कृती समितीच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :28-Jan-2024
Total Views |
- पुसद रिंग रोडला शासनाची मान्यता

रवी देशपांडे
पुसद, 
पुसद येथील रिंग रोड निर्मितीसाठी कृती समितीने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासनाच्या रस्ते विकास योजना अंतर्गत 48 कोटी 60 लाख रुपयांचा पहिला टप्पा मंजूर झाला आहे. या मंजुरीबाबत अशोक बाबर यांच्या पुढाकारात रिंग रोड निर्माण कृती समितीने आनंद व्यक्त केला आहे. या Pusad Ring Road रिंग रोडच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कृती समितीने विशेष आभार मानले आहेत. पुसद शहर विदर्भ व मराठवाड्याला जोडणारे सीमावर्ती शहर म्हणून ओळखले जाते.
 
 
Pusad Ring Road
 (संग्रहित छायाचित्र)
 
 
Pusad Ring Road पुसद शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता विदर्भातून मराठवाड्यात आणि मराठवाड्यातून विदर्भात होणारी सततची जड वाहतूक डोकेदुखी ठरली होती. या जड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले आहेत हेही येथे उल्लेखनीय. अनेक महनियांचे सहकार्य पुसदच्या या रखडलेल्या रिंग रोडच्या मान्यतेसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार भावना गवळी, आमदार नीलय नाईक, आ. प्रवीण दटके, नितीन भुतडा, हरीश सारडा, पंजाब खडकेकर, सतीश भुसाडे यांचे सतत परिश्रम व सहकार्य लाभले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव साळुंके, उपसचिव प्रज्ञा वाळके, अमरावती विभाग मुख्य अभियंता गिरीश जोशी, अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, अवर सचिव कचरे, कार्यकारी अभियंता अडसुळे, प्रिया पुजारी व प्रकाश झळके यांनीसुद्धा रिंग रोडच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा केला. रिंग रोड कृती समितीचे अध्यक्ष अशोक बाबर यांनी पुसदवासींतर्फे सर्वांचे आभार मानले आहेत.