वेध
- अनिल उमाकांत फेकरीकर
‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण,’ असे संत मंडळी सांगून गेली. कारण काय तर मानवी जीवनाचा संपूर्ण डोलाराच या मनावर अवलंबून आहे. पण तरीही शरीराकडे अधिक अन् मनाकडे कमी लक्ष दिले जाते. यातूनच बहुतांश समस्या आज मानवापुढे उद्भवल्या आहेत. दुर्दैवाने त्याकडे फारसे कुणाचे लक्ष नाही. मात्र, आता मनाचे आरोग्य जपण्याची वेळ आली आहे. यात Noise pollution ध्वनिप्रदूषणाचा फार मोठा अडथळा आहे. तो अडथळा दूर करणे मानवाच्याच हाती आहे. पण तो एवढा स्वमग्न झाला आहे की, त्याला इतरांचे सोडा, स्वत:च्या भल्याची जाण राहिलेली नाही. म्हणूनच ध्वनिप्रदूषण थांबवा! स्वत:ला पहिले वाचवा!! हा मूलमंत्र प्रत्यक्ष अमलात आणण्याची वेळ आलेली आहे. 14 सप्टेंबर 2023 रोजी पोळ्याच्या दिवशी रामटेक तालुक्यातील नगरधन येथे शशिकांत गायधने नावाच्या शेतकर्याचा बैल गोंधळला आणि चेंगराचेंगरी झाली. तिथे सुरू असलेल्या डीजे आणि कानठळ्या बसविणार्या ढोल-ताशांच्या गजरामुळे बैलाचे मन विचलित झाले आणि तो सैरावैरा पळू लागला. त्याने पळताना त्याच्या मध्ये जो येईल, त्याला तुडवले. कसेबसे त्याला नियंत्रणात आणले गेले आणि फार मोठा अनर्थ टळला. हा अनर्थ टळला असला तरी भविष्यातील संकट संपलेले नाही.
पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभुतांनी तयार झालेले मानवी शरीर फार मोठे रहस्य आहे. यातील मेंदू हा तर प्रत्येक संशोधकासाठी अभ्यास करण्यासाठी फार मोठे आव्हानच आहे. याच मेंदूत मन दडलेले असते. हेच मन पुढे मानवाला यशोशिखरावर किंवा अधोगतीला नेण्याचे काम करते. या मनाला चिरकाळ प्रसन्न ठेवायचे तर आसपास सुरू असलेले Noise pollution ध्वनिप्रदूषण थांबवावे लागेल. आपले मन एक बिनतारी तारायंत्र आहे. संदेश देणारे, संदेश घेणारे, विचारांची नकळत देवाणघेवाण करणारे आहे. अनेकदा आपण रस्त्याने जात असतो. तेव्हा सहजतेने मनात एखादे गाणे येते आणि ते आपण गुणगुणत समोर जातो. थोड्याच अंतरावर गेल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातील रेडिओवर तेच गाणे वाजत असते. याचा अर्थ काय तर आपले मन खरोखरच बिनतारी यंत्र आहे. ते वातावरणातील चुंबकीय रेडिओ लहरींना ग्रहण करते. मग आसपास सुरू असलेल्या ध्वनिप्रदूषणालाही ग्रहण करण्याचे काम हेच मन करते ना? त्याच कारणाने पुढे चिडचिड वाढते. तणाव वाढून रक्तदाब, मधुमेह यासारख्या क्षणाक्षणाला मारणार्या आजारांच्या चक्रव्यूहात माणूस अडकतो. तणाव वाढल्याने शरीराचे चक्र बिघडते परिणामी माणूस कर्करोगालाही बळी पडू शकतो. एवढी दाहकता ध्वनिप्रदूषणाच्या विषयाशी जुळलेली आहे.
नगरधन गावात पोळ्यात बैल गोंधळल्याची घटना छोटीशी असली तरी त्यातून मिळालेले संकेत फार मोठे आणि त्वरित स्वत:ला सावरा हे सांगणारे आहेत. शरीराची वाढ वर्षांनी मोजतात. परंतु मनाची वाढ सुख-दु:खातून मिळणार्या अनुभवांच्या खोलीने कळते. पवित्र मनात ईश्वराचा निरंतर वास असतो. म्हणून मनाला अंतर्बाह्य शुद्ध ठेवावे. आतून व बाहेरून शुद्ध असलेल्या मनातच ईश्वर वास करतो. पण आज तर या मनात विचारांचे काहूर उठले आहे. विज्ञानाने प्रगती केल्याने पृथ्वीतलावरील कोट्यवधी लोकांच्या हाती मोबाईल नावाचे घातक अस्त्र आले आहे. या अस्त्राचा वापर 24 तास सुरू आहे. त्यावर सुरू असलेले संभाषण हेही Noise pollution ध्वनिप्रदूषण वाढवणारे आहे. सतत बोलत असल्याने माणसाच्या मनाची चंचलता वाढली आहे.
पूर्वी ऋषी-मुनी मौन धारण करायचे. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग नाही. पण हे मर्म स्वत:ला सुशिक्षित समजून घेणार्यांना समजू नये, याचेही आश्चर्य वाटते. आसपास कुठेही पाहा, रस्त्याने जाताना पाहा, चोहीकडे प्रत्येक जण मोबाईलवर काहीतरी बोलत असतो. जणू काही कोट्यवधी रुपयांची उलाढालच सुरू असल्यासारखा ते आव आणतात. रस्ता ओलांडत असताना दोन्ही बाजूंनी पाहणे सोडून ते मोबाईलवर बोलण्यातच गुंतलेले असतात. मोबाईलवरील संभाषण हेही ब्रह्मांडात Noise pollution ध्वनिप्रदूषण वाढवत आहे. आज ना उद्या यावर संशोधक संशोधन करतील आणि मग मोबाईलवर बोलायचे की नाही हे ठरवले जाईल. जेव्हा मोबाईलची संख्या कमी होती तेव्हा ते खपून गेले. आता ती संख्या वायू वेगाने वाढत आहे. हीच मोबाईलची संख्या आणि त्यातून निघणार्या चुंबकीय रेडिओ लहरी चिमण्यांसाठी कर्दनकाळ ठरल्या आहेत. कावळेही या ब्रह्मांडात वाढलेल्या ध्वनिप्रदूषणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही सर्व उदाहरणे पाहता आता ध्वनिप्रदूषण नेमके कसे कमी करायचे किंवा यावर कायमस्वरूपी रामबाण तोडगा कसा काढायचा, हे ठरवावेच लागेल.
- 9881717859