राष्ट्ररक्षा
भारतविरोधी मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मोईज्जू यांच्या पक्षाचा माले महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या Lakshadweep लक्षद्वीप बेटांवरील पर्यटनाला चालना देणार्या ’द’ वरील पोस्टनंतर, प्रसार माध्यमांवर मालदीवचे राजकारणी, सरकारी अधिकारी विरुद्ध भारतीय असे युद्ध सुरू झाले. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या भेटीचा संदर्भ देत, या प्रदेशाच्या सौंदर्याची प्रशंसा करणारी एक पोस्ट केली. या स्थळाविषयी कौतुक करताना पंतप्रधान मोदी लिहितात, ‘‘ज्यांना स्वतःतील साहसाला गवसणी घालायची आहे, त्यांच्या यादीत लक्षद्वीप असणे आवश्यकच आहे.’’
या पृष्ठभूमीवर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांचे एक विश्लेषण...
भारताकरिता महत्त्वाचा सुरक्षा तळ
हिंदी महासागरात केरळपासून 200 ते 400 कि. मी. अंतरावर वसलेल्या या द्वीप समूहाचे एकूण क्षेत्रफळ 32 वर्ग कि. मी. आहे. पण ती विखुरलेली असल्यामुळे भारतास 20,000 वर्ग कि. मी. प्रादेशिक पाणी आणि सुमारे 4,00,000 वर्ग कि. मी. चे प्रचंड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन लाभले आहे. द्वीप समूहातील एकूण 36 बेटांपैकी 10 बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीसोबतचे तसेच श्रीलंका आणि मालदीवसारख्या बेटांवरील देशांसोबतचे त्यांचे सान्निध्य व्यग्र सागरी जलमार्गिकांची जवळीक विस्तृत भौगोलिक विखुरणे आणि प्रामुख्याने मुस्लिम लोकसंख्या असणे यामुळे राष्ट्रविरोधी घटकांसाठी हा द्वीप समूह आकर्षक ठरू शकतो. या क्षेत्रात चाचेगिरीचेच उच्चाटन झाले आहे. उच्च-धोका क्षेत्राच्या भौगोलिक सीमा भारतीय पाण्यापासून दूर सरकल्या आहेत. त्यामुळे या बेटांचा, भारतीय मुख्य भूमीवर दहशतवादी हल्ला करण्याकरिता प्रस्थानक म्हणून वापर केला जाण्याची शक्यता खूपच विरळ आहे. पण नियमित निगराणी जरूरी आहे. ‘भारताच्या किनारी सुरक्षे’वर एक संशोधक म्हणून मी, माझ्या अभ्यासाचा एक भाग म्हणून Lakshadweep लक्षद्वीप बेटांवर गेलेलो आहे. पुण्याहूनचे माझे विमान मला कोचीनला आणि तिथून अगत्ती बेटावर घेऊन गेले. मग पवनहंस हेलिकॉप्टर मला कवरत्ती येथे घेऊन गेले. भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या अरबी समुद्रातील आल्हाददायक प्रवाळ बेटांना, जरी ‘लक्षद्वीप’ हे नाव लोकप्रिय झालेले असले, तरी आपण त्यांना अगदी अलिकडेपर्यंत लखदीव, मिनिकॉय आणि अमिनदिवी बेटे म्हणत असू. एकूण 36 बेटे आहेत आणि अनेक बुडालेली बेटेही आहेत. काही रेवदंड (रीफ्स) आणि पुळणीही (सँड बँक्स) आहेत.
