- ट्रायबल फोरमच्या नेतृत्वात आंदोलन
पांढरकवडा,
महसूल विभागामार्फत नुकतेच गुणांचे सामान्यकरण करून उमेदवारांचे गुण जाहीर करण्यात आले आहेत. Talathi Bharti या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडल्यामुळे तलाठी भरती रद्द करून 45 दिवसात एमपीएससी मार्फत फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांच्या नेतृत्वात शेकडो परीक्षार्थींनी केली आहे. राज्यात 4 हजार 644 तलाठी पदांसाठी 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान एकूण 57 शिफ्टमध्ये टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवार परीक्षेस उपस्थित होते.
Talathi Bharti : नाशिक पेपरफुटीत पिंपरी-चिंचवड पोलिस भरती 2021, म्हाडा पदभरती 2022 मधील आरोपी गणेश गुसिंगे यानेच तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फोडला. आरोपींकडे प्रश्नपत्रिकेचे 186 फोटो आढळून आल्याचे नमूद आहे. स्पाय कॅमेरा, मायक्रो ब्लुटूथसारखी अत्याधुनिक उपकरणे वापरून हा पेपर फोडण्यात आला होता. टीसीएस कर्मचार्यांच्या दोन नातेवाईकांनी ठाणे जिल्ह्यातून अर्ज केले होते. ते दोन्ही उमेदवार ठाणे जिल्ह्यातून पहिल्या व दुसर्या क्रमांकावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एक उमेदवार परीक्षेदरम्यान पुस्तकात कॉपी करून पेपर सोडवताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती येथील माधव इन्फोटेक नावाच्या परीक्षा केंद्रांवर पेपर फोडण्यासाठी वापरण्यात येणार्या हाय-टेक उपकरणांसह एका उमेदवाराला अटक करण्यात आली. तर सांगलीत मिरज परीक्षा केंद्रात, परीक्षेआधीच हाय-टेक उपकरणांसह अटक करण्यात आली.
टीसीएस परीक्षा केंद्र संभाजीनगर परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षक उमेदवारांना रफशीटद्वारे उत्तरे पुरविताना सापडला. त्याला मदत करणारी सफाई कामगार महिला आणि इतर कर्मचार्यांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या चार्जशीटमध्ये नमूद केल्याप्रमाणे नागपूर परीक्षा केंद्रावरून पेपर फोडून संभाजीनगरच्या पर्यवेक्षकाला पाठविण्यात आला होता. तलाठी परीक्षा राज्यभरात पारदर्शक पद्धतीने न झाल्यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे Talathi Bharti तलाठी भरती रद्द करून तत्काळ फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी जरावंत सोयाम, राहूल मुंगे, प्रणित बुरैवार, आशुतोष बदले, प्रथमेश पुल्लेवार, राहुल पेंदौर, साक्षी वानखडे, अपेक्षा मोट्टमवार, वैष्णवी भगत, चेताली जळके, अभय किनाके, बाळकृष्ण कनाके, निखिल चिंतकुंटलावार, अजय गरलवार, तुषार गुरनुले, हितेश गेडाम, शुभम अहमद, वैभव गेडाम, कुंदन शेडमाके, वैष्णवी भगत यांनी केली आहे.