जाणे भक्तिचा जिव्हाळा। तोचि दैवाचा पुतळा॥

28 Jan 2024 17:05:23
तुका आकाशाएवढा
- प्रा. मधुकर वडोदे
शुद्ध हेतूनं कार्य करणे, त्या कार्यावर आपली निस्सीम श्रद्धा असणे जरूरीचे आहे. अशी भक्ती केल्यासच ती खर्‍या अर्थानं पूर्णत्वास जाऊन भक्ती केल्याचे सार्थक होते. जगद्गुरू Sant Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी भक्ती म्हणजे काय? ती कशी करावी? ती कशी असावी? त्याचे काय फलित आहे? खरा भाग्यवान कोण आहे? याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले आहे. भक्तीचा महिमा सांगणारा हा अभंग असून परमेश्वराच्या प्राप्तीकरिता भक्ती जशी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे आयुष्यात मनोभावे, सातत्यपूर्वक एखादे सामाजिक, कौटुंबिक कार्य किंवा देशहिताचे कार्य निष्ठेपूर्वक केल्यास त्याचा सार्वजनिक किंवा देश पातळीवर चांगला परिणाम झालेला दिसतो. या कार्यालाच खर्‍या अर्थाने भक्ती असे म्हणतात.
 
 
Sant Tukaram Maharaj
 
असे श्रद्धापूर्वक कार्य करणारा खरोखर भाग्यवान असतो. कारण चांगल्या भक्तीमुळे असाध्य ते साध्य होऊ शकते. म्हणूनच ती मनापासून करावी. अशी भक्ती जो करतो तोच खरा भाग्यवान असतो. आज आपल्या असे निदर्शनास येते की, एखाद्याविषयी आपली खूप निष्ठा असल्याचे म्हणजेच त्या विषयीची भक्ती असल्याबाबत अनेक लोक फक्त दिखावा करताना दिसतात. असे दांभिक वृत्तीचे लोक कधीच भाग्यवान ठरत नाही. ते केवळ कार्य केल्याचा नुसता आव आणतात. त्यांच्यामध्ये जिव्हाळा, स्नेह, पे्रम कुठेही दिसत नाही. अशी शक्ती काहीच कामाची नाही. म्हणूनच जिव्हाळायुक्त भक्ती जो जाणतो तोच खरा भाग्यवान ठरतो, असे Sant Tukaram Maharaj महाराजांना वाटते. माणसानं मन शुद्ध ठेवून कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या कार्याविषयी प्रेम, आदर, निष्ठा नसेल तर ते करून काहीही हाती लागणार नाही. आपलं मन त्या गोष्टीशी एकरूप झालं असेल तरच त्याचा आनंद आपण घेऊ शकतो तसेच तो त्याला देऊसुद्धा शकतो. म्हणून खर्‍या भक्तीतील असणारा गोडवा, जिव्हाळा ज्यानेही जाणून घेतला असेल त्यालाच दैवत्व प्राप्त होतं असतं. कारण त्याचं मन त्या गोष्टीशी एकरूप झालेलं असतं. जिव्हाळा केव्हा निर्माण होईल तर त्याचे मनापासून ज्या व्यक्तीविषयी आदर, प्रेम असेल तरच अन्यथा ते दांभिक ठरेल. भक्तीचा महिमा वर्णन करताना महाराज म्हणतात की, राधेने कृष्णावर प्रेम केले ती खरी भक्ती. शबरीने रामावर जे प्रेम केलं ती खरी भक्ती. ज्ञानेश्वराने निवृत्तिनाथावर केली ती खरी भक्ती. पुंडलिकाने आई-वडिलांची जी सेवा केली ती खरी भक्ती. श्रावणबाळाने आई-वडिलावंर केली ती खरी भक्ती. म्हणून हे सर्व भाग्यवान ठरले. असा हा भक्तीचा महिमा सांगून खरा भाग्यवान कोणाला म्हणावे, हे संत तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून सांगतात की,
जाणे भक्तिचा जिव्हाळा। तोचि दैवाचा पुतळा॥
आणीक नये माझ्या मना। हो का पंडित शाहाणा॥
नामरुपीं जडलें चित्त। त्याचा दास मी अंकित॥
तुका म्हणे नवविध। भक्ति जाणे तोचि शुद्ध॥
अ. क्र. 374
 