लक्षद्वीप बेटांचा इतिहास
चेरमन पेरुमल या केरळच्या राजाच्या कार्यकाळात हा द्वीपसमूह फुटलेल्या जहाजाच्या खलाशांना, इसवी सनाच्या चौथ्या शतकात, ब्रिटिशांचे आगमन होण्यापूर्वीच सापडला होता. 1956 मध्ये हा प्रदेश केंद्रशासित झाला. 1973 मध्ये यास लक्षद्वीप हे नाव देण्यात आले. ही सर्व बेटे मिळून एकच प्रशासकीय जिल्हा होतो. याच्या चार तहसिली आहेत. कवरत्ती बेटावर याचे मुख्यालय व राजधानीही आहे. ही बेटे नैसर्गिक प्रवाळ बेटांनी आणि उथळ पाण्याच्या कायलांनी (लेीरश्र ीशशषी रपव ीहरश्रश्रेु ुरींशी श्ररसेेपी) वेढलेली आहेत. संस्कृतमध्ये Lakshadweep लक्षद्वीप म्हणजे एक लाख बेटे. ही बेटे म्हणजे भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. या बेटांचे क्षेत्रफळ 32 वर्ग कि. मी. (12 वर्ग मैल) इतके आहे. कायले 4200 वर्ग कि. मी. (1600 वर्ग मैल) क्षेत्र व्यापतात. प्रादेशिक पाण्याचे क्षेत्रफळ 20,000 वर्ग कि. मी. (7700 वर्ग मैल) आहे आणि एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आर्थिक क्षेत्र 4,00,000 वर्ग कि. मी. (1,50,000 वर्ग मैल) आहे. हा भाग भारताचा एक जिल्हा होतो. त्याचे 10 उपविभाग आहेत. 2011 च्या भारताच्या जनगणनेनुसार या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या 64,473 होती. बहुसंख्य लोक सुन्नी पंथाच्या शफी शाखेचे मुस्लिम आहेत. वांशिक दृष्टीने ते केरळातील मल्याळी लोकांसारखेच आहेत व मल्याळम भाषा बोलतात. मिनिकॉय बेटात या भाषेची माही बोली सर्वाधिक प्रचलित आहे. लोक नारळ आणि मात्स्यिकीवर चरितार्थ चालवतात. पारंपरिक उद्योग टुना मासे, काथ्या, व्हिनेगार आणि खोबरे तयार करण्याचा आहे. मिनिकॉय बेट टुना माशांकरिता महत्त्वपूर्ण केंद्र आहे. इथे टुना मासे डबा बंद करण्याचा कारखाना आहे.
लोकवस्तीची बेटे
अगत्ती : हे Lakshadweep लक्षद्वीपमधील सर्वात पश्चिमेकडील बेट आहे. या प्रवाळ रेवदंडाच्या पूर्वेकडील कमानीवर ते वसलेले आहे. याची लांबी 6 कि. मी. असून कमाल रुंदी सुमारे 1000 मीटर आहे. वाढते प्रवाळ आणि बहुरंगी प्रवाळी मासे या कायलात विपुलतेने आढळून येतात.
अंड्रोथ : बेट हे मुख्य भूमीस सर्वात जवळचे बेट आहे. लक्षद्वीपावरील हे सर्वात मोठे बेट आहे.
मिनिकॉय : हे दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट आहे. हे लक्षद्वीपमधील सर्वात दक्षिणेकडील, चंद्रकोरीच्या आकाराचे बेट आहे. बेटवासीय लोक खोल समुद्रातील खलाशी म्हणून जगभर प्रवास करणार्या नौकांत काम करतात.
कडमट : या बेटावर पश्चिमेच्या बाजूस एक मोठे कायल आहे. लांबलचक पुळणींचे किनारे आणि उत्तम जलक्रीडा सुविधा ही इथली दर्जेदार आकर्षणे आहेत.
काल्पेनी : हे बेट इथल्या नैसर्गिक सौंदर्याकरिता आणि छोट्या बेटांकरिता विख्यात आहे. याच्या उत्तरेस चेरियम नावाचे एक मनुष्यवस्ती नसलेले बेट आहे.
अमिनी : इथले कुशल कारागीर, कासवांच्या कवचांपासून तसेच नारळाच्या करवंट्यांपासून हाती धरायच्या काठ्या तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
किल्तान : हे बेट केवळ 3 कि. मी. लांब आहे. फुलांनी बहरलेले आणि सुपीक आहे.
चेतिआत : हे सर्वात उत्तरेकडील मनुष्यवस्ती असलेले बेट आहे.
बंगाराम : लक्षद्वीपातील हे सुंदर बेट आहे. हे बेट जगभरात सुट्टी घालवण्याचे सर्वोत्तम स्थान समजले जाते.
बित्रा : या प्रदेशातील लोकवस्ती असलेले हे सर्वात लहान बेट आहे. अनेक समुद्री पक्ष्यांचे हे जननस्थान आहे.
