यवतमाळ,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित Janta Raja‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन 29, 30 व 31 जानेवारीला रोज संध्याकाळी 6.30 वाजता पोस्टल मैदानात करण्यात आले आहे. या महानाट्यात जवळपास 200 कलावंतांचा सहभाग असून त्याचा जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आनंद घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक महापराक्रमी योद्धा, कुशल प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजा, रयतेच्या सहकार्यातून, रयतेचे राज्य निर्माण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमानाचा झेंडा संपूर्ण विश्वात फडकविणार्या या राजाची कीर्ती आजच्या पिढीला Janta Raja ‘जाणता राजा’ या नाट्यप्रयोगातून समजणार आहे. या महानाट्याचे देश विदेशासह आतापर्यंत 1146 प्रयोग झाले आहेत. महाराजांच्या जन्मापासून मावळे जमवून बाल शिवाजींनी स्वराज्य स्थापनेची घेतलेली प्रतिज्ञा, अफजलखान वध आदिंसह शिवराज्याभिषेक सोहळ्याची आकर्षक आतषबाजी बघायला मिळणार आहे. नागरिकांनी सहकुटुंब नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.