- निज्जरच्या हत्येची चित्रफीत आली समोर
नवी दिल्ली,
दोन वाहनांतून आलेल्या सहा हल्लेखोरांनी खलिस्तानी अतिरेकी Hardeep Singh Nijjar हरदीपसिंग निज्जरवर 50 गोळ्या झाडल्या. त्याचा खेळ अवघ्या 90 सेकंदात खल्लास झाला. निज्जरच्या हत्येची एक चित्रफीत समोर आली. त्याची हत्या सुनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचे या चित्रफितीत स्पष्ट होत आहे, असे अमेरिकी वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या सरे शहरात हरदीपसिंग निज्जरची जूनमध्ये हत्या करण्यात आली. गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये त्याच्यावर गोळीबार झाला होता. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून नवी माहिती समोर आली असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने आहे. ही चित्रफीत 90 सेकंदाची आहे. यात निज्जरच्या करड्या रंगाच्या पिकअपच्या बाजूला पांढरी सेडान दिसते. ती पिकअपच्या सोबत चालते. निज्जर बाहेर पडण्यासाठी पार्किंगच्या जवळ येताच ही सेडान त्याचा रस्ता रोखते. त्यानंतर हुडी तसेच मुखवटा घातलेले दोघे निज्जरच्या पिकअपजवळ येत असल्याचे चित्रफितीत दिसते.
हल्लेखोरांनी Hardeep Singh Nijjar निज्जरवर जवळपास 50 गोळ्या झाडल्या. त्यापैेकी 34 गोळ्यांनी त्याचा वेध घेतला, असे वॉशिंग्टन पोस्टने शीख फॉर जस्टिसच्या सदस्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. भूपिंदरसिंग नावाची व्यक्ती सर्वांत आधी निज्जरजवळ पोहोचते, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पिकअपमध्ये रक्ताचा सडा आणि काचांचे तुकडे विखुरलेले होते. त्यानंतर भूपिंदरसिंगने गुरमितसिंग नावाच्या साथीदारासोबत हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. निज्जरच्या हत्येपूर्वी त्याच्या वाहनाला ट्रॅकर लावण्यात आले होते, असे बि‘टिश कोलंबिया शीख गुरुद्वारा परिषदेचे प्रवक्ते मोनिंदरसिंग यांनी सांगितले.
शीख वेशभूषेत आले होते हल्लेखोर
घटनास्थळावर काही प्रत्यक्षदर्शी आणि गुरुद्वारा समितीचे सदस्य मलकीतसिंग फुटबॉल खेळत होते. हुडी घातलेल्या दोघांना क्रीक पार्कमधून पळ काढत असताना पाहिले होते. या दोघांचा पाठलाग त्यांनी केला होता. हल्लेखोर शीख वेशभूषेत दिसले. एका हल्लेखोराच्या डोक्यावर लहान पगडी होती. हल्लेखोर पाच फुटांपेक्षा जास्त उंच होता. त्याने मुखवटा घातला होता. दुसरा हल्लेखोर उंचीने लहान व सडपातळ होता, असे त्यांनी सांगितले.