
- (लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)