Manav Vikas Mission Yojana : अतिमागास भागातील 8 ते 12 विद्यार्थीनींना शासनाच्या वतीने मानव विकास मिशन योजनेअंतर्गत निशुल्क सायकल विरतण करण्याची योजना राबविली जात आहे. मात्र 2023-24 या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील तब्बल 108 शाळेतील 2343 विद्यार्थीनींना अद्यापपर्यंत सायकल वाटप करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वाहतूकीच्या सुविधा नसल्याने विद्यार्थींनी पायीच शाळा गाठित आहेत. मानव विकास मिशनच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील तब्बल 2343 सावित्रींच्या लेकी सायकलीपासून वंचित आहेत.
राज्य शासनाने 2006 मध्ये राज्य मानव विकास मिशन योजना अमलात आणली. याअंतर्गत शुन ते पाच किमी अंतरावरुन शाळेत ये-जा करणार्या विद्यार्थीनींना सायकलीचा लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत शासनाद्वारे स्वत: सायकल खरेदी न करता विद्यार्थीनींच्या बँक खात्यात दोन टप्प्यात रक्कम जमा केली जाते. सायकल खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीची पावती शालेय प्रशासन व विकास समितीअंतर्गत शासनाला पाठविल्यानंतर उर्वरित रक्कम खात्यात टाकली जाते.या योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थीनी प्रति सायकल याप्रमाणे 5 हजार रुपयाचा निधी दिल्या जातो.
सदर योजना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थीनींची नोंद घेऊन ती शिक्षण विभागाकडे मंजूरीसाठी पाठविली जाते. मंजूरी प्राप्त होताच प्रथम 50 टक्के निधीची राशी दिली जाते. मात्र जिल्ह्याभरातील एकूण 108 शाळांतील तब्बल 2 हजार 343 विद्यार्थींनीना अद्यापही सदर निधीची रक्कम न मिळाल्याने त्या सायकलीपासून वंचित आहेत. जिल्ह्यात एसटीची नगण्य संख्या असतांना अशातच विद्यार्थीनींना सायकली वितरीत करण्यात न आल्याने विद्यार्थीनी पायीच शाळा गाठित आहेत. त्यामुळे या विद्यार्थीनींचा शालेय प्रवास खुपच खडतर झाला आहे. या गंभीर बाबीची दखल घेत तत्काळ विद्यार्थीनींना सायकली वितरीत करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुख्यमंत्र्यांद्वारे दखल, 10 हजार सायकल विरतणाची घोषणा
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियनाची गडचिरोली येथून सुरुवात केली होती. गडचिरोली स्थित आयोजित या कार्यक्रमात हजारो शालेय विद्यार्थीनीही सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थीनींच्या तक्रारी प्राप्त होताच मुख्यमंत्री शिंदे यांनी समस्यांचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ विद्यार्थीनींना 10 हजार सायकली वितरीत करण्याची घोषणा केली. एवढेच नव्हे तर सदर कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्याच्या हस्ते काही विद्यार्थीनींना सायकलीही वितरीत करण्यात आल्या.