भक्तीचे महत्त्व विषद करताना जो जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळायुक्त भक्ती जाणतो तोच खरा भाग्यवान आहे. न जाणणारा तो मग पंडित असेल किंवा शहाणा असेल तरी त्यांचं मनाला पटत नाही. भक्तीच सर्व श्रेष्ठ असल्याचे महाराज म्हणतात. कलियुगातील दांभिक साधनेला महत्त्व नाही. कार्य करताना क्षेत्र कोणतेही असो, त्या साधनेवरती भक्ती असावी. ध्येयावरती निष्ठा असावी. मग कार्य करताना ते मन:पूर्वक केल्यास असाध्य ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते शैक्षणिक क्षेत्र असेल, संरक्षणााचे क्षेत्र असेल, आरोग्याचे क्षेत्र असेल, शेतीचे क्षेत्र असेल, अध्यात्माचे क्षेत्र असेल, कोणतेही क्षेत्र असल्यास आहे त्या कामाविषयी भावपूर्ण निष्ठा ठेवून कार्य करणाराच भाग्यवान असतो. कारण त्याची त्याच्या कार्याविषयीची असणारी प्रामाणिक इच्छा महत्त्वाची असते. यापेक्षा दुसरं काही नको.
 
 
ईश्वराचे नावाशिवाय दुसरे काही श्रेष्ठ नाही. नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे आहे. नामाबरोबरच त्याचे मनमोहक रूपसुद्धा मनाला वेड लावते. अशा नावा-रूपाच्या पे्रमात चित्त ज्यांचे एकरूप होते त्यांचा सेवेकरी होऊन सेवा केली पाहिजे. या संदर्भात एक द़ृष्टांत असा की, पांडुरंगावर असलेल्या भक्तीबाबत तुकाराम महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. म्हणून त्यांची भेट घ्यावी असे एका दूरगावी असलेल्या माणसास वाटले म्हणून तो भेटीसाठी देहू गावी आला असता त्याने गावातील पारावर बसलेल्यांना Sant Tukaram Maharaj तुकाराम महाराजाचं घर विचारून त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तर, तिथे बसलेल्या व्यक्तीने त्यांना आम्ही ओळखत नसल्याचे सांगितले. खरं तर दुसर्‍याचं मोठेपण अनेकांना खपत नसते. मोठेपण समजून घेण्यास खूप मोठं मन लागतं. अशा वृत्तीचे माणसं प्रत्येक ठिकाणी आढळतात. परंतु बोलताना तुकाला ओळखतो असे सांगितले आणि तो आत्ताच प्रात:विधीकरिता गावाच्या दक्षिण दिशेस गेल्याचे सांगितले. तो भक्त त्यांचा शोध घेण्यास निघाला असता काही अंतरावरच त्यांना पांडुरंगाच्या नावाचा ध्वनी कानावर पडला. तो ऐकून अशाही ठिकाणी पांडुंरंगाचे नामस्मरण कोण करीत असेल? तर ते जाणून घेतल्यानंतर असे लक्षात आले की, ते तुकाराम महाराजच होते. खरोखर त्यांच्या जीवनात सत्य आणि नीतीला अधिष्ठान होते, हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले होते. महाराजासंबंधी त्याने जी कीर्ती ऐकली होती ती सत्य निघाली. खरोखर महाराजांनी जन्मभर पांडुंरंगाची निष्काम भक्ती केली. नामस्मरण केले. तेव्हा महाराजांना भेटल्यानंतर त्या गृहस्थाने नामस्मरणाबाबत विचारले असता महाराज म्हणतात की, अरे माझी वाचा आता माझी राहिली नाही. ही खरी भक्ती.
 
 
म्हणूनच नाम अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्याचे चित्त भक्तीशी जूळले आहे त्याचेच अंकित दास होत असते. सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते. ती मनापासून केल्यास अनेक गोष्टी पूर्णत्वास जातात. म्हणूनच नाम व रूप हे सत्य आहे. जोपर्यंत सेवा करीत नाही तोपर्यंत मेवा मिळत नाही, हेही तेवढेच खरे. म्हणून सेवा करणार्‍यांचा कधीही अपमान किंवा तिरस्कार करू नये. मग ते कोणतेही क्षेत्र असो. ज्या दिवशी सेवेकर्‍यांचा मानसन्मान केला जाईल त्यांचा महिमा खूप आहे. एवढं सेवेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दास होऊन निष्ठेने सेवा केली पाहिजे. भावपूर्णतेने भक्ती करावी. ही भक्ती करण्याचा सोपा सहज सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण. भक्तिभावाने नामस्मरण केल्यास जळतील पापे जन्मांतरीची एवढी ताकद नामामध्ये आहे. हजार गाढवांचा मालक झाल्यापेक्षा एका शहाण्या माणसाचा दास होणं कधीही चांगलं असतं. म्हणूनच भाग्यवान कोणाला म्हणावे? ते कसे ओळखावे? भाग्यवंताची लक्षणे कोणती? हे स्पष्ट करताना ते सांगतात की, भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो खरा भाग्यवान आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचि शुद्ध म्हणजेच पवित्र असल्याची कबुली देतो.
 
