जिल्ह्यातील दोनशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार मैत्री प्रशिक्षण

    दिनांक :30-Jan-2024
Total Views |
- अर्ज करण्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांचे आवाहन

यवतमाळ, 
केंद्र सरकारच्या National Gokul Mission राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 200 सुशिक्षित बेरोजगारांना मैत्री-मल्टीपर्पज आर्टिफिशियल इन्सीमेशन वर्कर इन रुरल इंडिया (एमएआयटीआरआय) म्हणून प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. या प्रशिक्षित व्यक्तींची कृत्रिम रेतन व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती केली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
Gokulmishan
 
National Gokul Mission या माध्यमातून जिल्ह्यातील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच दुग्ध उत्पादनात वाढ होऊन शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. हा प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना क्लासरूम ट्रेनिंग व दोन महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा समावेश राहील. क्लासरूम ट्रेनिंग ही पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल व प्रॅक्टिकल ट्रेनिंग ही जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय या ठिकाणी घेण्यात येईल.
 
 
 
National Gokul Mission प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जदार हा किमान बारावी उत्तीर्ण झालेला असावा, त्यांचे वय 18 ते 35 वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध होईल. यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 200 उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विजय राहाटे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले यांनी केले आहे.