पुणे,
Ajit Pawar : पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला अंतिम निकाल स्वीकारू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांसोबत चर्चा करताना सांगितले. अजित पवार यांनी येथील विविध गणेश मंडळांना आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. (Ajit Pawar) अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सहभागी झाले. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर निवडणूक आयोगात दावा केला होता.
शरद पवार यांच्या नेतृत्वातील गटाने अजित पवार यांच्या दाव्याला आव्हान दिले असून, या बाबतचा निर्णय सध्या प्रलंबित आहे. तुमच्या गटात प्रवेश करीत असलेल्या आमदारांवर शरद पवार कारवाई करीत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना, त्यांना तसे करण्याचा अधिकार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. असे असले तरी, हा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे. दोन्ही बाजू निवडणूक आयोगाकडे गेल्या आहेत आणि दिलेल्या तारखेला प्रत्येकाने आपली भूमिका मांडली आहे. माझ्याबाबत म्हणाल तर, निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय मी मान्य करेल, असे (Ajit Pawar) अजित पवार यांनी सांगितले.
विधानसभेच्या अध्यक्षांकडून 16 आमदारांना अपात्र ठरवून तुम्हाला मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना, या वृत्तांना काहीही अर्थ नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्या सर्व निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.