 
Sant Tukaram Maharaj : श्रवण हीसुद्धा खरी भक्ती आहे. झोपी गेलेला श्रोता काही कामाचा नाही. मनापासून ऐकले पाहिजे तसेच दास्य म्हणजे सेवेकरी भक्ती. साधुसंतांनी नवविध भक्ती केली त्यामुळे ते शुद्ध, पवित्र आहेत. उगीच कुणाच्याही चरणावर माथा टेकवू नये. तो त्या लायकेचा आहे का? याचा विचार आधी केला पाहिजे. साधुसंतांच्या चरणावर माथा टेकवावा. कारण ते शुद्ध, पवित्र आहे. मग त्याठिकाणी जात-धर्म, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत असा भेदभाव करू नये. शबरी ही भिल्लीण असतानाही ती पवित्र, शुद्ध ठरली. कारण शबरीची नवविध भक्ती होती. शबरी ही भिल्ल राजाची मुलगी होती. भिल्ल समाजात मुलीचे लग्न ठरल्यानंतर पूचा बळी देण्याची प्रथा होती. या प्रथेनुसार पूची बळी देण्याकरिता तयारी सुरू असताना हे शबरीला समजले; ती आपल्या वडिलांकडे जाऊन पूचा बळी का द्यायचा याबाबत विचारणा केली असता तिला सांगण्यात आले, की, असे केल्याने मुलीचा संसार सुखासमाधानाचा होतो. त्यावर शबरी म्हणाली, माझा संसार सुखी व समाधानाचा जावा म्हणून पू हत्या होत असेल तर मला ते मान्य नाही. माझं लग्न राहिलं तरी चालेल, असे तिने सांगितले. दुसर्‍या दिवशी ती सर्व सुख-समृद्धी सोडून मातंग ॠषीच्या आश्रमात आली. त्या ॠषीची तिने मनोभावे सेवा केली. तिने केलेल्या सेवने ॠषी संतुष्ट होऊन तिला म्हणाले की, याच कुटीत तुला प्रभू रामचंद्रांचे दर्शन होईल, असे सांगून ते निघून गेले. शबरीची श्रीरामावर असीम भक्ती होती. ती श्रीरामाचे नाव घेत पूजा करीत होती. दररोज वाटेकडे डोळे लावून बसत होती.
 
 
Sant Tukaram Maharaj : ॠषींनी सांगितले होते त्यावेळेस शबरी तरुण होती. तिचा एकच भाव होता; तो असा की, श्रीराम आपल्या कुटीमध्ये आल्याने आपली कुटी व आपले जीवन भेटीने पवित्र होईल. श्रीरामाच्या प्रेमापोटी शबरी भावपूर्वक गोड बोरं जमा करीत होती. खारट-तुरट बोरं जाणार नाही याकरिता ती जमा केलेलं प्रत्येक बोर चाखून पाहात होती. गोड असतील तीच माझ्या श्रीरामाला देईल, असे तिने ठरविले होते. ही खरी भक्ती. याच भक्तीला नवविध भक्ती असे म्हटले गेले. एवढेच नव्हे तर कुटीत ज्या मार्गाने श्रीराम येणार होते तो मार्ग ती दररोज स्वच्छ करीत होती. कारण तिला माहीत होते की, श्रीराम अनवानी पायाने येणार आहेत. त्यांना कुठलाही काटा किंवा खडा त्यांच्या पायाला रखडून वेदना होऊ नये. याकरिता रस्ता स्वच्छ करीत होती. श्रीरामाबद्दल असणारी ही खरी भक्ती शबरीमध्ये दिसून आली होती. हा आहे खरा भक्तीचा महिमा. शबरीने मोठ्या अंत:करणपूर्वक वाट पाहिली होती. प्रभू रामचंद्राची वाट पाहता पाहता शेवटी शबरी आता म्हातारी झाली होती. तरीसुद्धा श्रीरामाची भेट होईलच, याची तिला खात्री होती. कारण तिची भक्ती पवित्र होती. अशीच भक्ती धृवाची होती, बालक प्रल्हादाची होती. भक्तीची एवढी ताकद आहे की, परमेश्वराला दर्शन द्यावेच लागते. एवढी भक्तीमध्ये शक्ती सामावलेली असते. असा जिव्हाळायुक्त भक्ती जाणतो तोच खरा भाग्यवान असतो. पवित्र असतो. म्हणूनच ध्येयावरती निष्ठा ठेवून बसलेल्या शबरीला प्रभू श्रीरामचंद्रांनी भेट दिली. शबरीच्या मनातील प्रामाणिक इच्छा शेवटी पूर्ण झाली. असा हा भक्तीचा महिमा आहे. प्रामाणिकपणे भक्ती केल्यास असाध्य ते साध्य झाल्याशिवाय राहत नाही. मग ते कोणतेही क्षेत्र असो.
 
- 9422200007
Powered By Sangraha 9.0