द्वीप प्रदेशाची सुरक्षा
सुरक्षा दले : भारतीय नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय आरक्षित बटालियन इथे तैनात आहेत. नजीकच्या भविष्यात या सामर्थ्यात वाढ अपेक्षित आहे. भारत सरकारने सुरक्षाविषयक उपायांची एक मालिकाच हाती घेतली आहे. उदाहरणार्थ किनारी पोलिस स्थानकांची स्थापना करणे, बेटांवरील उपस्थिती वाढविण्याकरिता जलद हस्तक्षेपक नौका तैनात करणे, आंतरराष्ट्रीय चाचेगिरीविरोधी केंद्र स्थापन करणे. सेचेल्समध्ये उभारल्या जात असलेल्या प्रादेशिक चाचेगिरीविरोधी अभियोग आणि गुप्तचर समन्वयन केंद्राप्रमाणेच (रिजनल अँटीपायरसी प्रॉसिक्युशन अँड इंटेलिजन्स को-ऑर्डिनेशन सेंटर) हे केंद्रही कार्य करेल. मिनिकॉय बेट आणि मालदीव यांमधील सागरी प्रदेशावर देखरेख करण्यासाठी, चाचेगिरीविरोधात कार्य करेल. सुरक्षा दले नियमित सुरक्षा कवायती लक्षद्वीपच्या किनार्यावर करतात. वस्ती नसलेल्या बेटांवरील दक्षता वाढविण्यात आली आहे. हवाई साधने बेटांवरच स्थित आहेत. निरीक्षण मनोरे आणि रडार संवेदक उभारले जावेत, किनारी पोलिस स्थानके सशक्त केली जावीत आणि प्रत्येक प्रवेश व निकास ठिकाणांवर कडक पहारा ठेवला जावा. द्वीप प्रदेशातील सुरक्षेच्या पायाभूत सुविधा वाढवून सुरक्षा त्रुटी बुजविण्याची आवश्यकता आहे. भारतीय लष्कराच्या निवृत्त होणार्या जवान आणि अधिकार्यांना महत्त्वाच्या ज्या बेटांवर मनुष्यवस्ती नाही, तिथे प्रस्थापित केल्यास त्या बेटांचे रक्षण करणे सोपे होईल. नंतर गरज पडली तर आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. या जवानांचा वापर तिथे आपले कान आणि डोळे म्हणून करता येईल. अर्थातच याकरिता त्यांना जमीन पायाभूत सुविधा निर्माण करून द्याव्या लागतील.
दळणवळण प्रणाली
Lakshadweep लक्षद्वीप हवाई मार्गाने आणि समुद्री मार्गानेही जोडलेले आहे. अगत्तीला कोचीनपासून विमानाने जाता येते. अगत्ती विमानतळ हे लक्षद्वीपवरील एकमेव विमानतळ आहे. इतर बेटे पवनहंस हेलिकॉप्टर किंवा नौकानयन सेवेने जोडलेली आहेत. सहा नौका . एम. व्ही. कवरत्ती, एम. व्ही. अमिनदिवी, एम. व्ही. मिनिकॉय, एम. व्ही. अरेबियन-सी, एम. व्ही. लक्षद्वीप-सी आणि एम. व्ही. भारत-सीमा, कोचीन आणि लक्षद्वीप यांना जोडतात. नौकानयन सेवा कोचीनपासून सुरू होते. बेटांकरिता समुद्र पर्यटन (क्रूझ) सेवाही उपलब्ध आहे. भारतीय पर्यटकांना बेटांवर प्रवेश घेण्यापूर्वी ‘इनर लाईन परमिट’ घ्यावे लागते. लक्षद्वीपला जर मालदीवप्रमाणे जगाच्या टुरिस्ट मॅपवर आणायचे असेल, तर तीन महत्त्वाची पावले उचलावे लागतील. अगत्ती विमानतळाची लांबी समुद्रामध्ये भर टाकून वाढवावी लागेल; ज्यामुळे मोठी विमाने इथे उतरू शकतील. लक्षद्वीपमध्ये मिनीकाय बेटांवर दुसरे विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित केले जावे. कोचीन आणि मंगलोरपासून लक्षद्वीपला समुद्रामार्गे होणार्या बोटीच्या फेर्या वाढवाव्या लागतील; ज्यामुळे जास्त पर्यटक या बेटांना भेट देऊ शकतील.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- 9096701253