श्रीगणपती अथर्वशीर्ष : त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ॥

    दिनांक :03-Jan-2024
Total Views |
धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
Sri Ganapati Atharvashirsha : गणपती अथर्वशीर्ष हे अत्यंत लोकप्रिय, जगात सर्वत्र पठन होणारे फलदायी सूक्त आहे. विशेषतः सामूहिक पठनात हजारोंच्या संख्येत महिला पुरुष सहभागी होतात. हे सूक्त अथर्व वेदांतील महत्त्वाचे सूक्त आहे. अथर्ववेदाच्या एकूण 5987 ऋचा आणि 20 कांड आहेत. या वेदांत एकूण 759 सूक्त आहेत. यातील 29 वे सूक्त म्हणजे गणपती अथर्वशीर्ष होय. या सूक्ताची देवता गणेश आहे. या सूक्ताचे कर्ते ऋषी अथर्वण ऋषी आणि गणक ऋषी आहेत. ‘ॐ गं गणपतये नम:’ हा या सूक्ताचा सिद्ध मंत्र आहे.
 
 
Ganpati
 
एक दन्ताय विद्महे, वक्रतुंडाय धीमही।
तन्नो दंती प्रचोदयात्।
 
Sri Ganapati Atharvashirsha : ही गणेश गायत्री या अथर्वशीर्ष सूक्तात आहे.
या सूक्तात भगवान गणेशाच्या स्वरूप हातात पाश, अंकुश, दंत आणि वरद मुद्रा आहे. या अथर्वशीर्ष सूक्तात गणेश ध्वजावर मूषक आहेत. या सूक्तात भगवान गणेशाची अष्टनामे विदित आहेत. व्रातपति, गणपती, प्रमथपती, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशक, शिवसुत आणि वरदमूर्ती ही ती आठ नावे आहेत. गणपती अथर्वशीर्ष भगवान गणेशाची दोन रूपे सांगते. एक म्हणजे निर्गुण एकाक्षर ब्रह्म ॐ.
 
 
Sri Ganapati Atharvashirsha : अथर्व वेद हा इतर वेदांपेक्षा जरा उशिरा संयोजित झाला. त्याबाबत कथा आहे. हरिण्य नावाचा एक राक्षस पाताळात राहत असे. प्रलयानंतर ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडू लागले तेव्हा हा हरिण्य राक्षस ते वेद प्राशन करू लागला. त्यामुळे देव त्याला मारायला धावले तेव्हा तो हरिण्य भगवान शंकराकडे शरण गेला. तेव्हा शंकर भगवंतानी त्याला समजावून सांगितले आणि वर दिला की पुढील जन्मी तू ब्रह्मदेवाचा मानसपुत्र अथर्वण नावाने जन्म घेशील आणि तुझ्याच नावाने वेद संयोजन करशील. पुढे मधुमती नदीच्या तीरावर अथर्वण जन्माला आले. त्यांची पत्नी कर्दम ऋषीची मुलगी चिती किंवा शांती होय. त्यांचे पुत्र दधिचि, पुत्री वाटिका. शिष्य क्रतु, कौत्स, भृगारि वगैरे. अथर्वण ऋषी चिकित्साशास्त्र, शल्य चिकित्सा, औषधी शास्त्र, निसर्गोपचार, जडीबुटी यांचे ज्ञाते होते. चरक, कणाद, सुश्रुत हे याच परंपरेतले.
 
 
जगातला सर्वांत पहिला सहकारी आणि बहू उपचार दवाखाना (वैद्यकीय संकुल) याच अथर्वण ऋषी आणि त्यांच्या सहकारी ऋषिगणांनी काढला होता. गणपती अथर्वशीर्ष सूक्ताचे कर्ते ऋषी म्हणजे हेच अथर्वण ऋषी होत. थर्व म्हणजे अस्थिर, चंचल, नकारात्मक, अशाश्वत. याउलट अथर्व म्हणजे स्थिर, शांत, सकारात्मक, शाश्वत. शीर्ष म्हणजे मुख. मुख हा शरीराचा सर्वश्रेष्ठ अवयव. सर्व ज्ञानेंद्रिये नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा मुखावरच वसलेली आहेत. म्हणूनच डोकं शांत असले की जीवन परमशांत असते.
 
 
Sri Ganapati Atharvashirsha : गण हा समूहवाचक असून गण शिव गण, विष्णू गण, इंद्र, देव, मनुष्य, राक्षस, यक्ष, पशू पक्षी असे अनेक प्रकारांचे गण आहेत. या सर्व गणांचा तो अधिपती आहे. याशिवाय गण म्हणजे इंद्रिय. पंच ज्ञानेन्द्रिये, कर्मेंद्रिये, मन बुद्धी अहंकार आणि चित्त. यांच्यावरही त्याची सत्ता म्हणून गणपती. त्याच गणेशाचं वर्णन करताना अथर्वशीर्षकार त्वम एव प्रत्यक्षम, तत त्वम असि! अशी सुरुवात करतात. त्वमेव म्हणजे फक्त फक्त आणि फक्त तूच. भक्ती करताना एवढा दृढविश्वास, निश्चित भाव हवा. प्रत्यक्ष म्हणजे दृष्टीगोचर स्वरूप. भगवान गणेश नर अधिक गज स्वरूप म्हणजे नर गजात्मक स्वरूपात आहेत. हे त्यांचे प्रत्यक्षात दिसणारे स्वरूप. तत्त्वमसि म्हणजे दृष्यते यथार्थम. तो तूच हा पूर्ण विश्वास. तूच कर्ता, धर्ता आणि हर्ता. उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे तूच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे गणपती! तूच सर्वम् खल्विदम् ब्रह्म आहेस. हे गणेशा! तू माझं रक्षण कर, तू निष्ठापूर्वक श्रवण करणार्‍याचं रक्षण कर, तूच बुद्धिदाता बनून रक्षण कर, तूच माझ्यात दृढ संकल्प निर्माण करून माझं रक्षण कर. अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता ही अवस्था प्राप्त तुझ्यामुळेच होते. या ठिकाणीच गणेशाला अद्वितीयोसि म्हटलं आहे. म्हणजे एकमेव, केवळ तू, तू आणि तूच सच्चिदानंद स्वरूप आहेस. तूच ज्ञान आणि विज्ञान स्वरूप प्रत्यक्ष ब्रह्म आहे. ज्ञानाने स्वस्वरूपाची जाणीव होते. गुरूचे अनुभवजन्य ज्ञान प्राप्त होणे यालाच विज्ञान म्हटले आहे.
 
