‘महाराष्ट्र शक्तिपीठ’ महामार्गाच्या कामाला गती द्यावी : फडणवीस

    दिनांक :30-Jan-2024
Total Views |
- विदर्भ, मराठवाडा, कोकण, प. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या विकासाला चालना

मुंबई, 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे Maharashtra Shaktipeeth Highway महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या द़ृष्टीने राज्यातील पवनार जि. वर्धा ते पात्रादेवी जि. सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र-गोवा सरहद्द जोडणार्‍या ‘महाराष्ट्र शक्तिपीठ’ महामार्गात येणार्‍या जिल्ह्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी या महामार्गाच्या कामाला गती द्यावी, असा निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पवनार पात्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे सादरीकरण करण्यात आले.
 
 
Maharashtra Shaktipeeth Highway
 
राज्यातील तीन शक्तिपीठे, दोन ज्योतिर्लिंग, दत्तगुरुची 5 धार्मिक स्थळे, पंढरपूरसह एकूण 19 तिर्थक्षेत्रांना जोडणार्‍या शीघ्रसंचार द्रुतगती महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन तातडीने पूर्ण करावे, रस्ते दर्जेदार करण्यासोबतच रस्त्यांचा देखभाल व दुरुस्ती खर्च शून्य होण्यासाठी जास्तीत जास्त रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात यावे. यामुळे रस्त्यांचा दर्जा राखला जाऊन पुढील 30-40 वर्षे रस्त्यांच्या कामांवरील खर्चाला आळा बसेल, असेही फडणवीस म्हणाले.
 
 
Maharashtra Shaktipeeth Highway महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील प्रमुख शक्तिपीठ माहूर, तुळजापूर व कोल्हापूर तसेच मराठीतील आद्यकवी मुकुंदराज स्वामींचे व जोगाई देवीचे अंबाजोगाई, औंढा नागनाथ व परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंगे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर तसेच कारंजा (लाड), अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औंदुबर ही दत्तगुरूंची धार्मिक स्थळेही जोडली जातील. या महामार्गामुळे पर्यटन, दैनंदिन दळणवळण व औद्योगिक विकास गतीमान होऊन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभाग एकमेकांना जोडले जाऊन सामान्यांचे जीवनमान उंचावेल.
 
 
नागपूर ते गोवा हा सद्य:स्थितीतील 21 तासांचा प्रवास साधारणतः 11 तासावर येईल. तसेच दळणवळण गतिमान झाल्याने परिसराचा विकास नियोजनपूर्वक व वेगाने साध्य करता येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी महामार्गाच्या कामाचे सादरीकरण केले. Maharashtra Shaktipeeth Highway महामार्गाची लांबी 802 किमी असून, भूसंपादनासह खर्च 86 हजार 300 कोटी एवढा अपेक्षित आहे. यासाठी साधारणत: 9,385 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.