रिसोड बाजार समितीच्या तत्कालीन सचिवाला पदभार देऊ नये

अधिकारी, कर्मचार्‍यांचा विरोध : आमरण उपोषणाचा इशारा

    दिनांक :25-Jan-2024
Total Views |
वाशीम, 
Risod Bazar Samiti : बाजार समितीचे हित न पाहता चुकीचे निर्णय घेवून बाजार समितीच्या नुकसानीस कारणीभूत व वादग्रस्त कारकिर्द असलेले तसेच अनेक प्रकरणात दोषी आढळून आलेले रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव विजय देशमुख यांच्यावर पुन्हा सचिव पदाचा पदभार देण्यास बाजार समितीमधील विविध आस्थापनेवर असलेले अधिकारी व कर्मचार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच देशमुख यांच्यावर पुन्हा सचिवपदाचा पदभार दिल्यास २९ जानेवारीपासून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा पणन संचालक, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
 
Risod Bazar Samiti
 
निवेदनात नमूद आहे की, तत्कालीन सचिव देशमुख यांच्या कारकिर्दीत Risod Bazar Samiti बाजार समितीत भ्रष्ट्राचाराने कळस गाठला असून, यासंदर्भात अनेक तक्रारी होवूनही देशमुख यांच्याविरुध्द वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही. ४ ऑटोंबर २०२१ ला त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार सचिव गाळे, गोदाम व भूखंड प्रकरणात दोषी आढळून आले आहेत. याआधी समितीचे माजी उपसभापती यांनी करारनाम्यापेक्षा अतिरिक्त जागा वापरणे, परवानगी न घेता तीन मजली बांधकाम करणे, गाळे परस्पर एका व्यापार्‍याने दुसर्‍याला विकणे आदी बाबीवर बाजार समिती प्रशासन प्रमुख विजय देशमुख यांनी कारवाई न केल्यामुळे माजी उपसभापती विठ्ठलराव आरु व डॉ. रामेश्वर नरवाडे यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी एकूण ५ मुद्यावर सचिवांनी कार्यवाही केली असती तर जिल्हा उपनिबंधकांनी कलम ४० ई व ४५ अंतर्गत संचालकांवर कारवाई केलीच नसती. त्यामुळे बाजार समितीचे हित न जोपासता डबघाईस आणणारे तत्कालीन सचिव देशमुख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी.
 
 
लेखापरिक्षक घुगे यांच्या ३१ डिसेंबर २०२१ चा अहवाल तसेच विभागीय सहनिबंधक अमरावती यांचा १६ जानेवारी २०२३ च्या अहवालानुसार तत्कालीन सचिव देशमुख हे दोषी आढळून आले आहेत. याशिवाय कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सचिवाच्या बडतर्फीचे पत्र २४ ऑगष्ट २०२२ रोजी दिले होते. जुने सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या जागेबाबतही देशमुख यांनी शासनाची दिशाभूल केली. ९ जानेवारी २०२३ च्या जिल्हा उपनिबंधकांच्या अहवालानुसारही पदरहीत सचिव देशमुख हे दोषी असल्याचे नमूद आहे. मात्र आजपर्यत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे देशमुख यांच्यावर पुन्हा सचिवपदाचा पदभार दिल्यास २९ जानेवारीपासून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था Risod Bazar Samiti यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
 
 
निवेदनावर प्र.सचिव ए.पी. कानडे, लेखापाल व्हि.एस. गिर्‍हे, वरिष्ठ लिपीक पि.व्ही. सपकाळ, रोखपाल आर. एस. दुबे, प्रतवारीकार ए.एफ. शिंदे, निरिक्षक व्ही. ओ. देशमुख, सांख्यिकीक जि.के. धोंगडे, कनिष्ठ लिपीक जि.एम. पावडे, शिपाई के.व्ही. मगर, आर.बी. वनवे आदींच्या सह्या आहेत.