 
हे सर्व विश्व तुझ्यातूनच निर्माण झाले, तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे आणि तुझ्यातच विलीनही होणार आहे. याचा प्रत्ययदेखील तुझ्यामुळेच. पंच महाभूते तूच आहेस. परा, पश्चन्ति, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी तूच आहेस. तू सत्त्व, रज, तम या गुणांच्या पलीकडला आहेस. अथर्वशीर्षकारांनी सिद्धमंत्र सांगितला. सर्वात पहिले ग् त्याला अ हा वर्ण. त्याला अनुस्वार, अर्धचन्द्राकार, त्याला म्हणजे तारक प्रणव अक्षर जोडले तो ध्वनी ॐ गं आहे. यातून निर्मित नादाची संधी शास्त्रात तिला संहिता म्हणतात. हीच गणेशविद्या.
 
 
भगवान परशुरामाशी युद्ध करताना गणेशाचा दात कापला गेल्याची कथा आहे म्हणून एकदंत. त्याचे स्वरूप वक्रतुंड सांगितले आहे. वक्रान्तुंडयती म्हणजे वाम मार्गाने जाणार्‍यांना तुडवतो तो वक्रतुंड. वक्रान विघ्नान तुंडयती, नाशयति म्हणून तो विघ्ननाशक. मत्सासुरांचे दोन पुत्र सुंदरप्रिय आणि विषयप्रिय यांचा वध भगवान गणेशाने केला म्हणून वक्रतुंड. तो वक्रतुंड आम्हाला प्रेरणा देवो.
 
 
त्याच्या चार हातात वरद मुद्रेसह आयुधे आहेत. तो रक्त वर्णाचा लंबोदर आहे. श्रीगणेशाच्या हातात पाश आणि अंकुश आहेत. हा पाश मोहपाशातून सुटका करून आपल्याला मुक्तीकडे नेतो. आणि अंकुश जसा मदमस्त हत्तीच्या गंडस्थळावर आघात करून त्यांच्यावर पकड ठेवतो तसाच हा अंकुश आपल्या जीवनातील मद, माया, अहंकार यांवर अंकुश ठेवतो. आणि वरदमुद्रेने आपल्याला अभयदेखील देतो. जो व्रत करणार्‍या व्रतींचा अधिपती म्हणून व्रातपती, गणांचा पती म्हणून गणपती, प्रमथ नावाचे सर्वश्रेष्ठ गण त्याचा नेता म्हणून प्रमथपती आणि तोच शिवसुत महागणेश आहे.
 
 
अशा Sri Ganapati Atharvashirsha गणेशाची गणपती अथर्वशीर्ष म्हणून आराधना केल्यास कोणत्याही विघ्नाची बाधा होत नाही. त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. दिवसा झालेले प्रमाद रात्री पठन केल्याने आणि रात्रीत झालेले प्रमाद प्रातःकाळी म्हटल्यास त्यातून सुटका होते. त्यासोबत सहस्र आवर्तन केल्यास मनोकामना पूर्ण होतात. ती व्यक्ती कुबेरासम धनवान बनेल. गणपती अथर्वशीर्ष सूक्ताने अभिसिंचन केल्यास अथवा हवन केल्यास तेजस्वी, मेधावान, उत्तम वक्तृत्व, निर्भय, सूर्यासम तेजस्वी बनाल याची खात्री दिली आहे. गणपती अथर्वशीर्ष या अथर्ववेदांतील सूक्ताचा साधारण विचार आपण केला. संपूर्ण भारतात गाणपत्य परिवार मोठा आहे. ज्योतिष शास्त्रात गणेश केतु ग्रहाची देवता आहे आणि छायाग्रह राहूची विरोधक शक्ती आहे. अथर्वशीर्ष हे गणेश उपनिषद म्हणूनही प्रसिद्ध आहे. भगवान गणेश अधिनायक आहेत. श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणताना प्रथम ध्यान महत्त्वाचे आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी नर गजात्मक स्वरूपाचे ध्यान करावे. षोडशोपचार मानसपूजा करावी. शमीपत्र, दूर्वान्कुरदलपत्र, लाह्या मानसपूजेत आवश्यक असावे. उच्चार करताना स्वराघाताकडे शक्यतोवर ध्यान द्या. गणपती अथर्वशीर्ष सूक्ताने देवाला अभिसिंचन, लाह्यांनी हवन किंवा त्याचे सामूहिक पठन विशेष फलदायी आहे. गणपती अथर्वशीर्ष मनःशांती प्रदान करणारे सूक्त असून पूर्ण ऊर्जा आणि पूर्ण विश्वास ठेवून त्याचे पठन केल्याने सुखाच्या वाटा प्रशस्त होतात. मनःशांती आणि विवेकबुद्धी प्राप्त होते. तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तनंच कारयेत! 
 
- 9822262735