गडचिरोली,
Gondwana University : गोंडी भाषा ही जगातील प्राचीन भाषेपैकी एक असून ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. जगातील अनेक भाषा रोज मृत्यूप्राय होत असून त्या भाषा वाचविणे आवशक आहे. गोडी भाषेचे संरक्षण हे फक्त गोंडी भाषेचे संरक्षण नसून ते भारतीय संस्कृतीचे, भारतीय ज्ञान परंपरेचे संरक्षण आहे. गोंडी भाषा लुप्त झाली तर गोंडी भाषेतील परंपरागत ज्ञान नष्ट होईल. आदिवासींचे समृद्ध असे परंपरागत ज्ञान टिकवून ठेवायचे असेल तर गोंडी भाषेचा शब्दकोश तयार करून त्याचे मानकिकरण होणे आवशक आहे. त्या दृष्टीकोनातून गोंडवाना विद्यापीठातील आदिवासी अध्यासन केंद्राद्वारे गोंडी भाषेच्या संरक्षण व संवर्धनासाठी सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन हे भारतातील महत्वपूर्ण काम आहे, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नवी मुंबईचे कुलगुरू डॉ. के. एल. वर्मा यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठात Gondwana University आदिवासी अध्यासन केंद्राद्वारे गोंडी माडिया भाषा संकलन व मानकिकरण या विषयावर 8 ते 14 जानेवारी या कालावधीत सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेत तेलंगाना, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील गोंडी भाषेतील तज्ञ सहभागी झाले होते. या सात दिवसीय कार्यशाळेत महाराष्ट्रातील 17866 तर तेलंगणातील 13150 गोंडी भाषेतील शब्दांचे संकलन करण्यात आले.
तेलंगाना, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा व महाराष्ट्रात गोंडी भाषेतील अनेक शब्दकोश ख्रिश्चन मिशनरीज व गोंडी तज्ञांनी गोंडी भाषेत अनेक शब्दकोश तयार केले आहेत, त्या सर्वांना एकत्रित करून सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लैंग्वेज मैसूर या संस्थेकडून शब्दकोश तयार करून त्याचे मानकीकरण करायचे आहे व त्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून त्यावर Gondwana University गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सी.आय.आय.एल. मैसूर, पंडित रवी शंकर विद्यापीठ रायपुर व समाजाची मालकी राहील असे मार्गदर्शन कार्यशाळेतील मार्गदर्शक सी.जी.नेट स्वरा छत्तीसगडचे समन्वयक सुब्रांशु चौधरी यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाचे Gondwana University प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, गोंडी भाषेचे संरक्षण करणे व गोंडी भाषेतील परंपरागत ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी गोडवाना विद्यापीठ कटीबद्ध असून त्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठात गोंडी भाषा स्पिकिंग कोर्सचे सर्टिफिकेट कोर्स व डिप्लोमा कोर्स सुरु केले आहे. तसेच आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून विविध कार्यक्रम विद्यापीठांनी सुरु केले असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे समाज विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी, डॉ. देवाजी तोफा उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कार्यशाळेचे समन्वयक डॉ. नरेश मडावी यांनी तर आभारप्रदर्शन आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम यांनी केले.